बार्देश : कळंगुटमधील हॉटेलमध्ये दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू तर महिला जखमी

प्रकरणाला विवाहबाह्य संबंधाची किनार असल्याचा प्राथमिक संशय, पोलीस तपास सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st October, 12:47 pm
बार्देश : कळंगुटमधील हॉटेलमध्ये दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू तर महिला जखमी

म्हापसा :  पर्यटन हंगाम सुरू झाल्याने किनारी भागाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ पहायला मिळत आहे. उत्तर गोव्यातील कळंगुट-बागा समुद्रकिनाऱ्याला देशी पर्यटकांची विशेष पसंती आहे. येथूनच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका हॉटेलमध्ये कर्नाटकातील दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यात एकाचा मृत्यू झाला असून महिला जखमी झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कळंगुटच्या खोबरावाडा येथील हॉटेल बोनांझामधून पोलिसांना आत्महत्येची माहिती देणारा कॉल आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली असता महेश सुंतनूरे (४५,बिदर-कर्नाटक) याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. तर त्याच्यासोबत असलेली महिला सोनाली (२५, बिदर-कर्नाटक) हिच्या मनगटावर जखम आढळून आली. गंभीर जखमी असलेल्या सोनाली हिला नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक महितीनुसार, दोघांनी १९ ऑक्टोबर रोजी हॉटेलमध्ये चेक ईन केले होते तर त्याचा चेक आउट काल २० ऑक्टोबर रोजी होता. नंतर त्यांनी एका दिवसाचे वास्तव्य वाढवले होते. अन्य दिशेने सुरू असलेल्या तपासानुसार, सोनाली ही विवाहित असून तिचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते तर महेश हा देखील विवाहित असून त्याच्या पश्चात त्याची पत्नी व तीन मुले आहेत. एकंदरीत प्रकरणाचे स्वरूप पाहता आत्महत्येस विवाहबाह्य संबंधच कारणीभूत ठरले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. 

हेही वाचा