कला अकादमी नूतनीकरणाची कामे निकृष्ट दर्जाचीः विजय केंकरे

उत्तीर्ण होण्याएवढेही गुण कामांना मिळणार नाहीत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
कला अकादमी नूतनीकरणाची कामे निकृष्ट दर्जाचीः विजय केंकरे

पणजी : कला अकादमी नूतनीकरणाच्या कामांचा दर्जा निकृष्ट आहे. तपासणी अंती कामांना उत्तीर्ण होण्याएवढेही गुण कृती दलाकडून मिळणार नाहीत, असे कृती दलाचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी बैठकीनंतर सांगितले. तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही कामे पुन्हा नव्याने हाती घ्यावी लागणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

सरकारने ५० कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च करून कला अकादमीची दुरूस्ती आणि नूतनीकरण केलेले आहे. नूतनीकरणाच्या कामांवर पूर्वीपासूनच संशय व्यक्त केला जात आहे. कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्ष तसेच कलाकारांनी बऱ्याच वेळा केलेला आहे. कामांच्या दर्जाची तपासणी व्हायला हवी, अशी मागणी कलाकारांकडून झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृती दलाची स्थापना केली.

कलाकार विजय केंकरे हे कृती दलाचे अध्यक्ष आहेत. सोमवारी कला अकादमीची पाहणी केल्यानंतर कृती दलाची मंगळवारी बैठक झाली. पाहणी करतानाच स्टेज तसेच वातानुकूलीत यंत्रणेबाबत (एसी) सदस्यांनी नापसंती व्यक्त केली होती. यानंतर मंगळवारी सदस्यांची बैठक झाली. यावेळी तोमाझिन कार्दोज, प्रवीण गावकर, देवीदास आमोणकर यांच्यासह १३ जण कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

काही कामे नव्याने करावी लागणार-

स्टेज, ध्वनी यंत्रणा, एसीसह एकंदर सर्वच कामे सदोष आहेत. तज्ज्ञांचा सल्ला घेउन काही कामे नव्याने करावी लागणार आहेत. नूतनीकरणाची कामे ज्या कंत्राटदारांनी केली आहेत, त्यांच्याशी १० नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे, असे अध्यक्ष विजय केंकरे यांनी सांगितले.

हेही वाचा