रेडिओ व भजनभक्ती – एक शक्ती

संत कवींच्या रचना मातब्बर संगीत कलाकारांनी रेडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. ज्या काळी संगणक नव्हता, टेपरेकॉर्डरही सर्वांपर्यंत पोहोचले नव्हते, डिजिटल युग तर नव्हतंच आलं, त्या काळी रेडिओनं ही सेवा बजावली हे विशेष!

Story: ये आकाशवाणी है |
13th October, 12:11 am
रेडिओ व भजनभक्ती – एक शक्ती

काही श्रोते आपला ट्रान्सिस्टर पहाटे लावून ठेवतात. गाणी, विचार, भजनं, भाषणं चालू असतात. आठ वाजता बातम्या येतात. हे सर्व चक्र घड्याळाच्या हुकुमाखाली मिनिट टू मिनिट होत असतं. त्या अनुषंगाने गृहिणी, मुली आपापली कामे उरकून घेत असतात. नाश्ता, टिफिन तयार करणं, आंघोळी, पूजा ही सर्व कामे या ट्रान्सिस्टरच्या म्हणजे रेडिओच्या घड्याळाप्रमाणे हळूहळू पुढे सरकायला लागतात. 

आमच्या लहानपणी एक काळ होता, आज गुरूवार आहे, ते रेडिओमुळे सकाळीच कळत असे. दत्त भजने प्रसारित व्हायची. ‘दत्त दिगंबर दैवत माझे’ हे दत्त भजन हमखास यायचं. गायक होते सुप्रसिध्द आर. एन. पराडकर. हे संस्कार माझ्यावर झाले. ती भजनं लागल्यावर दत्तभक्त आजोबा (माईचे वडील) आनंदून जायचे. गुणगुणत भक्तीरसात डुंबून जायचे. त्यांचा दिवस गुरूवारी सकाळीच रेडिओ भजन स्नानाने सोनेरी व्हायचा. संध्याकाळी ते ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा जप करायचे व परत येरझाऱ्या घालत ही भजने गायचे. दत्तभजने अजरामर केली ती आर. एन. पराडकर यांनी. पराडकरांच्या आवाजात एक मऊसूत मुलायम भक्तीभाव होता. आळवणी, आर्तता, नम्रता, शरणागती अनुभवायला यायची. त्यांना शास्त्रीय गायकीची बारीक जाण होती. त्यांची अऩेक भजने संगीत रागांवर आधारित आहेत. 

महाराष्ट्रात आणि गोव्यात ही दत्त भजने गुरूवारी प्रसारित होत व म्हणून ती अफाट लोकप्रिय झाली. ही रेडिओची शक्ती होती. भक्ती मजबूत करणारी शक्ती. रेडिओ, दत्तभजनं आणि पराडकर हे तीन व्हेरियेबलचं एक सुंदर, पक्कं समीकरण होतं. ‘माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया’, ‘मज भेटूनी जा हो दत्तगुरू अवधूता’, ‘आज मी दत्तगुरू पाहिले’, ‘जयजय दत्तराज माऊली’, दत्ताची पारंपरिक आरती ही त्यांची भजने कानात गुंजन करत आहेत. पराडकरांनी रेडिओ माध्यमातून घातलेली ही अवीट गोडीची मोहिनी अंगागांत, रंध्रारंध्रात भिनून राहिली. 

एकदा नरसोबावाडीला गेलो होतो. तिथं एका दुकानात पराडकरांची ही गाजलेली सर्व भजने सीडीरूपात मिळाली. हर्ष झाला. गाडीत ऐकतच आलो. आजोबांच्या संस्कारांची आठवण झाली. मी फार लहान होतो तेव्हा म्हार्दोळला आर. एन. पराडकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. जायांची पूजा, की कोजागिरी पौर्णिमा ते कारण आठवत नाही. महालसा मंदिराच्या मंडपात मैफील होती. आजोबा मला घेऊन गेले. मी असेन सात वर्षांचा. बाप रे! तुडुंब गर्दी!!! आजोबांनी मला प्रेमाने उचललं आणि दोन मिनिटं पकडून धरून पराडकरांचं भक्तीभावानं गातानाचं दर्शन घडवलं. ते अतीव आनंदाने गात होते. ‘दह्या दुधाची करतो चोरी, नंदाच्या घरी, गवळणी हो, जाऊ नका बाजारी...’ ही त्यांची एन्थम सारखी गाजलेली गवळण चालू होती. गवळणीमध्ये साखरेच्या पाकासारखा गोडवा कसा आणावा याचा तो वस्तुपाठ होता.  

आर. एन. पराडकर म्हणजे रघुनाथ नारायण पराडकर. आकाशवाणीचे ते स्टाफ आर्टिस्ट होते. त्यांनी भावगीते, शास्त्रीय गायनही केले आहे. पण दत्तभजनं सुरू केल्यावर व ती आकाशवाणीच्या केंद्रावरून प्रसारित होत राहिल्याने ते गोवा व महाराष्ट्र व इतरही प्रांतात लौकिकास पावले. हल्लीच रविप्रकाश कुलकर्णी यांच्या एका लेखातून पराडकरांविषयी सविस्तर माहिती मिळाली आणि आठवणींना उजाळा मिळाला.

सकाळच्या सत्रात आकाशवाणीच्या सत्रात अप्रतिम व माधुर्याने भरलेली भक्तीगीते यायची. त्यात लता मंगेशकरांचं ‘प्रभू तुम अंतर्यामी दया करो हे स्वामी’ हे भजन यायचं. काम सोडून रेडिओ सेटकडे येऊन ते कानांच्या फुलांनी श्रवण करावं असं वाटे. आत्यंतिक गोड. भगवंताला भक्त प्रार्थितो – दयाघना तूं अंतर्ज्ञानी आहेस. तुला सर्व माहीत आहे. मला प्रसाद दे, आशीर्वचन दे, अभयदान दे. लक्ष्मीशंकरांचं एक भजन यायचं. संत कबीरांचं. ‘माटी कहे कुंभारसे तू क्या रोंधे मोहे, एक दीन ऐसा आयेगा मैं रूंधूंगी तोहे...’ पराकोटीचं गोड गोड. हृदयातील प्रार्थना, त्यातील विलंबित लय निर्मळ पाण्याच्या पात्रासारखी संथ, शांत असायची. माती कुंभाराला इशारा देते, तू मला तुडवतोस का? एक दिवस असा येईल मी तुला मातीत तुडवीन. हे भजन ऐकताच मूड व भावविश्वाला एक आगळी कलाटणी मिळायची जी तंद्री दिवसभर भारित होऊन अभिसरीत होत राहायची. रेडिओवरील भजनांचा हा आनंद हृदय गाभाऱ्यात तसाच आहे. 

‘श्रीरामचंद्र कृपालू भज मन...’ हे आणखीन एक भजन यायचं. ते ऐकताना मन साबणाने धुऊन स्वच्छ झाल्यासारखे वाटे. संत कवींच्या या रचना मातब्बर संगीत कलाकारांनी रेडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या. ज्या काळी संगणक नव्हता, टेपरेकॉर्डरही सर्वांपर्यंत पोहोचले नव्हते, डिजिटल युग तर नव्हतंच आलं, त्या काळी रेडिओनं ही सेवा बजावली हे विशेष!


मुकेश थळी 

(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)