कम्युनिकेशन गॅप

आपल्या समजात मुलगी किती शिकलीय, कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नसतं. तिला जेवण बनवता येतं की नाही, शिवणकाम येतं की नाही, रांगोळी घालता येते की नाही, पूजेची तयारी करता येते की नाही, साडी नेसता येते की नाही, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

Story: कथा |
20th October, 12:02 am
कम्युनिकेशन गॅप

“अगं मीने, लग्न ठरलंय तुझं मग एवढी उदास का वाटतेस?” सरिताने मीनीच्या जवळ येत तिला विचारले.

“काही नाही गं सहज आपलं... चल निघूया का आपण?” मीनीने म्हटले.  

“हो..हो.. म्हणूनच तर आलेय..” सरिताने हसत म्हटले.

लग्नाच्या खरेदीसाठी मीनीने आपली अगदी जवळची मैत्रिण सरिताला मदतीसाठी बोलावले होते.  “चल बस”  स्कुटर स्टार्ट करत मीनीने म्हटले.

“आधी कुठे जायचं आपण?”  सरिताने मागे बसत विचारले.

“कपड्याच्या दुकानात जाऊ, मग जरा ब्रायडलचं बघू.” मीनीने स्कुटर मुख्य रस्त्यावर घेत म्हटले.

“ओके. तुझ्या टेलरला पण जरा जागवू. नाहीतर आयत्या क्षणीच ‘तो मी नव्हेच’ करेल!” सरिताने हसत हसत म्हटले.

“हो... जाऊ या.” असे म्हणून मीनीने कपड्याच्या दुकानासमोर स्कुटर उभी केली. 

दोघीही कपड्याच्या दुकानात गेल्या. हव्या त्या कपड्यांची खरेदी केली आणि बाहेर आल्या. एवढ्यात “अगं मला जाम भूक लागली आहे. थोडं खाऊया का? ते बघ समोरच रेस्टोरेंट दिसतंय.” सरिताने मीनीला म्हटलं. मीनीनेही होकार दिला आणि दोघीही मार्केटमध्ये असलेल्या कॅफेत येऊन बसल्या. दोन प्लेट वडा आणि दोन चहाची ऑर्डर दिली. मीनी शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कसलाच उत्साह नव्हता. सरिताला तिचा तो सुतकी चेहरा बघवेना. दोन तीनदा विचारूनही मीनी गप्प. आता सरिताचा संयमच तुटला.

“मीनी तुला माझी शपथ आहे. तू अशी उदास का वाटतेस? मघापासून बघतेय मी तुला.” तरीही मीनी गप्प. “हे बघ मीनी रागावू नकोस विचारते म्हणून. राघवने फोन, मॅसेज वगैरे नाही ना केला?” सरिताने चिंतेच्या सूरात म्हटले. “नाही गं. माझ्या आयुष्यातला तो चैप्टर तेव्हाच क्लोज झालाय. राघव तसा डिसेंट माणूस आहे. आम्ही दोघांनी एकमेकांच्या सहमतीनेच ब्रेकअप केलाय. तसा तो आता परत माझ्या आयुष्यात डोकावणार नाही.”

“मग अशी गप्प का. आठवण येते का त्याची?” सरिताने आपुलकीने विचारले. “अगं नाही गं. मी म्हटलं ना, आता ते सगळं संपलय. मी माझा गतकाळ पूर्णपणे विसरूनच नव्या आयुष्याला सुरुवात करतेय.” “मग तू अशी उदास का?”

“अगं मलाच समजत नाहीय, मी तुला कशी सांगू ते?”

“म्हणजे?”

“अगं माझं लग्न अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलंय. जसजशी लग्नाची तारीख जवळ येतेय ना, उगाच माझं हृदय धडधडायला लागतं.”

“अगं तसं सगळ्याच मुलींच्या बाबतीत घडतं. नव्या विश्वात पाऊल ठेवतो ना आपण?” सरिताने मीनीच्या हातावर हात ठेवत म्हटलं. “तसं नव्हे गं.. आज पर्यंत मी माझं घर आणि मम्मी, पप्पांना सोडून कुठेच राहिले नाही. आमचं चौकोनी कुटुंब. कुठे गेलो तरी सकाळी जायचं, संध्याकाळी परत घरी. अगदी घरचा गणपती सुध्दा असला तरी रात्री आम्ही आमच्या घरी. मम्मी पप्पा दोघीही नोकरीला. कधी कुणाकडे जास्त येणं जाणं नाही. आम्हीच चौघे... त्यामुळे कुठेही गेले तर मला जरा अवघडल्यासारखंच होतं. चारचौघात मिसळायला वेळ लागतो आणि आता अनोळखी माणसांमध्ये कशी गं दिवस काढणार?” मीनीचे डोळे भरून आले.

“अगं पण प्रत्येक मुलीला लग्न होऊन सासरी जावंच लागतं. समाजाचा नियम आहे हा.”

“माहीत आहे गं... पण मी जरा बिथरलेय. तुला माहीत आहे ना आमच्याकडे कामाला वगैरे बाई आहे. किचनमध्ये वगैरे पाऊल ठेवायचा कधी प्रसंगच आला नाही. मी अभ्यास केला. चांगलं शिक्षण घेतलं. चांगली सरकारी नोकरी पण भेटली. यात घर आणि घरातल्या कामांत मी कधी अडकले नाही. रिटायर्ड झाल्यापासून मम्मी पप्पा घरीच असतात. नोकरीवरून आले की थकलेले असते. फ्रेश होऊन बसते तोच समोर चहा हजर असतो. थोडा वेळ टिव्ही बघितला, दुसऱ्या दिवसाची तयारी केली, मग जेवले आणि झोपले. सकाळी उठले की नाश्ता आणि डबा तयारच असतो, पण आता आयुष्य बदलणार.  नोकरीबरोबर घर संभाळणं, थोरामोठ्यांची काळजी घेणं, स्वतःचा डबा स्वतः बनवणं त्याचबरोबर इतरांच जेवण खाण, सणासुदीचं जेवण...  मला वाटतं हे सगळं मला झेपणार नाही गं. त्यात मला कुणी काही म्हटलं की लवकर मनाला लागतं. दिवसच खराब होऊन जातो.” मीनीने लांब सुस्कारा टाकत म्हटले.

एवढ्यात त्यांनी दिलेली ऑर्डर घेऊन वेटर आला.

“अगं एवढा विचार का करतेस? सगळं आपोआप शिकशील तू. तू स्वतःच्या पायावर उभी आहेस. तू पण एखादी बाई मदतीसाठी वगैरे ठेव की!” सरिताने वडा खात म्हटलं.

“अगं एवढं सोपं नसतं गं हे. तिकडे मला दुसऱ्यांच्या मर्जीने चालावं लागणार. पावलोपावली एडजस्टमेंट करावी लागणार. डोक्यात विचार जरी आला ना, मन सुन्न होतं...”

“ए येडे, टेंशन घेऊ नकोस गं. उद्याचा विचार करून आज कशाला खराब करतेस? तोंड बघ कसं उदास दिसतं. काल परवापर्यंतची अवखळ मीनी अचानक बदलली. लग्नाआधी हे हाल, मग काय? हे बघ थोडे दिवस लागतील जुळवून घ्यायला. मग आपोआप सवय होईल आणि तुझी सरकारी नोकरी पांघरूण घालील तुझ्या चुकांवर.” सरिताने डोळे मोडत म्हटलं.

“नाही गं.. कसली सरकारी नोकरी? माझा होणारा नवरा समर्थ पण चांगल्याच सरकारी पदावर आहे. आपल्या समजात मुलगी किती शिकलीय,  कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नसतं. तिला जेवण बनवता येतं की नाही, शिवणकाम येतं की नाही, रांगोळी घालता येते की नाही, पूजेची तयारी करता येते की नाही, साडी नेसता येते की नाही, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात.” मीनीने मान खाली घालत म्हटलं.

“होय, खरंय तुझं. पण मीनी, खरं सांगू अशा गोष्टींचा विचार करून तुझ्या आयुष्यातल्या या आनंदी क्षणावर विरजण घालू नकोस. मला वाटतंय तुझं कॉम्युनिकेशन गॅप झालंय. या गोष्टी मनातल्या मनात ठेवून तू नाहक मनातल्या मनात कुढत आहेस. तुझ्या मम्मीशी बोल. तुझ्या चुलत बहिणींची हल्लीच लग्नं झालीत. त्यांचा अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न कर आणि मुख्य म्हणजे तुझा होणारा नवरा समर्थशी या विषयावर बोल. तो तुला घरातल्या सगळ्याविषयी चांगली माहिती देईल.” सरिताने हसत हसत म्हटलं.

“समर्थशी बोलायला भीती वाटते. काही गैरसमज झाले तर?”

“नाही होत गं तसे गैरसमज... हे बघ तुझ्या मनात काय चाललय ते मी समजू शकते. मुलगी म्हटल्यावर एक दिवस मी पण यातून जाणार आहे. माझं तुला एवढंच सांगणं आहे की व्यक्त हो. प्रत्येकीच्या आयुष्यात लग्नाचा क्षण हा खास असतो. तू मुक्तपणे त्याचा आनंद घे आणि सुखी आयुष्य जग.” असं म्हणून बोलण्याच्या ओघात कधी वडा आणि चहा संपवला दोघींनाही कळलं नाही. मीनीने ही होकारार्थी मान हलवली. तिच्या चेहऱ्यावर पसरलेले चिंतेचे ढग जरासे ओसरू लागले. दोघीही उठल्या. काऊंटरवर जाऊन पैसे दिले. बाहेर आल्या. स्कुटर स्टार्ट केली व जवळच असलेल्या मॉलच्या दिशेने गाडी वळवली. 


डॉ. विभा लाड
(लेखिका गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे सहायक प्राध्यापिका आहेत.)