फ्लावरचा पराठा

Story: चमचमीत रविवार |
13th October, 12:09 am
फ्लावरचा पराठा

साहित्य : 

अर्धा कप गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, पीठ भिजवण्यासाठी पाणी, तेल, जिरं, बारीक चिरलेला एक वाटी कांदा, किसलेलं आलं, ३-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक कप किसलेला फ्लावर, एक चमचा हळद, एक चमचा धणेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर.

कृती :  

प्रथम पिठात चवीनुसार मीठ घालून थोडा थोडा पाणी घालून जास्त घट नाही आणि जास्त माऊ नाही असं पीठ मळून घ्या. या पिठाच्या गोळ्याला तेल लावून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवा. एका भांड्यात तेल घेऊन त्यात तीस सेकंद जिरं भाजून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांद्याला सोनेरी रंग आला, की त्यात किसलेले आले आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून सर्व एकत्र करा. त्यात किसलेला फ्लावर टाकून सर्व मसाले, हळद, धणेपूड, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकत्र करा. मीठ टाकल्यामुळे फ्लावरला पाणी सुटतं. ते सर्व पाणी सुकेपर्यंत शिजवून घ्या. मग बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाका व सर्व एकत्र करा. आता पराठा लाटण्यासाठी घ्या. पीठ पुन्हा एकदा मळून घेऊन एकजीव करा. मग पिठाचा छोटासा गोळा घेऊन सुक्या गव्हाच्या पिठात हा गोळा बुडवून, मध्ये जाड व बाजूला पातळ अशी छोटी पोळी लाटा. त्यावर भाजी ठेवून पूर्ण पोळीच्या कडा बंद करा आणि उरलेलं पीठ काढून घ्या. पुन्हा एकदा हा गोळा गव्हाच्या पिठात बुडवून छान गोलाकार लाटून घ्या. पराठा जरा जाडसर लाटा. आवडत असेल, तर लाटताना थोडं सांभाळून हात चालवून, तो फाटू न देता पातळही करू शकता. तवा गरम करून त्यावर पराठा घाला व गॅस जरा मंद ठेवा. गोल्डन ब्राऊन रंग आला की परतून घेऊन यावर बटर टाका व ताटामध्ये काढून घ्या.


संचिता केळकर