सुकूर येथील वनक्षेत्रातील बेकायदा रस्त्याची पाहणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
सुकूर येथील वनक्षेत्रातील बेकायदा रस्त्याची पाहणी

वनक्षेत्रात बेकायदेशीररीत्या बांधला जाणारा रस्ता.

म्हापसा : सुकूर येथे अधिसूचित वनक्षेत्रात वृक्ष तोडी व डोंगर कापणी करून केले जाणाऱ्या बेकायदा रस्त्याच्या बांधकामाला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. राज्यातील विविध भागांतील समविचारी लोकांसह रहिवाशांनी या प्रकरणी कारवाई तसेच जमीन पूर्ववत करण्याची मागणी केल्यानंतर पंचायतीकडे या अवैध बांधकामाची पाहणी केली.
सर्व्हे क्र. २९१ व २०७ वनक्षेत्र म्हणून अधिसूचित केलेल्या जमिनीमध्ये मार्केट २४ जवळ अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीर रस्ता बांधणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी संबंधितांनी कोणत्याही प्रकारची वैध परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे जॉन वाझ यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांनी या मुद्द्यावर चिंता व्यक्त करीत वन खात्याचे मुख्य वन संरक्षक, बार्देश उपजिल्हाधिकारी, साबांखा कार्यकारी अभियंता, उपनगर नियोजक व सुकूर पंचायतीसह विविध अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून पाहणीची मागणी केली आहे. शिवाय ही नासधूस केलेली जमीन मूळ स्थितीत आणावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सोमवारी ग्रामस्थ तसेच राज्यभरातील समविचारी लोक पंचायत घरासमोर जमा झाले व त्यांनी संबंधित जागेची पाहणी करण्याची विनंती केली. त्यानुसार सरपंच सोनिया पेडणेकर यांनी पंचायत सचिव, पंचसदस्यांसह सदर जागेची संयुक्त पाहणी केली. यावेळी सरपंच पेडणेकर यांनी हा पाहणी अहवाल पंचायत मंडळाच्या बैठकीसमोर ठेवला जाईल व आवश्यक ती कारवाई करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
दरम्यान, बेकायदा रस्त्याच्या बांधकामामुळे शेजारील दोन मालमत्तांच्या संरक्षक कठड्याचे नुकसान झाले हे पाहणीवेळी स्थानिकांनी पंचायतीच्या निदर्शनास आणले. हा परिसर वनक्षेत्र अधिसूचित आहे, तरीही हे बांधकाम केले जात असून यामुळे गावात पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होईल. मातीची धूप होत असल्याने भविष्यात भूस्खलन होण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
संबंधितांवर कारवाईची मागणी
- जॉन वाझ म्हणाले, सुकूर येथील सेरुला कोमुनिदादच्या अधिसूचित वन क्षेत्रात रस्त्याच्या बेकायदेशीर बांधकामाविषयी आम्ही विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
- हे अधिसूचित जंगल टिकवण्यासाठी आम्ही २०१४ पासून लढा देत आहोत. २०१४ मध्ये ५३ झाडे अवैधरीत्या तोडण्यात आली होती.
- २०१५ मध्ये पंचायतीने डांबरी रस्त्याचा प्रस्ताव दिला असता त्यास आक्षेप घेतला व सदर ठराव रद्द करण्यात आला.
- आता पुन्हा काही अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीररीत्या हा रस्ता बांधण्यास सुरुवात केली आहे. संबंधितांवर कारवाई करून जमीन मूळ स्थितीत आणावी, अशी आमची मागणी आहे.

हेही वाचा