तीन नी सान जाली

आपली जुनी पिढी शिकलेली नव्हती. पण जगातील अति श्रीमंत व्यक्ती पेक्षा जास्त समृद्ध आयुष्य, समाधानी आयुष्य जगत होती. आपल्या उपभोगासाठी हा निसर्ग नसून त्याच्यामुळेच आपण ह्या धरतीवर श्वास घेतो ह्याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती.

Story: भरजरी |
20th October, 04:48 am
तीन नी सान जाली

तिन्ही सांजेची वेळ. दिवे लागणीची लगबग. गोव्यातील कुठल्याशा गावातील कुठल्याशा एका घरात जात्यावरची घरघर आणि त्याबरोबर एक गोड आवाज... 

तीन नी सान जाली 
अशी दीयाची करा बेगी 
दीया वातीची करा बेगी
लक्ष्मी दारी उभी
घरणी बाईचा मन बगी 
घरणी बाईचा मन बगी

किती नेमके शब्द आणि किती सखोल विचार! हीच तर खरी खुबी आपल्या लोकगीतांची. ही लोकगीते नुसती गीते नसून संस्काराचे उगमस्थान आहे. मनातील भावभावनांचे डोकावणारे अंकुर आहेत. आता वरील गीत बघा ना, तिन्ही सांज झालेली आहे आणि अशा वेळेला दिवा लावण्याची घाई करा. या समयी दारी आलेल्या प्रत्येक प्राणीमात्राचे स्वागत करा. घरात शांतता ठेवा. आभाळातील भास्कर आपल्या घरी परतण्यापूर्वी आणि चंद्र चांदण्या आभाळात उजळण्यापूर्वी घरात शिरू पाहणाऱ्या काळोखाला दूर करा. आपल्या मनात असलेल्या अंधारालाही दूर करा. कारण या दिवस आणि रात्रीच्या संगमावेळी लक्ष्मीदेवी आपल्या अंगणात उभी आहे. दिव्याची ज्योत उजळून तिचे स्वागत करा. घराची घरणी बाई कशी आहे याच्यावरून घराची करणी ठरत असते. घरात वाढणाऱ्या वासरापिलांची वागणूक ठरत असते. घरातील जाणत्या नेणत्यामध्ये जो प्रेमाचा रेशमी बंध तयार होतो, तो घराच्या घरणी बाई मुळेच आणि तिथेच मन बघण्यासाठी स्त्री शक्तीचे प्रतीक लक्ष्मी आपल्या दारी उभी आहे. 

तीन नी सान जाली
दियो लाई मी लोनियाचो 
चांद्रिम सोनियाचो 
माजे दारीत उगावलो
माजे दारीत उगावलो 

अशा ह्या तिन्ही सांजेच्या वेळेला घरणी बाई जो दिवा लावत आहे तोही कसला? तर लोणियाचा म्हणजे प्रत्येक घरात एवढी समृद्धी की लोण्याचा दिवा लावला जात आहे. आणि या दिव्याच्या उजेडाने आकर्षित होऊन सोन्याचा चंद्र तिच्या दारात उगवला आहे.

अहाहा! काय सुंदर कल्पना... आणि त्याहीपेक्षा किती सुंदर निरीक्षण. चंद्र म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर चंद्राचा पांढरा चंदेरी रंगच दिसून येतो. आपण खरं पाहता संध्याकाळचा चंद्र हा कधीच पांढरा दिसत नाही. तो दिसतो सोन्याच्या गोळ्यासारखा. सोनेरी रंगात माखून गेलेला हा असा चंद्र माझ्या दारी उजळू दे आणि माझे घर दार सोन्याचे होऊ दे. हीच सदिच्छा नसेल का हो ती करत? नक्कीच! आपल्या घरादाराला समृद्ध करण्याची कळकळ तिच्या या ओवी मधून नक्कीच दिसून येते.

तीन नी सान जाली
दिया लावीला गोडतेला 
दिवसा लागल्या धावणीला
नंदी आला तो काढणीला 

गाई, गोधन म्हणजे आपल्या भारतीय संस्कृती खरी धनसंपदा. पूर्वीच्या काळी म्हणे जेव्हा एखादी बाई दुसऱ्या बाईची चौकशी करत असे तेव्हा तिचा पहिला प्रश्न असे, बाई गं, तुला मुलं किती? आणि जेव्हा पुरुष एकमेकांची चौकशी करत असत तेव्हा ते विचारत, बाबा तुझ्या गोठ्याच्या दावणीला गाई किती? घराची श्रीमंती घरातील लेकरा बाळावरून आणि गोठ्यातील गाई गोधनावरून ठरत असे. जेवढे प्रेम रांगत्या बाळावर केले जायचे, तेवढेच प्रेम दुभत्या जनावरांवरही केले जायचे. ते वासरू जेवढे गाईच्या कासेला लुचायचे, तेवढ्याच मायेने घरणी बाईच्या पायालाही चाटायचे. जशी आपल्या घरातील मुलांना आंघोळ घातली जायची तशी गोठ्यातल्या वासरा पाडसालाही आंघोळ घातली जायची. 

आपली जुनी पिढी शिकलेली नव्हती. पण जगातील अति श्रीमंत व्यक्ती पेक्षा जास्त समृद्ध आयुष्य, समाधानी आयुष्य जगत होती. कारण त्यांचं जगणं हे निसर्गाला धरून होतं. निसर्गाच्या सभोवताली होतं. आपल्या उपभोगासाठी हा निसर्ग नसून त्याच्यामुळेच आपण ह्या धरतीवर श्वास घेतो ह्याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. आणि म्हणूनच त्यांनी बांधलेल्या घराच्या परसदारात जशी झाडाझुडपांना जागा होती तशीच घराच्या बाजूच्या गोठ्यात दूध दुभतं देणाऱ्या गाई गोधनांनाही हक्काची जागा होती. 

संध्याकाळ झाली की घरणी बाईला बाहेर खेळायला गेलेल्या आपल्या तान्ह्याची जेवढी आतुरता लागलेली असायची तेवढीच रानात चरायला गेलेल्या गाई वासरांना सुखरूप बघण्याचे आतुरता तिच्या त्याच मनाला लागलेली असायची. ती त्यामुळेच तिन्ही सांजा झाल्या की दिवसभर धावणीला लागलेल्या आपल्या नंदीला आता काढण्या लावूया म्हणजे दावणीला लावूया असं म्हणत ती लगबगिने गोठ्यात जायची. 

तीन नी सान जाली
असा दिवस मावुळला 
आई गे लक्षुमी
दीया लायतू तुळशीला

अशी तिन्ही सांज झाली, घरणी बाईने लक्ष्मीदेवीचे आपल्या घरी आवाहन केले. मावळत्या दिनकराला दिवा लावून निरोप दिला. उगवत्या चंद्राला सोनियाच्या पावलाने आपल्या घरी ये असा आग्रह तिने केला. गाई गोधनांना दावणीला बांधून त्यांना चारा पाणी देते आणि करता करता दिवस मावळला. आता ती कुठे निवांत झाली. आपल्या घरात आलेल्या आपल्या लक्ष्मी मातेला आता ती सांगते, की देवी माते तू समृद्धी घेऊन माझ्या घरात तर आली आहेस पण माझ्या सुखदुःखाची वाटेकरी जिने माझे आनंदाश्रू आणि दुःखाश्रू दोन्हीही पाहिले आहेत ती माझी दुसरी माऊली तुळशी माता अंगणात माझ्यासाठी तिष्ठत उभी आहे. एक दिवा मी तिलाही लावते. असं म्हणून ती घराची घरणी बाई आपल्या घराचं राखण करणाऱ्या आपल्या तुळशी मातेला भेटण्यासाठी तिच्या पेडीवर माथे टेकवण्यासाठी दिवा घेऊन बाहेर जाते. घरात समृद्धी आणून आपण उपभोगशून्य मूर्ती बनणे हा त्याग त्या घरणी बाईच्या आवाक्यातला होता आणि म्हणूनच आपली जुन्या पिढीची स्त्री सती म्हणून, सावित्री म्हणून वंदिली जाते.

हे तिचं समृद्ध जीवन आज आमच्यापर्यंत कसं पोहोचलं? तर तिने रचलेल्या गोड पण अनुभवाने रसरसलेल्या तिच्या ओव्यामुळे. ह्या ओव्या म्हणजे नुसती गाणी नाहीत, तिच्या अंतरिच्या भावना तिने शब्दरूपाने ओवल्या आहेत. ह्या ओव्या गेली कित्येक वर्षे आनंद देत आहेत आणि येणारी कित्येक वर्षे आपल्याला आनंद देत राहतील. आपण बुद्धिजीवी माणसं ह्या ओव्यांचा कितीतरी सखोल अर्थ काढू शकतो पण त्यांच्या अभिजात प्रतिभेला आपण कणभरही आत्मसात करू शकत नाही. आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो ते म्हणजे या ओव्यांचे जतन. ही आजच्या काळाची फक्त गरजच नाही हे कर्तव्य आहे तुमचं, माझं आणि ह्या भूमीवर श्वास घेणाऱ्या सर्वांचं.


गौतमी चोर्लेकर गावस
मासोर्डे, वाळपई