पर्यटन वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्या!

मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. अन्य कुठल्याही राजकारणी, मंत्र्यांना किंवा आमदारांना यात लुडबुड करू न देता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना स्पष्ट निर्देश देऊन जो कायदा मोडेल त्याचे कंबरडे मोडण्याचे आदेश द्यावेत. गोव्याचे पर्यटन क्षेत्र बदनामीपासून दूर ठेवायचे असेल तर सरकारला योग्य निर्णय घ्यावाच लागेल.

Story: उतारा |
20th October, 12:14 am
पर्यटन वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्या!

खिसा भरलेला असो किंवा रिकामा. पाहुणचारात गोंयकाराचा हात कोणीही धरू शकत नाही. मैत्री असो किंवा पाहुणचार, गोंयकार नेहमीच अग्रेसर. गोव्याचा समुद्र अख्ख्या जगाला खुणावत असतो. मंदिरे, चर्च यांचा प्रदेश अशी दुसरी गोव्याची ओळख. गोव्याचा माणूस दिलदार. मोठमोठ्या लोकांनी गोव्याचे आणि गोव्यातील लोकांचे वर्णन केलेल आहे. पण गोव्याची ओळख हळूहळू बदलू लागली आहे की काय, अशी चिंता आता व्यक्त होत आहे. सोशल मीडियाच्या या काळात गोव्याचे भलतेच चित्र जगासमोर येत आहे. वेगवेगळ्या घटना गोव्याची प्रतिमा खराब करण्यासाठी वापरल्या जात आहेत. वापरल्या जात आहेत म्हणण्यापेक्षा अशा घटनाही सातत्याने घडत आहेत. त्या रोखण्याचे आव्हान आहे. त्या रोखण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घ्यावी लागेल.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परवा गोव्यातील व्यवसाय बाहेरील लोकांच्या हाती गेल्याचे म्हटले होते. किनारी भागांतील बहुतेक सर्वच व्यवसाय तर बाहेरील लोकांच्याच हाती आहेत. तिथे बाऊन्सरची संस्कृती रुजून फुलू लागल्यामुळे स्थानिकांनाही हल्ली मारहाण होत आहे. एकूणच गोव्याची दोन-तीन दशकांपूर्वी जी ओळख होती, ती आता बदलू लागल्यामुळे यापुढे गोव्याचे हे नवे रुप लिहिणाऱ्यांचीच संख्या वाढणार आहे. त्याला आळा घालण्यासाठी सरकारने आताच उपाययोजना करण्याची गरज आहे.

मुख्यमंत्र्यांनी परवा एका कार्यक्रमात बोलताना परप्रांतीयांनी गोमंतकीयांच्या पारंपरिक व्यवसायांवर कब्जा करणे गोव्याच्या भविष्यासाठीचा धोका असल्याचे म्हणत, गोमंतकीयांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी गोव्यातील व्यवसाय बहरावा म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात पहिले काम केले ते म्हणजे ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम राबवली. गोव्यातील पारंपरिक व्यवसायांमध्ये गोव्यातील लोक उतरावेत आणि भाजी, फळे, फुले यासह डेअरी, कुकुटपालन सारख्या गोष्टींवर गोमंतकीयांनी भर द्यावा असा त्यांचा हेतू होता. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. पण शहर आणि विशेषतः किनारी भागातील व्यवसाय गोमंतकीयांनी परप्रांतीयांच्या हाती देऊन आपल्याच पायावर दगड मारून घेतला आहे. गोव्यातील व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती जात असल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधान हे कटू सत्य मांडणारे होते. गोव्यातील लोकच आपले व्यवसाय परप्रांती​यांच्या हाती देत आहेत. सरकारकडून आवश्यक ते परवाने आपल्या नावे घेऊन झाल्यानंतर व्यवसाय चालवायला देऊन भाडे मिळवणे असा नवा ट्रेंड गोमंतकीयांनी सुरू केला आहे. त्याचा परिमाण म्हणून किनारी भागात मुंबई, दिल्ली, हरयाणा, पंजाब, नोयडा यांसारख्या भागातून आलेले व्यावसायिक पाय पसरत आहेत. इथल्या व्यवस्थेला हाताशी धरून त्यांनी एकेक करत बहुतेक सर्वच व्यवसाय बळकावले. इथल्या स्थानिक राजकीय नेत्यांचा आणि गुंडांचा आशीर्वाद असल्यामुळे स्थानिकांच्या विरोधाचीही पर्वा हे व्यावसायिक करत नाहीत. काहींना माज चढल्यामुळेच पर्यटकांना मारहाण करणे, स्थानिकांना मारहाण करणे, एकमेकांच्या व्यवसायांविरोधात तक्रारी करणे अशा गोष्टी सुरू आहेत. 

गेल्या आठवड्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांना झालेली मारहाण आणि त्यानंतर एका क्लबमध्ये स्थानिकांना झालेली मारहाण या दोन्ही घटना किनारी भागांत सुरू असलेल्या अनियंत्रित दादागिरीची उदाहरणे आहेत. याच भागात टाऊट्स पर्यटकांना सतावतात, असे आरोप पर्यटनमंत्री रोहन खंवटे करत होते. त्या आरोपानंतरही कळंगुटमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची लूट सुरू आहे. सध्या खंवटेही बोलत नाहीत आणि स्थानिक आमदार मायकल लोबोही तिथल्या लुटीबाबत बोलत नाहीत. प्रसंग ओढवल्यानंतर कोणावर कारवाई करावी हे पोलिसांनाही कळत नाही अशी स्थिती आहे. त्यामळे पोलीस आधी सामंजस्यपणाची भूमिका घेतात तीच भूमिका त्यांना महागात पडते. पशुवैद्यकीय डॉक्टरांना मारहाण करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी स्थानिकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. त्यात सरकारने त्वरित क्लबला टाळे ठोकले. त्या प्रकरणातही पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंद केला नव्हता. दोन्ही घटना पाहिल्या तर पोलिसच कारवाई करण्याबाबत गोंधळलेले आहेत असे दिसून येते. कळंगुटमध्ये मुलीची छेड काढण्याची घटना ही या दोन्ही घटनांनंतर घडलेली तिसरी घटना आहे. पणजीतील मळा भागात फोटोसेशन करून स्थानिकांना हैराण करणाऱ्या पर्यटकांच्या अंगावर जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओही याच धामधुमीत व्हायरल झाला. पर्यटन हंगाम सुरू व्हायच्या वेळीच गोव्याची बदनामी करणाऱ्या अशा घटना घडत असल्यामुळे ‘टीटीएजी’ने सरकारला सावध करण्याचे काम वेळेवर केले आहे.

‘टीटीएजी’च्या म्हणण्याप्रमाणे, पोलीस कारवाई करण्यासाठी जातात आणि वरिष्ठ अधिकारी तसेच राजकारणी दबाव आणतात. राज्यातील पर्यटनाशी संंबंधित महत्त्वाची संस्थाच असे म्हणत असेल तर त्यात तथ्य असायला हवे. गोव्याचा पर्यटन उद्योग चांगला चालावा आणि भविष्यात या उद्योगाला घरघर लागू नये, यासाठी सरकारने आताच पर्यटन क्षेत्रातील अवैध व्यवहारांना हद्दपार करायला हवे. ‘टीटीएजी’नेही तीच मागणी केली आहे. कळंगुट किनाऱ्याला गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची राणी म्हणायचे. ती स्थिती आता राहिलेली नाही. कळंगुटमधील अवैध गोष्टींना आळा घालण्याचे आवाहन ‘टीटीएजी’ने सरकारकडे केले आहे. किनाऱ्यांवर असलेले टाऊट्स असोत किंवा ड्रग्स डिलर असोत. बेकायदा मसाज पार्लर, बेकायदा शॅक असतील किंवा ध्वनी प्रदूषण करून स्थानिकांची सतावणूक करणारे नाईट क्लब असतील या साऱ्यांनाच सरकारकडून कडक संदेश जाण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. अन्य कुठल्याही राजकारणी, मंत्र्यांना किंवा आमदारांना यात लुडबुड करू न देता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना स्पष्ट निर्देश देऊन जो कायदा मोडेल त्याचे कंबरडे मोडण्याचे आदेश द्यावेत. गोव्याचे पर्यटन क्षेत्र बदनामीपासून दूर ठेवायचे असेल तर सरकारला योग्य निर्णय घ्यावाच लागेल. अन्यथा असल्या लहान लहान गोष्टींमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची जगभर बदनामी होईल, ज्याचा परिमाण थेट पर्यटन उद्योगावर होणार आहे.


पांडुरंग गांवकर
९७६३१०६३००
(लेखक दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.)