‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरण कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव

पेट्रोलमालक संघटनेकडून प्रस्तावाचे स्वागत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरण कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव

पणजी : राज्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरू असून त्यावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच दुचाकी चालकाच्या सुरक्षेसाठी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ हे धोरण कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव आहे. वाहतूक खात्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान नो हेल्मेट, नो पेट्रोल धोरण लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
१४ ऑक्टोबरपासून राज्यात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू झाला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना दंड आकारण्यात येत आहे.
दुचाकी चालकाने हेल्मेट न घातल्यास त्याला पेट्रोल दिले जाणार नाही, असा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल ३० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक खात्याला सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशाच्या प्रती मामलेदारांसह हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकांना पाठवल्या आहेत. हा आदेश या रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचा एक भाग आहे. तसेच पेट्रोल पंप मालकांना ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ असे फलक लावणेही बंधनकारक आहे.
वाहनात इंधन भरल्यानंतरच दुचाकी किंवा इतर वाहन आपण चालवू शकताे. तसेच दुचाकीस्वारांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. या सक्तीमुळे आता ९० टक्के दुचाकीस्वार हेल्मेट घालू लागले आहेत. तरीही सर्वच रस्त्यांवर हेल्मेट तपासणी शक्य होत नाही. यामुळे पेट्रोल पंपमालकांनी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ हे धोरण लागू केल्यास हेल्मेट सक्तीची आपोआप अंमलबजावणी होईल, अशी माहिती वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या धोरणाला राज्यात कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून ते कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव आहे. तत्पूर्वी पेट्रोल पंप संघटनेशी चर्चा करून मगच त्यावर कारवाई होऊ शकते, असेही वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
नो हेल्मेट, नो पेट्रोल हे धोरण इतर राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. कायद्यानुसार दुचाकीस्वाराला हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. त्यामुळे नो हेल्मेट, नो पेट्रोल हे धोरण लागू करण्यास कोणतीही हरकत नाही, असे अखिल गोवा पेट्रोलमालक संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी सांगितले.

हेल्मेट सक्तीला मिळणार बळकटी

राज्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. हेल्मेटमुळे दुचाकीचालकाचा जीव बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहतो. त्यामुळे पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पेट्रोल धोरण राबविल्यास हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला बळकटी मिळेल, असे अखिल गोवा पेट्रोलमालक संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी सांगितले.