सोमवारपासून दूधसागर पर्यटक टॅक्सीसेवा होणार सुरू

मुख्यमंत्र्यांनी घेतला सुविधांचा आढावा : वेबसाइटवर शुल्क भरण्याची व्यवस्था


17th October, 12:50 am
सोमवारपासून दूधसागर पर्यटक टॅक्सीसेवा होणार सुरू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दूधसागर धबधबा पावसाळा संपल्यानंतर आता पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. पर्यटक टॅक्सीसेवा सोमवारपासून सुरू होणार आहे. पायाभूत सुविधा तसेच एकूण परिस्थितीचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.
या बैठकीला गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर, वन विभाग व पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर टुरिस्ट टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पावसात दूधसागर धबधब्यावर जाण्यास मनाई असते. यंदा राज्यात मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे भरण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या कामाचा आढावा घेतला. वन अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती दिली. पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटक मार्गदर्शक उपलब्ध आहेत.
काही दिवसांपूर्वी गोवा माईल्स काउंटरवरील जीप विक्रेत्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न उपस्थित करून त्यांचा प्रश्न सोडवला. पर्यटन विकास महामंडळाने आता दूधसागर प्रवेशाचे बुकिंग, तसेच वेबसाइटवर शुल्क भरण्याची व्यवस्था केली आहे.
पावसासाठी उपाययोजना आखण्याची सूचना
पर्यटन हंगाम सुरू होऊनही पाऊस सुरूच आहे. पाऊस पडला की खालच्या भागात वरून पाणी येते. यासाठी विशेष उपाययोजना आखण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. दूधसागर धबधब्यावर पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सरकारने सूचना फलक उभारण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी संकेतांच्या स्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.