घरी जाताना ओहोळाचा ‘शॉर्टकट’ बेतला जीवावर

साईनगर-उसगाव येथे पाचवीतील मुलाचा बुडून मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
घरी जाताना ओहोळाचा ‘शॉर्टकट’ बेतला जीवावर

साईनगर-उसगाव येथे बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेताना अग्निशमन दलाचे कर्मचारी व पोलीस.

फोंडा : उसगाव पंचायत क्षेत्रातील साईनगर येथे बुधवारी संध्याकाळी मुसळधार कोसळणाऱ्या पावसात नाल्यातील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ११ वर्षीय दर्शन संतोष नार्वेकर या वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला. बुधवारी रात्रीपासून फोंडा पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत होते. गुरुवारी दुपारी एमआरएफ कंपनी जवळ असलेल्या दूधसागर नदीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. ट्युशन झाल्यानंतर शॉर्टकट घरी जाण्याच्या प्रयत्नात दुर्घटना घडली असल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.


इयत्ता ५वीच्या वर्गात शिकणारा दर्शन नार्वेकर हा बुधवारी सायंकाळी ट्युशन झाल्यानंतर आपल्या बहिणीसह व अन्य मित्रांबरोबर घरी जात होता. त्यावेळी मुसळधार कोसळणाऱ्या पावसात विद्यार्थ्यांनी नाल्यातून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ११ वर्षीय दर्शन नार्वेकर हा नाल्यात कोसळला. त्याच्या सोबत असलेल्या बहिणीने आणि अन्य विद्यार्थ्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, पाण्याची पातळी वाढल्याने प्रवाहात दर्शन नार्वेकर हा वाहून गेला.
या घटनेची माहिती त्वरित फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना तसेच पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर व अग्निशमन दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांच्या नेतृत्वाखाली बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. बुधवारी रात्री २ वाजेपर्यंत शोध घेण्यात आला. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध पुन्हा घेण्यात सुरुवात करण्यात आली. दुपारी १२.३०च्या सुमारास एमआरएफ कंपनीजवळ असलेल्या दूधसागर नदीच्या जवळ बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृतदेह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील इस्पितळात नेण्यात आला.