कारच्या आरशाच्या कव्हरमुळे ‘हिट अँड रन’चा छडा

आगशी पोलिसांची कारवाई : कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा झाला होता मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
कारच्या आरशाच्या कव्हरमुळे ‘हिट अँड रन’चा छडा

पणजी : कारच्या उजव्या बाजूच्या आरशाच्या कव्हरमुळे आगशी पोलिसांनी गोवा वेल्हा येथील हिट अॅन्ड रन प्रकरणातील संशयिताच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पोलिसांनी कार चालक नाईजल मोन्तेरो (४२, गोवा वेल्हा) याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा वेल्हा येथील पेट्रोल पंपजवळ शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ओ फीश रेस्टॉरंटजवळ शशिकांत फडते बांदोडकर यांना वाहनाने धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाला होता.
या प्रकरणी आगशी पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, हृषिकेश रायकर, महिला उपनिरीक्षक दिपिका परवार, हवालदार पुरेश अडकोणकर, काँ. राजू अत्तर, राघोबा पार्सेकर, संजय वरक व इतर पोलिसांचे पथक तयार करून तपास सुरू केला. या प्रकरणी पथकाने चौकशी केली असता, अपघातस्थळी झुडपात एका कारचे उजव्या बाजूच्या आरशाचे कव्हर सापडले होते. तसेच पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता, गोवा वेल्हाहून शिरदोणच्या बाजूने जाताना निळ्या रंगाची कार गेल्याचे समोर आले. मात्र त्यात कारचा क्रमांक सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात कार कंपनीशी संपर्क साधला असता, संबंधित इग्निस किंवा निक्सन कारने अपघात केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सदर गाडीचा क्रमांक मिळाला. गाडी क्रमांकाच्या आधारे अखेर आगशी पोलिसांना गोवा वेल्हा येथील हिट अॅन्ड रन प्रकरणातील संशयिताचा छडा लावण्यास यश आले.
दरम्यान, आगशी पोलिसांनी कार मालकांशी संपर्क साधला असता, तो दिव्यांग असल्यामुळे त्याने कार चालवण्यासाठी चालक ठेवल्याची माहिती दिली. तसेच अपघात झाल्यामुळे कारची दुरुस्ती खासगी आस्थापनांत ठेवल्याची माहिती मिळाली.
कारचालकाला न्यायालयीन कोठडी
पोलिसांनी कार चालक नाईजल मोन्तेरो (४२, गोवा वेल्हा) याला ताब्यात घेतले. तसेच दुरुस्तीसाठी ठेवलेली कार खासगी आस्थापनांतून जप्त करण्यात आली. या प्रकरणी आगशी पोलिसांनी कारचालक मोन्तेरो याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयित कारचालकाला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.