सुरंगी

अशाच एक दिवशी मठात तिची ओळख एका बाईशी झाली. सुरंगीचा स्वभाव तिला आवडला. “माझा ही मुलगा पन्नाशीच्या आसपास आहे. त्याचंही लग्न झालेलं नाही. तू करशील का लग्न त्याच्याशी?” असा प्रस्ताव तिने सुरंगीसमोर ठेवला.

Story: कथा |
13th October, 12:02 am
सुरंगी

जिना उतरून सुरंगी रडत रडत जवळच्या बस स्टॉपवर आली. तिच्यासमोर तीन-तीन डांबरी रस्ते होते परंतु आयुष्याचा आता कोणता मार्ग निवडावा याचे उत्तर अद्यापही तिला सापडलं नव्हतं. येणारी जाणारी माणसे तिच्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. सुरंगी नजर चुकवत खाली मान घालून एकटक जमिनीकडेच बघत होती. पुढे काय करायचं? कुठे जायचं? पोटाची खळगी कशी भरायची? यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नव्हतं.

शेजारचे नेहमीच म्हणायचे, “सुरंगीच्या दैवाने जरी तिच्यावर दया दाखवली नसली तरी सुरंगीने कधीच दैवाला कोसले नाही.” खरंच! सुरंगी आपल्या नावाप्रमाणेच होती. आजूबाजूला कितीही काटेरी, बोचरी माणसे जरी असली तरी स्वत: फुलासारखी प्रसन्न राहून इतरांचे जीवन सुगंधित करत होती. पायाने अधू असलेली सुरंगी तिच्या आईवडिलांची धाकटी मुलगी होती. ऐन तारुण्यातच तिच्या आईवडिलांना देवाज्ञा झाली होती. घरात आणखी कोणीच नसल्यामुळे ती आपल्या विवाहित असलेल्या मोठ्या बहिणीकडे राहत होती. जोवर बहिणीची मुलं लहान होती, तोवर सगळं ठीक होतं. बहिणीची मुलं आता मोठी झालीत, ह्याची प्रचिती सुरंगीलाच नव्हे तिच्या शेजाऱ्यांना देखील येऊ लागली होती.

आयतं बसून खायची सुरंगीची वृत्ती कधीच नव्हती. परंतु तिच्या घरात राहण्याचा आता सगळ्यांनाच त्रास होऊ लागला होता. खुद्द तिच्या सख्ख्या बहिणीलासुद्धा. रोजच्याप्रमाणे उठून सुरंगी झटपट कामे आटपत होती. इथून तिथे, तिथून इथे नुसती धावपळ चालली होती. कुणाला चहा करून देत होती, कुणाचे केस विंचरत होती, मधेमधे हसतमुखाने शेजाऱ्यांची विचारपूस देखील करत होती.

सगळं सुरळीत चालू असताना मध्येच सुरंगीच्या भाच्याने तिच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. भाच्याने आईसारख्या मावशीवर हात उचलला. सुरंगीच्या सख्ख्या बहिणीने शिव्यांची लाखोली वाहिली. शेजारीपाजारी कुतूहलाने घरात असलेल्या प्रसंगाकडे पाहत होते. काही जण त्यांच्या भांडणाचा आसुरी आनंद घेत होते तर काहींना सुरंगीची कीव येत होती. तर काही जण भाच्यांचं समर्थन करत होते. प्रत्येक जण आपल्यासारख्या वृत्तीच्या माणसाची बाजू घेत होता. काहींना सुरंगी बरोबर वाटत होती काहींना तिची बहीण. त्यांच्या घरात नेहमीपेक्षा मोठे महाभारत घडले होते. बहिणीने सामानासकट लाथ घालून सुरंगीला घराबाहेर काढले.

बस स्टॉपवर उभी राहून सुरंगी रडत होती. तेवढ्यातच म्हापसाच्या दिशेने जाणारी बस समोर येऊन ठाकली. मागचा पुढचा विचार न करता, आपल्या सामानाचे पोटले घेऊन सुरंगी बसमध्ये चढू लागली. अधू पायामुळे हळूहळू चढणाऱ्या सुरंगीवर बस कंडक्टर ओरडला, “तुझ्यासोबत टाईमपास करायला इथे वेळ नाही. गाडीत बस लवकर." कंडक्टरचे ते कटू बोल ऐकून सुरंगीला आपले अश्रू आवरता आले नाही. घळाघळा डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. डोळ्यातील अश्रू लपवण्याचा तिने प्रयत्न केला. डोळ्यातल्या अश्रूंना डोळ्यांतच जिरवण्याचा तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला. नाही नाही म्हणता बाजूला बसलेल्या काकूची नजर तिच्या चेहऱ्यावर गेलीच. परंतु, अनोळखी व्यक्तीला सहानुभूती दाखवावी की नाही याचा विचार करत बसमधल्या काकू गप्पच राहिल्या. म्हापश्यात पोहोचल्यावर सुरंगीने आपल्या मैत्रिणीचे घर गाठले. तिला विनवणी करून तिच्या घरी चार दिवस घालवले.

मैत्रिणीच्या ओळखीने सुरंगीला एक भाड्याची खोली देखील मिळाली. सुरंगीकडे नोकरी नसल्याचे कळल्यावर दोन दिवसातच घरमालकाने सुरंगीला घराबाहेर काढले. भाड्याचं घर शोधताशोधता सुरंगीला नाकी नऊ आले. हे असलं रस्त्यावरचं जीवन जगावं तरी कशासाठी असे नकारात्मक विचार पहिल्यांदाच तिच्या मनात येऊ लागले. सुरंगी ही डळमळीत मनाची नव्हती. परिस्थितीमुळे काही काळाकरता तिच्या मनात वाईट साईट विचार आले. परंतु दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरले.

पुन्हा मैत्रिणीशी संपर्क साधून आणखी एक भाड्याचं घर शोधून काढलं. खोलीच्या मालकाला महिन्याचं भाडं वेळेत देण्याचा विश्वास दिला. महिना संपेपर्यंत फॅक्टरीत दहा-पंधरा हजारांची नोकरी मिळवली. पुन्हा सुरंगीचे जीवन वळणावर येऊ लागले. अधूनमधून शेजारची माणसे तिच्यावर संशय घेत होती. “ही मुलगी एकटी काय करते? ही विवाहित आहे की अविवाहित? धंदेवाली तर नसेल ना?” इत्यादी शंकेचे निरसन करण्याचे लोकांनी अनेक प्रयत्न केले. सुरंगीला मात्र ह्या अनोळखी माणसांच्या शंकांचे निरसन करणे योग्य वाटले नाही.

आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून सुरंगी दर गुरुवारी मठात येऊ लागली. तिथे तिचे मन रमू लागले. देवाच्या दर्शनाने तिला जगण्याचा नवीन अर्थ उमगला. नामजपाने सुरंगीला एक वेगळचं बळ दिलं होतं. सुरंगी एका पायाने अधू असल्याने तिचं लग्नाचं वय मागे पडलं होतं. तिने लग्नाचा विचारदेखील सोडून दिला होता. राहिलेलं जीवन कुणाचाही आधार न घेता अभिमानाने जगायचं असं तिने ठरवलं होतं.

आपल्या जीवनाचा सारथी ज्याने त्याने आपणच व्हायला पाहिजे. थोडासा शोधल्यावर कलियुगात मार्गदर्शन करणारा कृष्ण इतरांत नव्हे, स्वतःच्या मनातचं सापडेल. ह्या जगात कशाला हेवेदावे मनात ते बाळगायचे, कशाला निराशेच्या डोहात खोल खोल बुडायचे, हे जीवन केवळ चार दिवसाचे, आलो एकटे नि जाणारही एकटेच, मग कशाला जिवंतपणी मरत बसायचे, असे आशावादी विचार सदैव आपल्या मनात तेवत ठेवत सुरंगी देवाच्या भक्तीत मग्न झाली. वेळात वेळ काढून मठात येऊ लागली.  अशाच एक दिवशी मठात तिची ओळख एका बाईशी झाली. सुरंगीचा स्वभाव तिला आवडला. “माझा ही मुलगा पन्नाशीच्या आसपास आहे. त्याचंही लग्न झालेलं नाही. तू करशील का लग्न त्याच्याशी?” असा प्रस्ताव तिने सुरंगीसमोर ठेवला. सुरंगीला आश्चर्याचा धक्काच बसला. तिने आपण पायाने अधू असल्याचं त्या बाईला सांगितलं. त्या बाईलाही हे मान्य होते. एका अर्थाने ही देवाची कृपाच होती. सुरंगी लग्नासाठी तयार झाली अन् सुरंगीने जीवनाचा दुसरा डाव देवाच्या कृपेने जिंकून दाखविला.


अक्षता किनळेकर