संध्याकाळचे सात वाजत आले होते. बंगल्याच्या प्रशस्त पोर्चमध्ये पांढरी मर्सडीस थांबताच शोफरने अदबीने मागचा दरवाजा उघडताच आतून एक रुबाबदार सत्तरीकडे झुकलेले देखणे व्यक्तिमत्त्व बाहेर पडले. दरवाज्यावर त्यांच्या पी. ए. ने “रावसाहेब या” असे म्हणून स्वागत करून त्यांच्या हातातला बुके घेतला. रावसाहेब उर्फ नरहरीराव भाऊराव खोत. गोव्यातील प्रसिद्ध उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक, दानशूर, काय न किती! त्यांच्या गोवामुक्ती संग्रामातील स्वातंत्रसैनिक म्हणून असलेल्या योगदानाबद्दल आजच त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला होता.
पण सत्कारानंतर त्यांना काहीतरी बेचैनी सतत सतावत होती. खुर्चीत बसल्यावर त्यांनी डोक्यावरची पांढरी टोपी काढली आणि हातात घेऊन तिच्याकडे एकटक बघताना हळूहळू आपला भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागला. रावसाहेब, नरहरीराव, नरहरी, नरू. महाराष्ट्र गोवा सेनेवरील एका छोट्या गावातील भाटकार भाऊराव खोत यांच्या सहा अपत्यातील शेंडेफळ असल्याने त्याचे भरपूर लाड होत असत. त्यात गोरा गोमटा, देखणा पोर म्हणून अख्ख्या घराला कौतुक. सधन घरात जन्माला आलेल्या नरहरीचे इतर लाडावलेल्या मुलांचे होते तसेच झाले.
कशीबशी चार बुकं शिकल्यानंतर नरूने शाळा सोडली. दिवसभर गावात पोरा-टोरांबरोबर उणगेगिरी करणे, वडिलांच्या बटव्यातून पैसे चोरून तालुक्याच्या बाजारात मजा मारणे हे रोजचेच झाले तसेच तो गुंडगिरीकडं झुकला. भाऊ खूपच वैतागले. त्यामुळे आता नरूची उचलबांगडी म्हापश्यात त्याच्या मामांकडे होऊन मामांनी त्याला त्यांच्या दुकानात लक्ष द्यायला सांगितले. नरहरी रोज सकाळी वेळेवर दुकानात जाऊन व्यापार बघू लागला. भाचा सुधारतो म्हणून मामाही खूश झाला. दुकान भर बाजारात होते. हळूहळू नरूच्या बाजारात ओळखी वाढू लागल्या, गोरागोमटा पैसेवाला नरू मित्र म्हणून कुणाला नको होता?
त्यावेळी गोव्यात गोवामुक्ती संग्रामाचे वारे जोरात चालू होते. अनेक तरुण-तरुणी त्या संग्रामात सामील झाले. पोर्तूगीज सरकार उलथवून गोवा स्वातंत्र्य करण्याचा प्रमुख उद्देश होता. पोर्तुगीजही कमी नव्हते. मारहाण, तुरुंगवास, गोळीबार अशी अनेक प्रकारची त्यांची दडपशाही चालूच होती. त्यातच एकदिवस बातमी आली, की स्वतः नेहरूजी गोवा मुक्ती संग्रामाला बळ देण्यासाठी गोव्यात येणार आहेत. त्यामुळे पोर्तुगीज सावध होते.
आणि तो दिवस उजाडला. सकाळीच म्हापसा बाजारात वातावरण तंग होते. सगळीकडेच पोलीस दिसत होते. आज म्हापशात पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात आंदोलन करण्याचे ठरले होते. आंदोलनाला गर्दी जमावण्याचे काम कार्यकर्ते जोरात करत होते. नरुला त्याची कसलीच भणक नव्हती. रोजच्याप्रमाणे तो सकाळीच बाजारात आला तेव्हा कार्यकर्ते सगळ्यांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी गांधी टोप्या वाटू लागले. त्यातली एक नरुलाही मिळाली.
नरूने फुकट मिळालेली टोपी डोक्यावर चढवली. आधीच गोरा देखणा नरू, त्यात कासा मारलेले धोतर नेसलेला, टोपी घालताच तो एका नेत्यासारखा दिसू लागला. कार्यकर्ते जमू लागले. पोर्तुगीज सरकारच्या विरोधात घोषणा चालू झाल्या. नरुही त्यात सामील झाला. पण काय चालले आहे याची सुतरामही कल्पना त्याला नव्हती. अचानक काठ्यांचा आवाज ऐकू आला. पोर्तुगीज पोलीस आंदोलकांवर काठ्या चालवू लागले. काही आंदोलक पोलिसांच्या हाती लागले. कश्यासाठी पळायचे हे माहीत नसलेला नरूही त्यात सापडला.
सगळ्यांना पोलीस स्टेशनला आणून ओळख परेड झाली. प्रत्येकाला नाव विचारून पोलीस लिहून घेत होते. आता नरुचा नंबर आला. पोलिसांनी विचारले “What's Your name?” चौथी पास नरुने उत्तर दिले. “माय नेम नरू.” पोलिसांनी पटकन वर पाहिले. गोरागोमटा, देखणा, धोतर नेसलेला, वर गांधी टोपी या वेशातील नरुला न्याहाळत तो म्हणाला, “व्हॉट? नेहरू?” नेहरू गोव्यात येणार अशी वंदता होतीच. पोर्तुगीजांना ह्या नावाची खूप दहशत होती. नरुला इंग्रजी फारसे कळत नव्हते, तो परत म्हणाला. “येस आय नरू.” पोलिसांनी परत दोन वेळा विचारले, तरी त्याचे उत्तर कायम. आणि त्यात पोर्तुगीज पोलीस तो, तडक उठून वरिष्ठाकडे गेला. नेहरू हे नाव ऐकून तो इन्स्पेक्टर हातातली कामे टाकून आला. त्याने तोच प्रश्न नरुला केला. आता मात्र नरू खूप वैतागला. तो जोरात म्हणाला, “yes my name नरू!!!” इन्स्पेक्टरची खात्री झाली. आपल्यावर एवढ्या जोरात ओरडतो म्हणजे हा नक्कीच नेहरू आहे. त्यात गांधी टोपी डोक्यावर, नेहरूंचे जे वर्णन पोर्तुगीजांनी ऐकले होते त्यात नरू परफेक्ट बसत होता.
साक्षात नेहरू आपल्या ताब्यात आले ह्या नादात खूश झालेल्या त्या इन्स्पेक्टरने नेहरूंना पकडल्याच्या गर्वाने तोऱ्यात नरुला आपल्या गाडीत घालून पणजीला मुख्यालयात नेले. पणजीला मुख्यालयात परत ओळख परेड झाली. सगळे ऑफिसर्स पोर्तुगीज. भाषेचा प्रॉब्लेम! नरुचा नेहरू व्हायला वेळ लागला नाही. आता ही बातमी गव्हर्नरपर्यंत पोचली. गव्हर्नर हुशार. आपल्या अधिकाऱ्यांची कुवतही त्याला माहीत. खातरजमा करण्यासाठी त्याने दिल्लीतील आपल्या एका मित्राला ट्रंक कॉल लावला. त्यावेळी त्याला नेहरूजी दिल्लीत संसदेमध्ये भाषण करीत असल्याचे कळले. गव्हर्नरला घटनेचा अंदाज येताच तो सगळ्या ऑफिसर्सवर भडकला आणि रागाने निघून गेला.
झाले! आधीच भडकलेल्या पोलिसांना गव्हर्नरने फटकरल्यानंतर ते अजूनच तापले आणि तो सगळा राग त्यांनी नरुवर काढला. नरूचा अगदी फुटबॉल झाला. गोरागोमटा नरू लालबुंद टोमॅटोसारखा दिसू लागला. खरे नाव संगण्याची ही शिक्षा आपल्याला का मिळतेय, हेच त्याला कळेना. दोन दिवस यथेच्छ तुडवल्यानंतर नरुला आग्वाद जेलमध्ये पाठवून तिथे काळोखी कोठडीत ठेवण्यात आले. फक्त दोन वेळ जेवण, तेसुद्धा अतिशय निकृष्ट. आधीच माराच्या जखमा, त्यात असे जेवण. नरू अगदी खंगून गेला.
काही दिवसांनी अचानक भारतीय आर्मिने गोव्यावर हल्ला केला. पोर्तुगीज घाबरून पळून गेले. गोवा स्वतंत्र झाला. भारतीय आर्मी गोव्यात शिरली. सर्वप्रथम त्यांनी राजकीय कैद्यांना मोकळं केलं. कागदोपत्री नरुची नोंदणी राजकीय कैदी अशीच होती. नरुला बाहेर काढताच त्याची हालत बघून त्याला ताबडतोब योग्य ती ट्रीटमेंट दिली गेली. नरू सुधारू लागला. आर्मीने दिलेल्या कागदपत्रानुसार भारत सरकारने मुक्ती संग्रामात ज्या स्वातंत्र्य योध्यांची यादी केली, त्यात नरूचेही नाव होते.
कालांतराने गोवा सरकार स्थापन होऊन स्वातंत्र्यसैनिकांसाठी एक कमिटी स्थापन झाली. कमिटीने जे फायदे आणि आर्थिक लाभ दिले, त्यात नरुचेही नाव होते आणि असा नरुचा नरहरी झाला. शेवटी नरहरी भाटकाराचाच वंशज. बदलत्या वाऱ्याचा त्याला बरोबर अंदाज आला. आता आपण सुधारलो नाही, तर काही खरे नाही हे त्याला कळून चुकले. तशातच नरहरीला पेट्रोलपंपाचे लायसेन्स मिळाले. सरकारकडून कर्ज घेऊन नरहरीने धंदा चालू केला. मग मायनींग, नंतर हॉटेल, एक ना दोन; नरहरीचा नरहरीराव झाला.
आज नरहरी गोव्यातील एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून मिरवत होता. तसेच स्वातंत्र्यसैनिक ही बिरुदावलीही त्याच्यामागे होतीच आणि ह्या उत्कर्षाला कारणीभूत ठरली होती. ती आंदोलनात मिळालेली गांधी टोपी. ती घातली नसती, तर तो पोर्तुगीजांना नेहरू वाटलाच नसता आणि पुढचा इतिहास घडलाच नसता.
आयुष्यात नरू खूप पुढे गेला. नरहरी, नरहरीराव आणि आत्ता काय तर रावसाहेब खोत. ही सगळी त्या गांधी टोपीची किमया! सगळा भूतकाळ रावसाहेबांच्या डोळ्यासमोर झरकन उभा राहिला. रावसाहेबांनी परत एकदा त्या टोपीकडे पाहिले, तिला आदराने नमन केले आपले मन बेचैन का आहे हे त्यांना आता उमगले...
आपण चक्क गांधी टोपीशी प्रतारणा केली! जिच्यामुळे आपले आयुष्य बदलले, तिचे ऋण आता त्यांनी उतरवायचे ठरवले. त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्र्यांना फोन लावला. स्वातंत्र्य सैनिक म्हणून आजच त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला होता. मंत्र्यांनी फोन घेतला. रावसाहेबांनी विस्मृतीत गेलेल्या, स्वातंत्र्यसैनिकांकरता काहीतरी करण्याची कल्पना मांडली. सगळा खर्च आपण करणार असेही सांगितले. मंत्र्यांनी योजना उचलून धरली आणि दुसऱ्या दिवशी भेटायचे ठरविले.
आता रावसाहेब शांत झाले. गांधी टोपीच्या उपकाराची आज खरी परतफेड झाली.
रेशम जयंत झारापकर