एकाच जागी असलेल्या पोलिसांच्या बदल्या अटळ

आठ दिवसांत निघणार आदेश


17th October, 12:45 am
एकाच जागी असलेल्या पोलिसांच्या बदल्या अटळ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याविषयीची माहिती पोलीस महासंचालकांकडून घेतली जात आहे. आठ दिवसांत बदल्यांचे आदेश जारी केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री अधिक माहिती देताना पुढे म्हणाले की, पोलीस शिपायांच्या बदल्यांचे आदेश जारी करणे सुरू झाले आहे. त्यानंतर साहाय्यक निरीक्षक, निरीक्षक आणि उपअधीक्षक या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही जारी केले जातील. अधिक काळ एकाच पोलीस स्थानकात राहिल्याने अनेक अधिकारी सुस्तावले आहेत. आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून याबाबत तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून पोलीस अधिकाऱ्यांच्या ठरावीक काळांनी बदल्या करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस महासंचालकांकडून एका पोलीस स्थानकात अधिक काळ सेवा बजावत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. बदल्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या आठ दिवसांत सर्वच बदल्यांचे आदेश पूर्ण केले जातील, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पोलिसांची जबाबदारी वाढली
किनारी भागात पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कांदोळी, कळंगुट भागात वादाचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था स्थिती अबाधित राखण्याची पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. सरकारकडून उपाययोजना सुरू आहेत. त्यावर अधिक काळ असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.