दिवाळीत आकाशकंदीलाची भव्यता व प्रकाशाची दिव्यता वाढवूया!

सणांच्या परंपरिकतेमध्ये पाश्चात्य संस्कृती व प्लॅस्टिकरुपी राक्षसाने केलेले अतिक्रमण हे फक्त संस्कृती रक्षणाच्या नजरेनेच नव्हे, तर पर्यावरण संरक्षणाच्या अनुषंगानेही घातक आहे.

Story: साद निसर्गाची |
20th October, 04:52 am
दिवाळीत  आकाशकंदीलाची  भव्यता व प्रकाशाची दिव्यता वाढवूया!

चतुर्थी संपली, नवरात्र सरली, आता वेध सुरू झाले आहेत ते दिवाळीच्या सणाचे. दिवाळी, अर्थात प्रकाशाचा सण! सगळीकडे दिव्यांचा झगमगाट. मात्र ह्या उजेडाच्या सणाला ग्रहण लागलं आहे ते वाईट व प्रदूषणकारी रुढींचे. आज दिवाळीत आकाशकंदीलापेक्षा नरकासुराची उंची आणि भव्यता वाढताना दिसते. नरकासूराचे स्तोम आवाढव्य वाढते आहे. दिवाळीच्या पहाटे अंथरुणातून उठून अभ्यंगस्नान अपेक्षित असते. पण आजची तरुण पिढी मात्र याच्या नेमकी उलट वागताना पहावयास मिळते. आजची तरुण पिढी दिवाळीच्या पहाटे नरकासुरातून परत येऊन झोपी जाताना पहायला मिळत आहे. हे नक्कीच आपल्या संस्कृतीला शोभनीय नाही.

“आमच्या लहानपणी नरकासुरा रे, नरकासुरा...” असं म्हणत गावातील मुले लहानशी मिरवणूक काढून नरकासूर रुपी वाईट प्रवृत्तीच्या प्रतीकाचे दहन करायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आपली युवा पिढी नरकासुरामुळे वेगळाच 'सूर' पकडू लागलीय हे खूप दुर्दैवी आहे. मी सरसकट सर्वांनाच ह्यात ओढणार नाही. काही युवक हे नरकासुराची प्रतिमा साकारुन त्यातून आपल्या कलेला वाव देतात हेही आपण मान्य करायला हवे. ‘सुक्यासोबत ओलेही जळते’ अशा आशयाची मराठीत एक म्हण आहे. हा त्यातलाच प्रकार. ह्या सगळ्यात ध्वनी आणि हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. 

आजकाल आपल्याला घरोघरी प्लॅस्टिकचे आकाशकंदील पहायला मिळतात. पूर्वीच्या काळी बांबूपासून आकाशकंदील साकारले जायचे. कागदाच्या रंगीबेरंगी पताकांच्या सहाय्याने हा आकाशकंदील सजवला जायचा. काठीच्या सहाय्याने आकाशकंदीलाच्या मधोमध मातीपासून बनवलेली व तेलाने भरलेली पणती पेटवली जायची. अशा पद्धतीने साकारलेला आकाशकंदील हा पूर्णपणे नैसर्गिक असे. मात्र आता हे क्वचितच पहायला मिळते. आज परंपरिक आकाशकंदीलांची जागा प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या आकाशकंदीलांनी घेतली आहे. 

दिवाळी सण हा सर्वांना एकत्र आणणारा सण. पूर्वीच्या काळी फक्त दिवाळी सणालाच पोहे खायला मिळत असतं. एकत्र कुटुंबे पंगतीत बसून केळीच्या पानावर वाढलेल्या चविष्ट फराळाचा आस्वाद घेत असे. दुर्दैवाने हल्लीच्या काळात फराळाच्या पंगतीतून केळीचे पान गायब व्हायला लागले आहे. केळीच्या पानावर वाढलेल्या गरमागरम फराळाच्या माध्यमातून पानातील जीवनसत्त्व आपल्या पोटात जावे अन् आपल्या शरीरासाठी ते आरोग्यवर्धक ठरावे हा केळीच्या पानावर जेवण्यामागचा हेतू होता. आज केळीच्या पानाची जागा प्लॅस्टिक बशांनी घेतलेली आहे. प्लॅस्टिक बशीमधून जेवल्याने अन्नाच्या माध्यमातून आपल्या पोटात जाणारे मायक्रोप्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी सर्वात घातक आहे. 

पूर्वीच्या काळी सणासुदीच्या काळात घरासमोरील अंगणात शेण सारवत असत. आज घरासमोरील अंगणातील मातीची जागा टाईल्सनी, तर शेणाची जागा रंगीत सिमेंटने घेतलेली आहे. चतुर्थीला पीओपीच्या गणेश मुर्त्या नको असा गजर करुनही विसर्जनानंतर भग्नावस्थेतील गणेश मुर्त्या आपल्याला पहायला मिळतात. अशा ह्या दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेक श्रीमंत बाबींपासून आपण दूरावत चाललो आहोत. ह्या अशा गोष्टीतून आपण फक्त प्रदूषणकारी बदलांनाच आमंत्रण देत नाहीत, तर त्याबरोबर आपण आपल्या सणांमधील परंपरिकताही गमावत चाललो आहोत. माझ्या मते हेही एक प्रदूषणच! प्रदूषण, आपल्या प्रगतीच्या नावाखालील सुरु असलेल्या तकलादू उत्थानाचे व वैचारिक खुजेपणाचे. 

आपले सण हे आपण पूर्णपणे परंपरिक पध्दतीने साजरे केले पाहिजेत. ह्या परंपरिकतेमध्ये पाश्चात्य संस्कृती व प्लॅस्टिकरुपी राक्षसाने केलेले अतिक्रमण हे फक्त संस्कृती रक्षणाच्या नजरेनेच नव्हे तर पर्यावरण संरक्षणाच्या अनुषंगानेही घातक आहे. म्हणूनच आपण येणारा दिव्यांचा सण पारंपरिक व नैसर्गिक पद्धतीने साजरा करुया. घरासमोर प्लॅस्टिकचा नव्हे, तर बांबूपासून बनवलेला आकाशकंदील लावूया. फराळाच्या पंगतीला बसताना प्लॅस्टिकच्या बशी ऐवजी केळीच्या पानावर फराळ करण्याचा आग्रह धरुया. नरकासुराची भव्यता कमी करुन पणत्यांच्या प्रकाशाची दिव्यता वाढवूया. दिवाळीची परंपरिकता बाळगूया, आचार विचारांची सभ्यता वाढवूया. नरकासुराच्या दिवशी कर्कश आवाजात गाणी लावून ध्वनी प्रदूषण करण्यापेक्षा दिवाळीच्या दिवशी पहाटे उठून वेद पठण करण्यावर भर देऊया. दिवाळीचा सण पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प करुन मंद पणतीच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून टाकूया. नरकासुररुपी प्लास्टिकचे दहन करुन पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देऊया.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)