सीरियल किलर चंद्रकांत तलवार, सायरन रॉड्रिग्जला फाशीची शिक्षा द्या!

पोलिसांची उच्च न्यायालयात आव्हान याचिका : सोनी तलवारच्या सुटकेलाही आव्हान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
सीरियल किलर चंद्रकांत तलवार, सायरन रॉड्रिग्जला फाशीची शिक्षा द्या!

पणजी : तिसवाडी तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचा खून केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने सीरियल किलर चंद्रकांत तलवार (पणजी) आणि सायरन रॉड्रिग्स (मेरशी) या दोघांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. या आदेशाला पोलिसांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊन दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच ग्रिश्मी ऊर्फ सोनी चंद्रकांत तलवार हिच्या निर्दोष सुटकेलाही आव्हान दिले आहे.
या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी प्रथम गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग केले होते. त्यानुसार, १२ ऑक्टोबर २००९ रोजी वेर्णा पठारावर एक जळलेल्या स्थिती मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. याच दरम्यान पोलिसांना अश्याच प्रकारचे सुकूर, मेरशी, खोर्जुव व इतर ठिकाणी आणखी मृतदेह सापडल्यामुळे सर्व प्रकरणे गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक मंगलदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपअधीक्षक सुनितासावंत, निरीक्षक रुपेश शेटगावकर, राजन निगळे, प्रवीण कुमार वस्त, निनाद देऊलकर व इतरांचे पोलीस पथक तयार करून तपास सुरू केला होता.
वेर्णा येथे सापडलेला मृतदेह तिसवाडी तालुक्यातील १६ वर्षीय युवतीचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिच्या मोबाईल तसेच इतर माहितीची मदत घेतली असता, सदर युवतीला एका मोबाईल वरून संपर्क साधल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलीस पथकाने १७ ऑक्टोबर २००९ रोजी मुंबई येथून चंद्रकांत तलवार आणि सायरन रॉड्रिग्स या दोघांसह इतर दोघा महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी चंद्रकांत तलवार आणि त्याची पत्नी ग्रिश्मी ऊर्फ सोनी याच्यासह सायरन राॅड्रिग्स यांना अटक केली होती.
या प्रकरणी बाल न्यायालयाने तलवार आणि रॉड्रिग्स यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर सोनी तलवार हिला पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या आदेशाला पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
संशयिताकडून महिलांचे अपहरण, खून
संशयितांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी दि. १० ऑक्टोबर २००९ ते १२ ऑक्टोबर २००९ या तीन दिवसांत दोन महिला आणि दोन युवतींचे अपहरण करून त्यांचा निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांच्या अंगावरचे दागिने चोरून १३ ऑक्टोबर २००९ रोजी मुंबईत पळ काढल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हा शाखेने तपासपूर्ण करून बाल न्यायालयात चंद्रकांत तलवार, सायरन रॉड्रिग्स आणि तलवार याची पत्नी रिश्मी ऊर्फ सोनी याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले.

हेही वाचा