किनारी भागात रात्रीची गस्त वाढवली : मुख्यमंत्री

रात्रीच्या कर्णकर्कश संगीत पार्ट्यांनाही बसणार चाप


17th October, 12:46 am
किनारी भागात रात्रीची गस्त वाढवली : मुख्यमंत्री

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : शॅकमध्ये पर्यटकांना झालेली मारहाण, तसेच किनारी भागात कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी नीट बसवण्यासाठी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. किनारी भागातील पोलीस स्थानकांतील ४० टक्के पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालण्याचे काम करतील. इतर भागातील पोलीस स्थानकांतील २० टक्के पोलीस गस्तीवर असतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
राज्याच्या समुद्र किनारी भागात शॅक किंवा क्लबमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी संशयितांना अटक झाली आहे. मारहाणीचे प्रकार सरकार अजिबात खपवून घेणार नाही. संबंधित दोषींवर निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. चोऱ्यांना आळा घालण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकांवर मोठ्या आवाजात संगीत वाजवण्याचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. रात्री कर्णकर्कश संगीत वाजवणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. किनारपट्टी भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह शांतता भंग करणाऱ्यांचीही गय केली जाणार नाही, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.