पर्यटकांना मारहाण : गोव्यातील पर्यटनावर परिणाम शक्य

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सरकारवर टीका


17th October, 12:52 am
पर्यटकांना मारहाण : गोव्यातील पर्यटनावर परिणाम शक्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कळांगुट, बागा येथे घडलेल्या प्रकारांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे स्पष्ट होते. पर्यटकांना मारहाणीचा गोव्यातील पर्यटनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकार पर्यटन क्षेत्र बंद पाडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली. बुधवारी पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विवेक डिसिल्वा, वीरेंद्र शिरोडकर व अन्य उपस्थित होते.
पाटकर पुढे म्हणाले की, भाजप सरकारने याआधी १२ वर्षांत हळूहळू करून खाण व्यवसाय बंद पाडला. आता ते पर्यटन क्षेत्राच्या मागे लागले आहेत. किनारी भागात स्थानिकांना फिरणे कठीण झाले आहे. तेथील बहुतेक व्यवसाय परप्रांतीय चालवत आहेत. ते बाऊन्सर, गुंडांकरवी लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ही प्रकरणे देशातील इतर भागात समजल्यास येथे पर्यटक येणे बंद होईल.
पाटकर पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी स्थानिक धंदे परप्रांतीयांच्या ताब्यात गेल्याचे सांगितले; मात्र डीएलएफ, भुतानी यांसारखे बाहेरचे व्यावसायिक गोव्यातील जमिनी अवैधपणे घेत आहेत त्यावर मात्र बोलले नाहीत. स्थानिकांच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काय करत आहे ? मुख्य सचिवांच्या कथित जमीन रूपांतर प्रकरणी गुंतेलेल्या सर्वांची सीबीआय चौकशी करावी. याबाबत कारवाई झाली नाही तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत.
कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने स्थानिक सुरक्षित नाहीत. सरकार राज्यातील जमिनींचे रूपांतर करून पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. अशा स्थितीत सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे.
_ अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस