देविदास जानू गावकर

त्यांनी व्हिडिओद्वारे केलेली एक बातमी ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचली. तिथून त्यांना शोधत त्या गोव्यापर्यंत आल्या. आदिवासींच्या लोकजीवनाचे विविध प्रवाह जाणून घेतले आणि त्यांना सन्मानाने ऑस्ट्रेलियन कला केंद्रात व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले.

Story: प्रेरक सर्जक |
13th October, 11:59 pm
देविदास जानू गावकर

विदास गावकर ठरवून लिखाणाच्या क्षेत्रात वळले असे अजिबात नाही. त्यांच्याकडे ती प्रतिभा उपजत होती. त्यांचा जन्मच मुळी काणकोणचा. बड्डे खोतीगाव हा त्याचा जन्मगाव. डोंगररांगात... दगड धोंड्यांच्या सहवासात त्याचे बालपण गेले. खूप कठीण परिस्थिती... हलाखीचे दिवस काढले. आदिवासी वेळीप समाजात जन्मलेल्या देविदासला अन्यायकारक गोष्टीची चीड सुरुवातीपासूनच होती. दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे अकरावीत प्रवेश केला खरा, परंतु सभोवतालच्या निसर्गाची भुरळच मनांवर एवढी होती की शिक्षण अर्धवट सोडून भटकंती करणेच जास्त पसंत पडले. घरची गुरे आणि इतर कष्टाची कामे करताना निसर्गाशी त्यांचा जवळून संबंध आला.  आईवडील दोघांनाही निसर्गाचे बारकावे, जनावरांविषयीची सखोल माहिती असल्याने रानावनात त्यांच्या सोबतीने फिरताना वृक्षवेलींच्या औषधी गुणधर्माचे ज्ञान देविदास यांनाही जवळून झाले. 

त्यांच्याकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि स्पष्टवक्तेपणा होता. म्हणूनच सभोवताली जर कोठे काही चुकीचे घडत असेल, तर त्यांना स्वस्थ बसवत नसे. अशीच एकदा त्यांनी आपल्या गावातील एक बातमी ‘वाचकांचे विचार’ या सदरातून वर्तमानपत्रात दिली होती. संपादकांना ती आवडली. त्यात त्यांना त्यांच्या साहित्याची बीजे आढळली.  त्यांनी अशाच वेगळ्या बातम्या पाठविण्याचा आग्रह केला. त्यावेळेस त्यांनी लिहायला सुरुवात केली. त्यानंतर आणखीन काही तरी लिहावे म्हणून ते आपल्या समाजात जे काही सण, उत्सव साजरे केले जात होते त्यांचे संकलन करून त्या विषयीचे लिखाण जेव्हा प्रसिद्ध होऊ लागले तेव्हा हे काहितरी वेगळे आहे याची जाणीव वाचकांना होऊ लागली. एका अलक्षित समाजाचे चित्रण शब्दबद्ध केले गेले आणि एक वेगळी ओळख देविदास गावकर यांना प्राप्त झाली. 

पत्रकार म्हणून वर्तमानपत्रात लिखाण करून त्यांचे नाव एव्हाना झाले होते. आपल्याला लिहायचं आहे, पुस्तक प्रकाशित करायचे आहे हा विचार सुरुवातीला नव्हता. असाच एक योग त्यांच्या जीवनात जुळून आला. आदिवासींच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अनुबंधाविषयी एक सरकारी पातळीवर प्रकल्प करायचा होता.  त्यासाठी मदतनीस म्हणून दोन तरुण मुले हवी होती. ती शोधण्याची जबाबदारी देविदास यांच्याकडे सोपविण्यात आली. बऱ्याच जणांना या संदर्भात विचारण्यात आले मात्र पण सहजपणे कोणीही होकार दिला नाही. त्यावेळी स्वतः देविदास यांनी सांगितले की मी तयार आहे, झारखंडमध्ये जायला. त्यांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. हाच आत्मविश्वास त्यांच्या एकूणच साहित्यिक प्रवासाला पोषक ठरला. ते झारखंडमध्ये गेले. तिथे जी स्वयंसेवी संस्था कार्यरत होती, त्या संस्थेत सेबी रोड्रिग्स नावाची गोमंतकीय व्यक्ती काम करीत होती. त्यांच्याशी ओळख झाली. आदिवासी समाजामधून आलेला मुलगा म्हणून आदिवासींच्या जीवनावरील एक पुस्तक भेटीदाखल दिले. ते त्यांनी वाचले. वाचून आश्चर्य वाटले. त्या पुस्तकातून मांडलेला आदिवासींचा दैनंदिन जीवनक्रम तर देविदास गावकर स्वत: जगत होते. त्यांनी म्हटलं, ‘अरे हे असं तर मीही लिहू शकतो...’ तिथून मग लेख लिहिण्याचा प्रवास सुरू झाला.   

गोव्यात आल्यावर त्यांनी आपले लिखाण पुस्तक रूपाने आणण्याचे कार्य पुरे केले. ‘गोव्यातील आदिवासी-रचना आणि जीवनशैली’ हे त्यांचे पाहिले संशोधनात्मक पुस्तक गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयने प्रकाशित केले. आदिवासी समाजातील लोकजीवन, लोकश्रद्धा, लोकभाषा, रूढी, रिवाज, निसर्ग याचे वर्णन, माहिती यात आलेली. या निमित्ताने गोमंतकीय लोकभाषेचा सांस्कृतिक शब्दकोश तयार झालेला असून गोमंतकीय लोकसंस्कृती आणि आदिवासी समाजजीवनातील ही महत्त्वपूर्ण घटना ठरली. 

इयत्ता नववीत असताना शाळेच्या मासिकासाठी एक कविता लिहिली होती. ती त्यांची पहिली कविता. खूपजण लिहितात. ते कसे लिहीत असतील? आपण लिहिलेले छापून यायला हवे तर मग काय करायचे? असे प्रश्न त्यांना पडायचे. या त्यांच्या जिज्ञासेपोटी ते लिहिते झाले. त्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. पत्रकारितेच्या कार्यशाळा केल्या. त्याद्वारे लेखनाचे मर्म जाणून घेतले. गोव्यात एका खासगी दूरदर्शन वाहिनीमधील व्हिडिओ स्वयंसेवक संघटनेच्या माध्यमातून संशोधनात्मक बातमी लिहिण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. ही एक वेगळीच संधी होती. त्यांनी व्हिडिओद्वारे केलेली एक बातमी ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचली. तिथून त्यांना शोधत त्या गोव्यापर्यंत आल्या. आदिवासींच्या लोकजीवनाचे विविध प्रवाह जाणून घेतले आणि त्यांना सन्मानाने ऑस्ट्रेलियन कला केंद्रात व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले. 

देविदास गावकर यांची ही पाहिली परदेश वारी होती. प्रत्यक्षात महाविद्यालयात, विश्वविद्यालयात प्रवेश घेऊन मिळविलेल्या पदव्या त्यांच्याकडे नव्हत्या. परंतु प्रत्यक्षदर्शी जगणे आणि त्यातून आलेले शहाणपण, अनुभव, वास्तवाचे चटके त्यांच्या गाठीला होते. घरची गरिबी, आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शाळा अर्धवट सोडून उपजीविकेसाठी विविध कामे केली. “माझ्या हातात कला होती. मी चित्र काढायचो, जाहिरातींसाठी होर्डिंग्ज करायचो. सायन बोर्ड तयार करणे, बॅनर रंगवणे अशी कलात्मक कामे करून मी कमावत असे. थर्मोकोल वापरून सजावटीची कामे भरपूर केली. परंतु थर्मोकोल हे पर्यावरण पूरक नाही हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा तसे करण्याचे सोडून दिले. प्रोफेशनल फोटोग्राफी केली... असे काहीबाही करीत मी माझ्या गरिबीचे आर्थिक गणित सोडवायचा प्रयत्न करीत होतो. त्यासाठी अनेक हितचिंतक लाभले. माझी ओळख निर्माण झाली.” असे ते सांगतात.

गोमंतकीय विविध वर्तमानपत्रातून पत्रकार म्हणून लिहीत असताना त्यांना गणेश चतुर्थीवर एक विशेष लेख लिहायला सांगण्यात आला. आदिवासींच्या जीवनातील चतुर्थी त्यांनी यावेळी आपल्या लेखातून मांडली. त्यानंतर संपादकांनी आठवड्यातून एक कॉलम लिहिण्याची संधी दिली. ही संधी त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. त्यांनी आदिवासींच्या जीवनातील वस्तूसंस्कृती, जीवनपद्धती, लोकनृत्ये, रूढी, रिवाज, परंपरा यावर संशोधनात्मक लिखाण करून वेळीप आदिवासींच्या जगण्याचा परीघ, त्यांची संस्कृती सर्वदूर पोहोचविली. या त्यांच्या कामाची दखल गोव्यात आणि गोव्याबाहेरील अनेक शाळा, महाविद्यालयात, स्वयंसेवी संस्थांनी घेतली. त्यांची व्याख्याने आयोजित केली. मानसन्मान, पुरस्कार त्यांना मिळाले. 

लिहिण्या वाचण्याचे वेड त्यांना होतेच, पण वाट मिळत नव्हती. आर्थिक अडचण हा मोठा अडसर होता. तरीही ते वाचत, धडपडत असत. काहींनी त्यांच्या या कृतीला निव्वळ वेडेपणा असे बिरुद लावले. तरीही ते डगमगले नाहीत. पुढे पुढे चालत राहिले. लेखन, फोटोग्राफी, व्हिडिओतून व्यक्त होत गेले. त्यांची कवितांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आता समाजातील घटकांचा विचार... त्यांना न्याय मिळवून द्यायचा हा ध्यास आहे. लिहावंसं वाटत होतं पण कसं लिहायचं? या वेळी कवींद्र सरांनी लिहीत रहा म्हटले... पत्रकारिता करताना सोयरु वेळीप यांनी प्रेरणा दिली. विविध विषयांवर लिहिताना आदिवासी जीवनशैलीवर भर दे. हा वसा घेऊन पुढे जा असे राजेंद्र केरकर सरांनी म्हटले. 

असे कित्येक जण होते. त्यात वर्तमानपत्रांचे संपादक, पत्रकार, मित्रमंडळी, आईवडील, पत्नी असे सारे जवळचे दूरचे होतेच. बरे वाईट अनुभवत ते पुढे पुढे जात राहिले. ‘खोतीगाव वार्ताहर’ म्हणून सुरुवात केलेला हा एका पत्रकाराचा प्रवास मुळात कलासक्त चित्रकाराचा प्रवास होता. या दोन्हींमध्ये सुवर्णमध्य साधून गोव्यातील आदिवासींच्या जीवनशैलीचा संशोधनात्मक शोध घेत घेत लेखनाला वेगळा आयाम मिळवून देण्यासाठी देविदास गावकर आजही सक्रिय आहेत.


पौर्णिमा केरकर

(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, 

कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)