आरीयास वाडा, नागवा हडफडे येथे मांस विक्री दुकानावर छापा

५७.६१ किलोग्रॅम मांस जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
आरीयास वाडा, नागवा हडफडे येथे  मांस विक्री दुकानावर छापा

म्हापसा : आरीयास वाडा, नागवा हडफडे येथे धी मीट हब नामक मांस विक्री दुकानावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना छापा टाकून ५७.६१ किलोग्रॅम वजनाचे मांस जप्त केले. पशुवैद्यकीय खात्याच्या विनापरवाना हे दुकान थाटण्यात आले होते.
ही कारवाई रविवारी (दि. २०) करण्यात आली. नागवा हडफडे येथे खात्याची परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या मांस विक्री दुकान सुरू असल्याची माहिती कळंगुट येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानुसार रविवारी दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शार्लेट फर्नांडिस यांनी हणजूण पोलिसांच्या सहाय्याने सदर दुकानावर छापा टाकला. यावेळी दुकानातील व्यवसाय सुरू होता. मोहम्मद मसूद खान (३९, रा. उत्तर प्रदेश) हा व्यवस्थापक तसेच हसन साब बेपारी (४६, रा बेळगाव) व सुबान बेपारी (३४, रा. बेळगाव) हे तिघेजण संशयित दुकानात होते.
दुकानातील व्यवहार देखील अस्वच्छ अशा जागी होता. छाप्यावेळी दुकानात मांससह चामडे, आतडे व यकृत असे एकूण ५७.६१ किलो मांस सापडले. जप्त केलेल्या या मांसची नंतर विल्हेवाट लावण्यात आली.
हणजूण पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. फर्नांडिस यांच्या तक्रारीच्या आधारे संशयितांविरुद्ध गोवा प्राणी संरक्षण कायदा कलम ७ व ८ अन्वये गुन्हा नोंद केला. तसेच संशयितांना भारतीय न्याय संहितेच्या ३५(३) अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितेश शिंगाडी करीत आहेत.

हेही वाचा