चोरट्यांना दयामाया नकोच!

दक्षिण कोरियासारख्या देशात काही ठराविक गुन्ह्यांमधील संशयितांच्या हाता पायात जीपीएस पद्धत असलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवलेले असतात. ज्याच्या आधारे त्याला ट्रॅक केले जाते. अशा आधुनिक गोष्टींचा वापर आपल्याकडे अशक्य असला, तरी गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिसांची यंत्रणा विशेष करून स्थानिक गुप्तचर यंत्रणा (लोकल इंटिलिजेन्स) सक्रिय करण्यासाठी त्या कामी जास्त पोलिसांना नेमण्याची आवश्यकता आहे.

Story: उतारा |
13th October, 12:16 am
चोरट्यांना दयामाया नकोच!

गोव्यात फक्त घरफोड्यांचे प्रकार जे पोलीस स्थानकांमध्ये नोंद होतात, ते दरवर्षी सव्वाशेच्या आसपास होत असतात. यावेळी पर्वरी पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे सत्तरपेक्षाही जास्त चोऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘मास्क मॅन’च्या टोळीचा पर्दाफाश झाला. एकेक करता रोज नवनवे खुलासे होत आहेत. चोरांच्या टोळीने दिलेल्या माहितीच्या आधारे, यापूर्वी ज्या पोलीस स्थानकांच्या हद्दीत चोऱ्या केल्या त्या पोलीस स्थानकांमध्ये आता नव्याने गुन्हे नोंद होत आहेत. यावरून अनेक लोक पोलीस तक्रारही करत नाहीत असेही दिसून येते. यावरून प्रत्यक्षात घरफोडीचे प्रकार नोंद होतात त्यापेक्षा ते दुप्पट असू शकतात. पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करायलाच हवे. उत्तर गोव्याचे अधीक्षक अक्षत कौशल यांच्या नेतृत्वाखाली पर्वरी पोलिसांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. रोज पोलिसांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचीही दखल घ्यायला हवी. त्याचसाठी आजचा उतारा.

चतुर्थीच्या दिवसांतली गोष्ट. डिचोली तालुक्यातील एका गावात चोरी झाली. मुख्य घरात गणपतीच्या पूजेसाठी जाऊन अवघ्या काही वेळात परत येईतोपर्यंत घराचे मुख्य दार फोडून चोरट्यांनी सहा-सात लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. शेजारच्या घरातही चोरी केली पण तिथे एक दोन वस्तूच त्यांच्या हाती लागल्या. एका गावात घडलेली ही घटना. पोलीस स्थानकात तक्रार नोंद झाली. आजपर्यंत चोर सापडले नाहीत. सीसीटीव्ही नसल्यामुळे तपासही पुढे गेला नाही. त्या भागात परप्रांतीय राहत असले तरी संशय कोणावर घ्यायचा? काहीच धागेदोरे हाती लागले नाहीत. जवळच्याच मुख्य घरातून आपल्या घरापर्यंत घरमालक येण्याआधी चोरांनी इतक्या वेगाने सफाई केली की जवळपास कोणालाच ते दिसलेही नाहीत. आधीच खाणबंदीच्या काळात नोकऱ्या गेल्यामुळे वैतागलेल्या कुटुंबाला हा दुसरा धक्का होता. अशाच प्रकारे त्या परिसरात यापूर्वीही चोऱ्या झाल्या, पण चोर सापडेनात. ही गोष्ट फक्त त्या एका गावातील नाही. गोव्यात घरफोड्या करणाऱ्या चोरांनी शेकडो, हजारो लोकांची जन्माची कमाई चोरून आपली घरे भरली. चोरांनी अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा केला. ते घर, फ्लॅट, बंगले काहीच सोडत नाहीत. एका चोरीत पकडलेल्या चोरांना लगेच जामीन मिळतो आणि दुसरी घरे फोडण्यासाठी ते मोकळे होतात. अशा चोरांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडे यंत्रणा नाही किंवा स्थानिक गुप्तचर यंत्रणाही मजबूत नाही. त्यामुळे सराईत चोर घरे फोडत जातात. शिवाय शेजारील राज्यांमधून आलेले चोर इथे चोरी करून लगेच दुसऱ्या राज्यांत पळ काढतात. असे चोर पकडलेच तर त्यांना पटकन जामीन मिळतो. कोणाच्याही परिस्थितीचा विचार न करता जिथे सहजपणे घुसून चोरी करता येते अशा सर्व घरांना लक्ष्य करून चोर घरे लुटत असतात. पोलिसांत काहीवेळा असे गुन्हे घरफोडीचे प्रकार म्हणून नोंद होतात. काहीवेळा दरोडा, तर काहीवेळा चोरीचे प्रकार म्हणूनही नोंद होतात. मोठा दरोडा पडण्याचे प्रकार कमी असले तरी घरफोडीचेच किंवा घरांत चोरीचे पोलीस स्थानकांत नोंद असलेले गुन्हे हे दरवर्षी सुमारे सव्वासेच्या आसपास असतात. शिवाय पोलीस स्थानकांमध्ये चोरीचे जे गुन्हे नोंद असतात त्यातही काही प्रमाणात घरांतील चोरीबाबतचे अनेक गुन्हे असतात. पण निव्वळ घरफोडी, घरातील चोरी आणि दरोड्याचे प्रकार २०२१, २०२२, आणि २०२३ या तीन वर्षांमध्ये ४०४ च्या आसपास आहेत. २०२१ मध्ये राज्यात घरफोडीचे १३३ गुन्हे नोंद आहेत. त्याचवर्षी दरोडे २८, तर मोठी डकैती एक आहे. २०२२ मध्ये १०३ घरफोड्या, १४ दरोडे आणि चार डकैती आहेत. २०२३ मध्ये ११३ घरफोड्या व ११ दरोडे आहेत. याच तीन वर्षांमध्ये चोरीच्या घटना पाहिल्या तर २०२१ मध्ये ५६४ चोऱ्या, २०२२ मध्ये ५४९ तर २०२३ मध्ये ४६१ चोऱ्यांची नोंद आहे. पोलीस नोंदीत घरफोडी, दरोडे, डकैती आणि चोऱ्या असे वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे चोरीच्या प्रकरणांतही घरफोडीचे प्रकार असू शकतात. दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या, घरफोडी, दरोडे होतात पण पोलिसांच्या हाती बहुतेक चोर लागतच नाहीत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, गुन्ह्यांमधून जामिनावर सुटलेले चोर यांच्यावर पाळत ठेवणे, स्थानिक गुप्तचर यंत्रणा अधिक मजबूत करणे अशा काही गोष्टींवर भर देण्याची गरज आहे. दक्षिण कोरियासारख्या देशात काही ठराविक गुन्ह्यांमधील संशयितांच्या हाता पायात जीपीएस पद्धत असलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवलेले असतात. ज्याच्या आधारे त्याला ट्रॅक केले जाते. अशा आधुनिक गोष्टींचा वापर आपल्याकडे अशक्य असला, तरी गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिसांची यंत्रणा विशेष करून स्थानिक गुप्तचर यंत्रणा (लोकल इंटिलिजेन्स) सक्रिय करण्यासाठी त्या कामी जास्त पोलिसांना नेमण्याची आवश्यकता आहे.

घरफोडीच्या प्रकरणांतील पोलिसांची यशस्वी कारवाई पाहिली तर ती दरवर्षी सुमारे पन्नास टक्के यशस्वी झाली आहे. म्हणजे पन्नास टक्के घरफोडी प्रकरणातील तपास यशस्वी झाला नाही. पकडलेल्या चोरांवरील आरोप सिद्ध होण्याचे प्रकार तर अगदीच कमी आहेत. ५० टक्के चोरीच्या प्रकरणांतील चोर सापडत नाहीत. सापडलेल्या ५० टक्क्यांपैकी अवघ्या दहा टक्क्यांच्या आसपास चोरांना शिक्षा होते. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिसांनी आपली स्थानिक गुप्तचर यंत्रणा सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. पकडलेल्या चोराची पार्श्वभूमी तपासताना त्याने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळवून त्याला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. फक्त आलेल्या तक्रारींचाच तपास करण्यापेक्षा त्याचे पूर्वीचे कारनामे तपासून त्याला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले तर गुन्हे मोठ्या प्रमाणात कमी होतील.

पर्वरी पोलिसांनी पकडलेल्या ‘मास्क मॅन’च्या टोळीने कित्येक घरे फोडली. त्यांनी लुटलेल्या दागिन्यांना वितळवण्यासह ते विकण्यासाठी कारागीर आणि सराफही त्यांच्या टोळीचे सदस्य झाले. एक सराफ कमी पैशांमध्ये दागिने विकत घ्यायचा आणि दुसरा कारागीर दागिने वितळून द्यायचा. हेच सराफ पोलिसांनी पकडल्यानंतर ‘मी नाही त्यातला’ म्हणून वर्तमानपत्रांच्या बातमीदारांना दोष देतात. मागे महाराष्ट्रातील पोलिसांनी अशाच प्रकरणात एका प्रतिष्ठीत सराफाच्या मुसक्या आवळल्या होत्या. गोव्यातील कितीतरी सराफांना इतर राज्यांतील पोलीस चौकशीसाठी घेऊन गेल्याचे अनेक प्रकार आहेत. काहीजणांवर गुन्हेही नोंद झाले आहेत. तरीही गोव्यातील काही सराफ चोरीचा माल कमी दरात घेऊन जास्त पैसे कमावण्याच्या नादात प्रतिष्ठा गमावून बसतात. काही सराफ विकणाऱ्याने चुकीची माहिती दिल्यामुळे विकत घेत असतील. ते अपवाद आहेत. पण वारंवार ठराविक माणसांकडून दागिने विकत घेणारा सराफ हा टोळीचाच भाग आहे हे स्पष्ट होते. पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्या ‘मास्क मॅन’ टोळीचा म्होरक्या मारियो बाप्तिस्तकडून पर्वरी पोलिसांनी सगळे कारनामे वदवून घेतले. हा मारियो बाप्तिस्त पूर्वी कधीकाळी सासष्टीतच चोऱ्या करायचा. त्याचा एक सहकारी विदेशात नोकरीला गेला. त्यानंतर त्याने जुन्या सहकाऱ्याचा भाऊ म्हणजेच त्याचा सध्याचा सहकारी मोहम्मद शेखमिया याच्या सहाय्याने सासष्टीबाहेर चोऱ्या करण्याचे सत्र सुरू केले. बार्देश, तिसवाडी, फोंडा, मुरगाव या तालुक्यांमध्ये त्यांनी चोऱ्या केल्या. याचवर्षी या टोळीने सत्तरच्या आसपास घरे फोडली आहेत. त्यांनी केलेल्या चोऱ्यांपैकी पोलिसांत फक्त २२ गुन्हे नोंद आहेत. आता जशी माहिती समोर येते, त्याप्रमाणे पोलीस नव्याने गुन्हे नोंदवत आहेत. टोळीने आतापर्यंत सुमारे २२ घरे दाखवली आहेत. या चोरांनी लक्ष्य केलेली शक्य तितकी जास्त घरे शोधण्यासाठी पर्वरी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. चोरीचा माल कुठे विकला, त्याची माहिती मिळवून ते दागिने व इतर साहित्य परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. यामध्ये सहभागी असलेल्या सराफ किंवा कारागिराने जाणूनबुजून चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केलेली असल्याचे सिद्ध झाल्यास या दोघांना दया दाखवण्याची गरज नाही. तेही चोरांइतकेच गुन्हेगार ठरतात. ज्या पद्धतीने पर्वरी पोलिसांनी कामगिरी केली आहे त्यातून लोकांना आपला चोरीला गेलेला माल परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तो माल मिळो अथना न मिळो पण या चोरांना कायमची अद्दल पोलिसांनी घडवावी. पुन्हा हे चोर कोणाचे घर फोडण्याचे धाडस करणार नाहीत अशा पद्धतीची कारवाई व्हायला हवी. पर्वरी पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्यातून इतर पोलीस स्थानकांनीही बोध घ्यावा. आपल्याला सापडलेला चोर एकाच चोरीतील असेल म्हणून दुर्लक्ष न करता त्याची कुंडली मिळवली तर त्याला शिक्षा करण्यासाठी सोपे जाईल. घरे फोडून, लूट करून लोकांच्या स्वप्नांचा चुराडा करणारे, लोकांची जन्मभराची कमाई लुटणारे चोर दयेला निश्चितच पात्र नाहीत.


पांडुरंग गांवकर

९७६३१०६३००

(लेखक दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.)