आवाज-वाणी

रेडिओ म्हणजे कलाकारांसाठी आवाजाची कसरत असते. आव्हान असते. आवाजावरून सगळं व्यक्त करावं लागतं याचं भान महत्त्वाचं.

Story: ये आकाशवाणी है |
20th October, 12:09 am
आवाज-वाणी

श्रुतिका सादर करताना भुवया उंचावल्या, नाकपुड्या फुलवल्या, कपाळाला आठ्या घातल्या व इतर अनेक हावभाव केले तर त्याचा काहीही फायदा होत नाही. दु:ख, शोक, आनंद, उदासिनता, खिन्नता, हर्ष, शांती सर्व अवस्था फक्त आणि फक्त कंठातून सादर कराव्या लागतात.  निवेदनासाठीची आवाजाची शैली वेगळी असते. वृत्तनिवेदनाची शैली वेगळी असते. आवाजाच्या कलाप्रकाराला voice culture असं म्हणतात. 

झांकून झांकून गांवकार, अशी कोंकणीत एक म्हण आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट करून करून त्यात प्रभुत्व यायला लागतं. आवाजाचं शास्त्र शिकला तर त्याचा फायदा होतोच. मी वृत्तनिवेदनाच्या सेवेत असताना आकाशवाणीवर मुंबई, दिल्ली व इतर स्टेशनातून अऩेक वरिष्ठ अधीकारी येत. नैमित्तीक कलाकारांना म्हणजे वृत्तनिवेदकांसाठी व बातम्यांचे व्होयस ओवर देणाऱ्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिरं व्हायची. आवाज कलेच्या विश्वाचे तंत्र आणि मंत्र त्यात शिकवत. 

मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तनिवेदकांचे दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर वा इतर केंद्रातून अधूनमधून बातम्यांसाठी वा इतर कामांसाठी फोन येत. त्यातील काही न्यूज रिडरचे आवाज इतके रेशमी, मुलायम, मऊसूत असायचे की त्यांना सांगावसं वाटायचं – मत कट करो फोन यार. गोवामें क्या हालचाल है? असं त्यांनी विचारल्यावर मी न्यूज रिडर असून सुध्दा त्यांच्या आवाजाचा सात्विक हेवा वाटायचा. 

एका प्रसंगाची आठवण झाली. कोंकणी कथा-वाचनाचं रिकॉर्डींग होतं. स्टेजवरून लायव्ह कथाकथन वेगळं. तिथं कथाकथनकार दिसतो. अभिनय दिसतो. रेडिओवर आवाजावरून कथा, कथानक, भावविश्व साकार करावं लागतं. योग्य मूड उभे करावे लागतात. ते कथावाचन करण्यासाठी एक ज्येष्ठ अभिनेता आला होता. कथा जबरदस्त, आशयघन होती. तो कलाकार सराव करून आला होता. ध्वनीमुद्रण सुरू झालं. हा कलाकार अर्थवहन करताना त्यात इतका गुंतून गेला की एका प्रसंगी तो भावूक झाला. थांबला. कथेतील दु:ख त्याला आपलंच वाटलं. घशाला कोरड पडली. त्याला एका अधिकाऱ्याने जाऊन शांत केला. पाणी आणून दिलं. पांच मिनिटात कथेचं वाचन पुढं सुरू झालं. हा प्रसंग मी विसरूच शकत नाही. इथं कलाकार समरस होऊन अर्थाच्या परिघात बुडाला होता. हे लायव्ह नव्हतं म्हणून सुटलो.

निवेदकाच्या आवाजाचा एक नीज स्वभाव असतो. आवाजाचा पोत असतो. काहींच्या आवाजात एक कमालीचं आर्जव असतं. काहींच्या आवाजात ऊर्जा असते. कधीकधी किंचित आक्रमकताही असते. पण न अडखळता, योग्य विराम घेऊन, आवाजाच्या मोड्युलेशन्स सहीत निवेदन व्हायला हवं. श्रोत्यांना आकर्षित करून लक्ष वेधणारा आवाज असावा. शब्दांगणिक नेमका कुठं ठाशिवपणा यावा त्याचं भान व समज हवी. 

आपल्या मनोविश्वात खळबळ वा शारीर पातळीवर श्रमाची कणकण असेल तर त्याचा परीणाम शब्दवहनावर होतो. उदाहरण देऊन सांगतो. मी संध्याकाळी प्रादेशिक बातम्या वाचत होतो. स्टुडिओत वाचून खाली न्यूज रूममध्ये आलो. एका मित्राचा फोन आला. बाबू म्हणटालो, “आयज मुकेशकाकाल्यो बातम्यो कुंडयच्या घांटार चडटेर ट्रक चडटा तश्यो ओडटाल्यो. काय झालं?” अशी त्याची विचारणा होती. मित्राला रोज बातम्या ऐकण्याची सवय होती. त्या बातम्या चिरंजीवाच्या कानावर पडत होत्या. मी प्रांजळपणे कबूल केलं – “आठ दिवस दिल्लीला होतो. आजच पोहोचलो. हवा, पाणी, जेवण बदल, थोडीशी धावाधाव यामुळे अंग जरा ठणकत होतं. त्यामुळे रोजच्या वृत्तनिवेदनासारखा ठसका, आवेश, तडफ बाबूला जाणवला नसावा. बरोबर आहे तुमचं.” 

वृत्तनिवेदन सादर करायच्या निदान एक तास अगोदर घऱगुती किंवा इतर फोन कॉल घेतले तर निगुतीने घ्यावे लागतात. आपण त्याच्याकडे वाद करू शकतो. नातेवाईकांच्या समस्यांचा ताणतणावाचा प्रभाव आपल्या आतील भाव-रचनेत पडतो व आपसूक निवेदनावर परिणाम होतो. हे सर्व मी अनुभवलेलं आहे. आईस्क्रिम खाणं वा जास्त खाणं घशावर प्रतिकूल परिणाम करतं. बातम्या सलग दहा मिनिटं वाचायच्या असतात. ऊर्जा शेवटपर्यंत टिकवणे म्हणजे पोरखेळ नव्हे. आईस्क्रिम वा थंड पेय सेवन केलं त्या दिवशी बातम्या वाचताना पांच मिनिटं झाल्यावर घसा आत खेचल्यासारखा जाणीव करून द्यायचा. लायव्ह प्रसारण असतं ते. म्हणून लायव्ह बोलणाऱ्या रेडिओ निवेदकांनी, कलाकारांनी, वृत्तनिवेदकांनी घशाची काळजी घ्यावी लागते.


मुकेश थळी 
(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)