यूपीएससी आणि 'भारताचा इतिहास' : हमखास गुण

इ. स. १५ व्या शतकापर्यंतचा इतिहास त्यामुळे कळू शकतो पण त्याच्या आधीच्या कालावधीचा इतिहास नीट कळत नाही. यावर उपाय म्हणजे एक इतिहासाचा गट बनवून विद्यार्थ्यांनी चर्चा, नाटक, एकांकिकांच्या स्वरूपात खूप जुने विषय समजून घेणे.

Story: यशस्वी भव: |
13th October, 03:55 am
यूपीएससी आणि 'भारताचा इतिहास' : हमखास गुण

इतिहास हा विषय कदाचित काही मुलांना कंटाळवाणा वाटू शकेल तर काहींना अगदी आवडीचा. गंमत अशी आहे की इतिहास गोष्टीच्या रूपात समजून घेतला तर तो रंजकही वाटतो तसेच लक्षात देखील राहतो. नुसत्या वाचनाने इतिहास कळेल पण जोपर्यंत त्यावर चर्चा, विचार मंथन होणार नाही तोपर्यंत इतिहास समजला जाणार नाही. मुळात विविध घटना, सणावळ यामुळे इतिहास हा विषय किचकट आणि कंटाळवाणा वाटू शकतो. मात्र तो तितक्याच गोडीने समजून घेतला तर परीक्षेच्या दृष्टीने पैकीच्या पैकी गुण देणारा विषय ठरु शकतो. कोणा एका लेखकाने इतिहास लिहिला म्हणजे तो जशाच्या तसाच असेल असे पण नाही. अनेक इतिहासकारांचे मतभेद अनेक ऐतिहासिक मुद्द्यांवर आजही आहेत. जर विद्यार्थ्यांनी इतिहास या विषयावर चौफेर वाचन वाढवले तर तो एकत्रित ज्ञानाचा आधार तयार होऊ शकतो. इतिहास हा यूपीएससीसाठी एक महत्त्वाचा विषय आहे. 

भारताचा इतिहास हा विषय अतिशय रंजक आहे, परंतु वरच्यावर वाचत गेले तर डोळ्यांसमोर इतिहास येत नाही. केवळ घटनांची जंत्री होते. मग पाठांतरावर जोर द्यावा लागतो. याचे कारणही असे आहे की, आपल्या शाळेत या इतिहासातल्या वेगवेगळ्या विभूतींबद्दल / घटनांबद्दल इतिहास शिकवला त्यावर चित्रपट, मालिका अशी परिणामकारक निर्मिती झाली. त्यामुळे वाचताना आपल्या नजरेसमोर पात्रे उभी राहतात व त्यामुळे इतिहास नीट कळू शकतो. उदा. महाभारत वाचणे आणि महाभारत टीव्हीवर बघणे यात फरक आहे. दृश्यात्मक रुपात टीव्हीवरील पात्रे अजूनही लक्षात राहतात हाच. त्यामुळे इतिहास लक्षात राहतो. अशा पद्धतीनेही या विषयाची तयारी पक्की करता येऊ शकते.

इ. स. १५ व्या शतकापर्यंतचा इतिहास त्यामुळे कळू शकतो पण त्याच्या आधीच्या कालावधीचा इतिहास नीट कळत नाही. यावर उपाय म्हणजे एक इतिहासाचा गट बनवून विद्यार्थ्यांनी चर्चा, नाटक, एकांकिकांच्या स्वरूपात खूप जुने विषय समजून घेणे. बरेचदा असे विषय क्लिष्ट वाटतात. ते अशी चर्चांमधून समजतातही आणि लक्षातही राहतात.

यूपीएससीच्या तयारीसाठी एनसीईआरटीचे सतीश चंद्रा लिखित ‘Medieval India - A History Text Book of Class XIth’  हे पुस्तक वाचावे. पुस्तकात एकूण वीस प्रकरणे आहेत. ९ व्या आणि १० व्या शतकातील पूर्व भागातला भारत, प्रतिहार, राष्ट्रकुटांचा इतिहास यात आहे. चोला एम्पायर, दिल्लीची सल्तनत, गजनवी, खिलजी, तुघलक, विजयवाडा, बहामनी, पोर्तुगीज राजवट, मुघल सल्तनत, दक्षिण भारत, मुघलांची शासन व्यवस्था, सांस्कृतिक विकास, मराठ्यांचे साम्राज्य, शिवाजी महाराज, पेशव्यांचा इतिहास अशा विविध विभागात हे पुस्तक विभागले आहे. त्यामुळे कालखंडानुसार, वेगवेगळ्या घटनाक्रमानुसार हा अभ्यास करता येतो.

 मनापासून जर इतिहासाचा नीट अभ्यास केला, तर हा विषय कळायला तर सोपा जातोच परंतु युपीएससीमध्ये सुद्धा चांगले मार्क घेता येतात. लक्षात ठेवा इतिहास हा विषय नीट समजून घ्यायचा असेल तर इयत्ता पाचवीपासून इयत्ता बारावीपर्यंतची एनसीईआरटीची इतिहासाची पुस्तके नीट वाचून घ्यावीत याने आपले फाउंडेशन तयार होते व यूपीएससीमध्ये खूप फायदा होतो. इतिहास विषयांतर्गत कालखंडाचा व्यापक संदर्भ असल्याने तो कालखंडाच्या अनुषंगानेही समजून घेता येतो. जेणे करुन त्यातील घटनाक्रम सुटणार नाहीत व विषय व्यवस्थित आत्मसात करता येईल. याचबरोबर दीर्घोत्तरी प्रश्नांचा सराव करणे गरजेचे आहे. यूपीएससी मेन्स या परीक्षेत इतिहास या विषयावर लेखी पेपर असतो. ज्यात सविस्तरपणे उत्तर अपेक्षित असते. अशावेळी त्या त्या विषयाचा सखोल अभ्यासच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे बहुपर्यायी आणि दीर्घोत्तरी दोन्ही तऱ्हेच्या प्रश्नांची तयारी करावी लागते. त्यासाठी विषयाचा बेस महत्त्वाचा असतो. 


अॅड. शैलेश कुलकर्णी

कुर्टी - फोंडा

(लेखक नामांकित वकील आणि 

करिअर समुपदेशक आहेत.)