नियोजनात्मक कृतींचा अभाव

नियोजनात्मक विकास प्रकल्प राबवल्यास व ते ठरलेल्या निश्चित मुदतीत पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्यास तसेच दर्जात्मक रस्त्यांचे काम झाल्यास लोकांना रस्त्यांची समस्या कधीच भासणार नाही.

Story: कॉलिंग अटेंशन |
13th October, 12:05 am
नियोजनात्मक  कृतींचा अभाव

म्हापसा शहर हे उत्तर गोव्यातील आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पोर्तुगिज राजवटीत बांधण्यात आलेल्या प्रशस्त अशा बाजारपेठेमुळे म्हापशाची ओळख जगभरात पोहचली. गोव्यात येणारे पर्यटक या बाजारपेठेला हमखास भेट देत होते. आज ही स्थिती बदलली आहे. अकरा वर्षांपूर्वी मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्वत्र रस्त्यांवर खड्डेच खड्डे. त्यातच प्रशस्त अशा बाजारपेठेला म्हापसा नगरपालिका आणि सरकारने एका चाळीचे स्वरूप दिले. यामुळे मार्केटचा नावलौकिकच पुसला गेला आहे.

करोडो रूपये खर्चून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. मात्र हा प्रकल्प अद्याप कार्यान्वित होऊ शकलेला नाही. या प्रकल्पाच्या वाहिन्यांसाठी शहरातील बहुतेक रस्ते खोदले गेले. हे रस्ते अद्याप पूर्वपदी आलेले नाहीत. या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी करोडो रूपयांचा चुराडा करण्यात आला आहे. गेल्या १०-१२ वर्षांत डांबरीकरण केलेला एकही म्हापशातील रस्ता सहा महिने टिकू शकलेला नाही.

चाळण झालेल्या रस्त्यांमुळे उत्तर गोव्यातील आर्थिक राजधानी असलेल्या या शहराची वाताहत झाली आहे. मलनिस्सारण प्रकल्पाचे अद्याप कार्यरत न झालेले चेंबरर्स पावसाच्या पाण्याचे कारंजे बनत आहेत. हे चेंबसही रस्त्यावर खड्डे पडण्याचे कारण ठरत असून स्थानिक लोकांना तसेच वाहन वाहतुकीसाठी हे चेंबर्स मनस्ताप ठरले आहेत.

ही स्थिती असताना शहरात भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रकल्प राबवला गेला. या भूमिगत वाहिन्यांसाठी देखील रस्ते खोदण्यात आले. हे रस्ते पूर्ववत करण्यासाठी वीज खात्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्यात करोडो रूपये जमा केले. मात्र रस्ते पूर्ववत करणे शक्य झालेले नसल्याने म्हापसावासियांची वाताहत सुरूच आहे.

खड्डेमय रस्त्यांमुळे गेल्या ११ वर्षांत वाहनस्वारांना विशेषतः दुचाकीस्वारांना अनेक शारीरिक इजा निर्माण झालेल्या आहेत. वाहनांचीही मोठी नासधूस झालेली आहे. धुळीच्या साम्राज्यामुळे आरोग्याच्याही समस्याही लोकांवर ओढवलेल्या आहेत. नियोजनचा अभाव आणि अहंकाराच्या वृत्तीमुळेच शहराला या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.      

म्हापशातील सांडपाणी आणि वीज या दोन्ही प्रकल्पांच्या कामांमुळे दळणवळणाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची चाळण करण्यात आली. यामुळे सुरळीत रस्त्यांचा अभाव ही नवीन समस्या शहराला भेडसावत आहे. या एकंदरीत समस्येचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. बाजारपेठेची आर्थिक उलाढाल मंदावली गेली आहे. पूर्वी हे शहर श्रीमंतीचा मुकुटमणी घेऊन मिरवत होते मात्र आता हा मुकुटमणी ढासळत चालला आहे.

मोपा विमानतळाला म्हापसा हे जवळचे शहर आहे. या विमानतळामुळे शहराची भरभराट होणार होती. पंरतु त्या दृष्टीने या शहराचा विकास झालेला नाही. किंवा तसे विकासात्मक प्रकल्प राबवले गेले नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बुडालेल्या म्हापसा शहराकडे पर्यटकांनी पाट फिरवली आहे. अशा स्थितीत शहराचा आर्थिक विकास खुंटला आहे.      

रस्ता ही एक महत्त्वाची गरज आहे. मात्र हीच गरज योग्यप्रकारे दिली जात नसल्याने गोव्यासारख्या प्रगत राज्यातील म्हापसा हे विकसित ठिकाण म्हणणे गैर आहे. रस्त्यांचे बांधकाम आणि डांबरीकरण हे अभियांत्रिकी नियमावलीप्रमाणे होत नाही. याच कारणास्तव आणि सर्वच सरकारी खात्यांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये (मंत्र्यांपासून अधिकारी आणि पर्यवेक्षक) समन्वयाचा अभाव असतो. रस्त्यांच्या दयनीय स्थितीला हे मुख्य कारण आहे. यातून सर्वसामान्य म्हापसावासियांची फरफट होत आहे.

नियोजनात्मक विकास प्रकल्प राबवल्यास व ते ठरलेल्या निश्चित मुदतीत पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्यास तसेच दर्जात्मक रस्त्यांचे काम झाल्यास लोकांना रस्त्यांची समस्या कधीच भासणार नाही.


उमेश झर्मेकर

(लेखक गोवन वार्ताचे उत्तर गोवा ब्युरो चीफ आहेत.)