रेशन धान्य दुकानांना लवकरच भगवा रंग

नागरी पुरवठा खात्याने दिली माहिती


11 hours ago
रेशन धान्य दुकानांना लवकरच भगवा रंग

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील सर्व रेशन धान्य दुकानांना ‘कलर कोड’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेशन धान्य दुकान सोसायटी म्हणून लोकांना ओळखता आली पाहिजे. त्यासाठी सर्व सोसायट्यांना लवकरच भगवा रंग देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच राज्यात केली जाईल, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याच्या अधिका ऱ्यांनी दिली.
नागरी पुरवठा खात्याने उत्तर गोव्यातील सर्व रेशन धान्य विक्री करणाऱ्या सोसायटी मालकांची बैठक घेतली. खात्याचे संचालक जयंत तारी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील सोसायटी मालकांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उत्तर गोव्यातील सुमारे २५० सोसायटी मालकांनी उपस्थिती लावली होती.
केंद्र सराकारच्या निर्णयानुसार, राज्यातील सर्व रेशन धान्य दुकान सोसायट्यांना कलर कोडिंग करण्याचे ठरवले आहे. लोकांना पाहताक्षणीच सोसायटी असल्याचे लक्षात आले पाहिजे. राज्य सरकारने राज्यातील सर्व सोसयाट्यांना स्टॅण्डर्ड कलर कोडिंगची अंमलबजावणी केली आहे. तिसावडी, केपे तालुक्यात याबाबतचे काम सुरू झाले आहे. राज्यातील सर्व सोसायट्यांना रंग देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राट दिले आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे साहाय्यक संचालक तुळशीदास दाभोळकर यांनी दिली.