भारतीय लष्कराबरोबरची लढाई आपण जिंकू शकत नाही ही गोष्ट १२ डिसेबर १९६१ पर्यंत हुकूमशहा डॉ. आंतोनिओ द ओलिव्हेरा सालाझार यांना स्पष्ट झाल्यामुळे १७ डिसेंबरला खास गुप्त संदेश पाठवून गोवा उद्ध्वस्त करण्याचा आदेश सालाझारने गोव्याचे गव्हर्नर जनरल व्हासाल दा सिल्वा यांना दिला.
‘आमचे सैन्य गोवा दमण व दीवमध्ये घुसले’ ही टाइम्स ऑफ इंडिया व भारतातील इतर सर्व दैनिकांची १९ डिसेंबर १९६१ ची हेडलाईन बातमी होती. ‘भारताचे पोर्तुगीज गोव्यावर आक्रमण’ अशी बातमी पोर्तुगालमधील सालाझारच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व वर्तमानपत्रांनी ठळकपणे दिली होती. गोव्यातील कथित भारतीय आक्रमणाच्या सुरस कथा जगभरात जाव्यात म्हणून पोर्तुगालने युरोपमधील १६ पत्रकारांना गोव्यात पाठविले होते. पोर्तुगीज वर्तमानपत्रातून घनघोर युद्धाच्या सुरस कथा प्रसिद्ध होत होत्या. पणजी व वास्को शहरात धुमश्चक्री चालू असून किमान १५०० भारतीय सैनिकांना कंठस्नान घालण्यात आले अशी धादांत खोटी बातमी पोर्तुगालमधील सालाझारच्या दैनिकांनी दिली होती. पोर्तुगीज सरकारने गोव्यात आणलेल्या इतर सर्व पत्रकारांनी वस्तुनिष्ठ बातम्या दिल्याने हुकूमशहा सालाझारची जगभर पूरी नाचक्की झाली. भारतीय सैन्याला पाहता सालाझारने कपाळावर हात मारला असणार! ‘हेची फळ काय मम तपाला?’ असे म्हणण्याची पाळी या महाधूर्त हुकूमशहावर आली. देवानेच त्यांना अद्दल घडवली.
गोव्यातील पोर्तुगीज फौजेची तयारी किती आहे किंवा त्यांच्याकडे किती यंत्रसामुग्री आहे याची खात्रीलायक माहिती भारतीय लष्कराकडे नव्हती. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो संघटना पोर्तुगालच्या मदतीला धावून येईल अशी हवा पोर्तुगालने जाणीवपूर्वक तयार केली होती. त्यामुळेच गोव्याच्या किनारपट्टीवर भारतीय नौदलाची १५ जहाजे पाळत ठेवून होती. पोर्तुगालकडे किमान ३-४ युद्धनौका असाव्यात असा अंदाज होता. प्रत्यक्षात आफोंस द आल्बुकेर्क ही एकच पुरातनकालीन युद्धनौका होती. भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यामुळे अर्ध्या तासात त्याने तळ गाठला. आंजेदीव बेट व वेर्णा येथे घडलेली एक किरकोळ चकमक वगळली, तर भारतीय लष्कराला प्रतिकार करण्याचा साधा प्रयत्नही पोर्तुगीज सैनिकांनी केला नाही.
गोव्यातील पोर्तुगीज लष्कराच्या युद्ध तयारीचा अभ्यास करण्यासाठी हुकूमशहा सालाझारने आपल्या युद्ध खात्यांच्या अवर सचिवाला १९६० मध्ये गोव्यात पाठविले होते. भारतीय लष्कराची ताकद व तयारीचा अभ्यास केल्यानंतर त्या अवर सचिवाने आपला अहवाल सादर केला. गोव्यात असलेले पोर्तुगीज लष्कर सोडाच, पोर्तुगालचे सगळे लष्कर गोव्यात पाठविले तरी आठ दिवसांपेक्षा अधिक काळ आम्ही खिंड लढवू शकणार नाही असे या अहवालात म्हटले होते. हा वस्तुनिष्ठ अहवाल हाती पडताच पाषाण ह्रदयी सालाझाराने गोव्याची आशा सोडली. गोव्यातील लष्करात कपात केली. आफ्रिकन सैनिकांना मायदेशी पाठविले. ५५ वर्षांवरील स्थानिक सैनिकांना स्वेच्छानिवृत्ती योजना देऊन घरी पाठविले. गोव्यावर पाणी सोडावे लागले तर भारताच्या हातात केवळ राखच पडेल अशी व्यवस्था करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
गोव्यावरील लष्करी कारवाई थोपविण्यासाठी अमेरिकेने केलेले सर्व प्रयत्न फोल गेल्याने गोवा बेचिराख करण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेण्यात आला. सुमारे १० टन स्फोटके विमानाने गोव्यात पाठविण्यात आली. या विमानांना लिबियातील अमेरिकन हवाई तळावर उतरण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली त्यामुळे स्फोटके भरलेली ही दोन्ही विमाने परत पोर्तुगालला गेली. तेथून खासगी विमान भाडेपट्टीवर घेऊन सोरपातेल या डुकराच्या मांसापासून बनविलेल्या खाद्य पदार्थांच्या बरोबर स्फोटके पाठविण्यात आली. पाकिस्तानने ही स्फोटके कराची विमानतळावरुन गोव्यात पाठविण्यास नकार दिला व सर्व स्फोटके जप्त केली. हे विमा न दाबोळी विमानतळावर उतरले तेव्हा लष्करी अधिकारी स्फोटके ताब्यात घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना केवळ सोरपातेल सापडले. ही स्फोटके गोव्यात पोहचली असती, तर गोवा १८ डिसेंबरला बेचिराख झाला असता.
भारतीय लष्कराबरोबरची लढाई आपण जिंकू शकत नाही ही गोष्ट १२ डिसेबर १९६१ पर्यंत हुकूमशहा डॉ. आंतोनिओ द ओलिव्हेरा सालाझार यांना स्पष्ट झाली होती. त्यामुळे १७ डिसेंबरला खास गुप्त संदेश पाठवून गोवा उद्ध्वस्त करण्याचा आदेश सालाझारने गोव्याचे गव्हर्नर जनरल व्हासाल दा सिल्वा यांना दिला.
या आदेशाची अंमलबजावणी करणे म्हणजे गोव्याचा विध्वंस अटळ होता. बराच वेळ बसून विचार केल्यावर आपला अन्नदाता हुकूमशहा सालाझार यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय त्यांनी जड अंतःकरणाने घेतला. वास्कोतील पेट्रोल टाक्या, पुरातन वास्तू, सरकारी इमारती आदी सर्व ठिकाणी खंदक खणून सुरुंग पेरण्यात आले. एक कळ दाबताच सारा गोवा उद्ध्वस्त होणार होता. १८ डिसेंबरला संध्याकाळी ३ वाजण्याच्या सुमारास गोव्याचे आर्चबिशप जुझे व्हिएरा आल्वेनारझ मुख्य सचिव आलबेल कुलासो इत्यादिनी गव्हर्नर जनरल व्हासाल सिल्वा यांची भेट घेऊन चर्चा केली व गोवा विध्वंसापासून वाचला.
गुरुदास सावळ