रोडकिल : एक गंभीर समस्या

माणसाने स्वतःच्या सोयीसाठी वाहनाचा शोध लावला. कमीतकमी वेळेत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाता यावे म्हणून महामार्ग उभारले. स्वत:च्या सोयीसाठी अत्याधुनिक साधन-सुविधांची निर्मिती करत असताना आपण निसर्गातील इतर घटकांचे अस्तित्व धोक्यात आणत आहोत हे तो सपशेल विसरला.

Story: साद निसर्गाची |
13th October, 03:57 am
रोडकिल :  एक गंभीर समस्या

परवा मार्शेलहून साखळीच्या दिशेने प्रवास करताना रस्त्याच्या मधोमध एक भलेमोठे काळवीट मृत्यूमुखी पडलेले दिसले. रस्ता अपघातामुळे ते मृत पडले असावे हे कळायला घडीभरही वेळ लागला नाही. इतक्यात नजर बाजूच्या झाडीकडे स्थिरावली. झाडीतून एक काळवीट मृत काळवीटाजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित मृत पावलेल्या काळवीटाचे ते पिल्लू असावे किंवा समुदायी. दृश्य एकदम दयनीय होते. 

आजकाल मानवाच्या ह्या न् त्या चुकीमुळे वन्यजीवाचे अस्तित्व धोक्यात येत आहे. वाढत्या रस्ता अपघातांमुळे, अधिवास नष्ट केल्याने, वन्यप्राण्यांंना आपला जीव गमवावा लागतोय तर वाढते प्रदूषण, जंगलतोड, यामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. दोन्ही बाजूंनी घनदाट जंगल व प्राण्यांना ये-जा करण्यासाठी कसलीच पर्यायी तरतूद न करता वन क्षेत्र चिरुन वाहनांच्या रहदारीसाठी बांधलेला रस्ता. अपघातात मृत पावलेल्या काळवीटाचा काय दोष? प्राण्यांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता बांधलेल्या ह्या रस्त्याचा अंदाज मुक्या जनावरांना येणे कठीणच. 

आदिमानवाने नेहमीच मानव-वन्यजीव, सह-अस्तित्वाला महत्त्व दिलेले आहे. आदिमकाळात माडाच्या झावळ्यांपासून साकारलेले घर, शेणाने सारवलेली जमीन, अंगणात तांदळाच्या पिठाने रेखाटलेली रांगोळी अशी घरकुलाची रचना असायची. रांगोळीसाठी तांदळाच्या पिठाचा वापर केल्याने जीव-जंतू, किड-मुंग्या घराच्या उंबरठ्या बाहेरच स्थिरावत असत. निरोगी जीवनाला प्राधान्य देणारा आदिमानव, मानव-वन्यजीव सह-अस्तित्वाला महत्त्व देत असे. धन-संपत्ती-ऐश्वर्याला हपापलेला आजचा मानव जलद विकासाच्या वाटेने लोटला जात आहे. आधुनिकीकरणात गुरफटलेल्या मानवामुळे, मानव-वन्यजीव सह-अस्तित्वाची व्याख्या संघर्षाच्या दिशेने वाटचाल करु लागली आहे. सत्तरीच्या जंगलात वाघांची निघृण हत्या त्याच दिशेने खुणावते. 

 प्राणी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी :

वन्यजीव कॉरिडॉर निर्माण करणे : रस्ता निर्माण करताना वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची नोंद घेऊन वन्यप्राणी कॉरिडॉर निर्माण करणे आवश्यक आहे. 

कृत्रिम सुविधा उपलब्ध करणे : अभयारण्य, वनक्षेत्र, नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील किंवा संरक्षित वनांतून रस्त्याची निर्मिती न करता प्रस्तावित रस्ता अन्य ठिकाणाहून वळवता येईल का ह्याचा विचार व्हायला हवा. पर्याय उपलब्ध नसल्यास असे प्रकल्प राबविताना वन्यप्राण्यांच्या हितार्थ कृत्रिम सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. 

पर्यायी मार्ग शोधणे : अस्तित्वात असलेल्या रस्त्याला लागून प्राण्यांसाठी बोगदा, पन्हळ, छत-पूल ह्यासारख्या पर्यायी मार्गाची निर्मिती करणे आवश्यक आहे. असे केल्यास बेडूक, साप, कासव, सरडे व इतर लहान-मोठे प्राणी रस्ता अपघाताला बळी पडणार नाही. 

अभयारण्यातून जाणाऱ्या वाहतुकीवर वेळेचा निर्बंध घालणे : मध्यरात्र ते पहाटेपर्यंतच्या काळात अभयारण्यातून ये-जा करणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घातल्यास रोडकिलची संख्या कमी होऊ शकते. 

मानव-वन्यजीव सह अस्तित्वाला महत्त्व न देता केलेल्या विकासकामाचे गंभीर परिणाम भूस्खलन, अतिवृष्टी, महामारी इत्यादीच्या रुपाने आपण भोगात आहोतच. हे परिणाम कमी करुन मानव-वन्यजीव सह अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी रस्ता निर्मितीच्या वेळी रस्ता अपघाताला बळी पडणाऱ्या वन्यप्राण्यांचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

 रोडकिलची संख्या कमी करण्यासाठी :

सतर्क रहा : बहुतेकवेळा उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या स्त्रोताकडे जाण्यासाठी प्राण्यांना रस्ता ओलांडावा लागतो. स्थलांतराच्या हंगामात वन्यजीव ह्या जागेवरून त्या जागेवर स्थलांतर करतात. वीण हंगाम किंवा पावसाळ्यात बेडूक, साप यासारखे वन्यजीव रस्त्यावर साचलेल्या पाण्यात आपले घर करतात. त्यामुळे वन्यजीव प्रवण किंवा वन्यजीव संवेदनशील क्षेत्रातून प्रवास करताना वाहने वेगाने हाकू नये. 

रात्री व अरुणोदयाच्या वेळी अतिदक्षता बाळगा : बरेच प्राणी प्रामुख्याने पहाटे व रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. एखादा वन्यजीव रस्ता ओलांडताना दिसल्यास थांबा व थोडावेळ प्रतिक्षा करा. बरेच प्राणी कळपांमध्ये फिरतात. जेथे एक आहे तेथे बहुधा अनेक असू शकतात. 

शहरी/निवासी/ग्रामीण भागात अतिवेग टाळा : अशा भागातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोकाट गुरे, श्वाने बसलेली/झोपलेली असतात. रस्त्याच्या तापमानामुळे हे प्राणी येथे बसणे पसंत करतात. त्यामुळे अशा भागांमध्ये वाहने चालवताना अतिवेग टाळावा. 

गती मर्यादा पाळा : महामार्गावर अतिवेगाने वाहने हाकल्याने वर्षाकाठी कितीतरी फुलपाखरे, पक्षांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे गती मर्यादा पाळा व अतिवेग टाळा. 

 रोडकिल आढळल्यास काय कराल: 

शक्य तितक्या लवकर रोडकिल रस्त्यांवरून हटवा : प्राण्याचे शव तसेच रस्त्यावर ठेवल्याने मृत प्राण्याला खाण्यासाठी इतर वन्यजीव त्या भागात आकर्षित होऊ शकतात. यामुळे अतिरिक्त अपघात होण्याची शक्यता वाढते. म्हणून शक्य तितक्या लवकर रोडकिल रस्त्यावरून हटवणे गरजेचे ठरते. ह्या कामासाठी रोडकिल हटविण्यासाठी कार्यरत असलेल्या रोडकिल नियंत्रण पथकाशी आपण संपर्क साधू शकतो. 

आवश्यक ती खबरदारी घ्यावी : जर तुम्ही स्वत: रस्त्यावरुन रोडकिल हटवत असाल तर आवश्यक सुरक्षा खबरदारी घेणे गरजेचे आहे. मृत वन्यजीवामुळे रेबीज किंवा इतर झुनोटिक आजार पसरण्याचा धोका असतो. रोडकिलला उघड्या हातांनी स्पर्श करु नका. प्राण्याची विल्हेवाट लावताना शक्य असल्यास मास्क, जाड हातमोजे, फावडे किंवा इतर उपकरणे वापरा. 

पुर्न-उपयोगासाठी रोडकिल घरी नेण्याचा प्रयत्न करू नका : कित्येक वेळा वाहनचालक पुर्न-उपयोगासाठी रोडकिल घरी नेण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर त्यातले एक असाल तर सावधान! बहुतेक राज्यांमध्ये रोडकिल पुर्न- उपयोगासाठी घेऊन जाणे गुन्हा आहे. 


स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या 

प्राध्यापिका आहेत.)