दिवस सुवर्ण अक्षरांतला...

गोवा मुक्त करण्यासाठीची ही कामगिरी भारतीय लष्कराने केवळ ४५ तासात यशस्वी केली. गोवा, दमण व दीववरील लष्करी कारवाईचे जनक भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा, दमण व दीव मुक्तीची घोषणा केली.

Story: इतिहासाची पाने चाळताना... |
13th October, 12:13 am
दिवस सुवर्ण अक्षरांतला...

गोव्याचे गव्हर्नर जनरल व्हासाल दा सिल्वा यांनी पणजी सोडून वास्को येथे आश्रय घेतला होता, तर पणजीच्या लष्कर प्रमुखाने शरणागती पत्र दिल्याने गोवा मुक्त झाल्यतच जमा होता. त्यामुळे आर्मी कमांडर लेफ्ट. जनरल जे. एन. चौधरी यांनी १९ डिसेंबर रोजी सकाळी गोव्याला भेट देण्याचा निर्णय घेतला. बाणस्तारी पूल उडवून दिल्याने तेथे अडकून पडलेल्या लष्करी तुकडीला हेलिपॅड बांधण्याचा आदेश मिळाला. रात्रीच्या अंधारात हेलिपॅड तयार झाले आणि सकाळी ९:३० वाजता आर्मी कमांडर लेफ्ट. जनरल जे. एन. चौधरी यांचे हेलिकॉप्टर तेथे उतरले. त्यापूर्वी बाणस्तारी बाजूला अडकून पडलेल्या जवानांच्या स्वागतासाठी लोक सजूनधजून आपल्या मोटारी वगैरे घेऊन आले होते. एकप्रकारे ते दिवाळी साजरी करत होते. या लोकांच्या सहकार्याने लाकडी ओंडके गोळा करून तराफे तयार केले आणि दुसरा तीर गाठला. होड्यातून सैनिक दुसऱ्या बाजूला आले. स्थानिक लोकांच्या वाहनातून सकाळी ८:३० वाजता पणजी गाठली. सचिवालय, न्यायालय,  इस्पितळ आदी सर्व आस्थापने ताब्यात घेतली.  ही प्रक्रिया सुरू असतानाच बेतीत अडकून पडलेल्या तुकडीला मांडवी नदी पार करून पणजीत प्रवेश करण्याचा आदेश मिळाला. या तुकडीने पोलीस मुख्यालय, तसेच इतर आस्थापने ताब्यात घेतली. आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जे. एन. चौधरी इतर अधिकाऱ्यांसह पणजीत पोहचले तेव्हा तिथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गोमंतकीयांनी सचिवालयावर भारतीय तिरंगा फडकविण्याचा आग्रह केला. ध्वजारोहणानंतर लेफ्ट. जनरल चौधरी आल्तीनोवरील लष्करी अधिकारी मेसमध्ये गेले व पणजीचे कमांडर मेजर आकासिओ न्युनीस तेनरेरो यांच्याकडून शरणागती स्वीकारली. गोव्याचे पोर्तुगीज मुख्य सचिव आबेल कुलासो यांची भेट घेतल्यानंतर ते बेळगावला परतले. दरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास लेफ्ट कर्नल आर. बी. नंदा दाबोळीला पोहोचले, तेव्हा गोव्याचे पोर्तुगीज लष्कर प्रमुख लेफ्टनंट कर्नल मार्किस द आंद्राद, गोव्याचे आर्चबिशपचे प्रतिनिधी फादर ग्रेगोरियो मागनो डिसौझा आंताव यांनी त्यांची भेट घेऊन गव्हर्नर जनरल व्हासाल दा सिल्वा शरणागती स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले.

पोर्तुगीज शिष्टमंडळ लेफ्टनंट कर्नल आर. बी. नंदा यांच्याशी बोलणी करण्यात व्यस्त असताना, चार अधिकारी व काही ‌सैनिक दोन लष्करी वाहनातून वास्कोच्या दिशेने बेफाम वेगाने चालले होते. मेजर अर्ल विलीयम कार्व्हालो यांच्या नेतृत्वाखालील या पथकात कॅप्टन आर. एस. के. बाली,  कॅप्टन आर. के. मेहता व इतर काही सैनिकांचा समावेश होता. पोर्तुगीज गर्व्हनर जनरल व्हासाल दा सिल्वा यांनी ज्या शिबिरात आश्रय घेतला होता, तेथे ही तुकडी सर्वप्रथम पोहचली. पोर्तुगीज गर्व्हनर जनरल व्हासाल दा सिल्वा यांना ताब्यात घेऊन युद्धबंदी करण्यासाठी त्यांची ही धडपड होती. हे धडाडीचे अधिकारी शिबिरात दाखल झाले. अर्ल याने मागचा पुढचा विचार न करता  सरळ शिबिरात प्रवेश केला. सुरक्षारक्षकांनी जीप न अडविल्याने ते अधिक उत्तेजित झाले व गव्हर्नर जनरल कुठे आहेत असा सवाल केला. तेव्हा त्यांनी गव्हर्नर जनरल बसले होते तिकडे अंगुलीनिर्देश केला. हे तीन अधिकारी व सैनिक सरळ आत घुसले आणि आणि मेजर अर्ल विलीयम कार्व्हालो यांनी गर्व्हनर जनरल व्हासाल दा सिल्वा यांना सल्युट ठोकला. गव्हर्नर जनरल ताडकन ऊभे राहिले आणि सल्युट ठोकला. भारतीय लष्कर शिबिराचा ताबा घेण्यासाठी आले असून सर्व पोर्तुगीज सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्याचा आदेश द्यावा असे आवाहन त्यांना केले. सर्व सैनिकांनी शस्त्रे खाली टाकून आपल्या बर्रॅकमध्येच राहावे असा आदेश दिला. गव्हर्नर जनरल व्हासाल दा सिल्वा यांनी त्यांच्या निवासस्थानी पाठवून बाहेर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. हा सगळा प्रकार घडेपर्यंत लेफ्टनंट कर्नल नंदा व इतर अधिकारी शिबिरात दाखल झाले. त्यांनी पोर्तुगीज लष्करी अधिकाऱ्याशी चर्चा करून रात्री उशिरा शरणागती स्वीकारण्याचे सोपस्कार पूर्ण केले. गव्हर्नर जनरलची मानाची तलवार लेफ्टनंट कर्नल नंदा यांनी ताब्यात घेतली.

...आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी रात्री सव्वा नऊ वाजता गोव्याचे मावळते गर्व्हनर मेजर जनरल व्हासाल दा सिल्वा यांनी गोव्यावरील ऑपरेशन विजय यशस्वी करणाऱ्या ब्रिगेडचे ब्रिगेडियर धिल्लोन यांच्याकडे शरणागती पत्र सुपूर्द केले. त्यामुळे पोर्तुगीजाची गोवा, दमण व दीववरील सुमारे ४५० वर्षांची सत्ता अखेर संपुष्टात आली. गोवा मुक्त करण्यासाठीची ही कामगिरी भारतीय लष्कराने केवळ ४५ तासात यशस्वी केली.

गोवा, दमण व दीववरील लष्करी कारवाईचे जनक भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा, दमण व दीव मुक्तीची घोषणा केली. भारतीय क्रांतीची अर्धवट राहिलेली कामगिरी भारतीय लष्कराने आज पूर्ण करुन भारतीय तिरंगा फडकवला अशी घोषणा कृष्ण मेनन यांनी केली.


गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)