वाहतूक खात्यातर्फे वाटणार एक हजार मोफत हेल्मेट!

वाहतूकमंत्री गुदिन्हो : चिखलीत वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th October, 06:37 pm
वाहतूक खात्यातर्फे वाटणार एक हजार मोफत हेल्मेट!

वास्को : स्वतःच्या सुरक्षतेसंबंधी जागरुकता असलेले परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने हेल्मेट खरेदी करू न शकणाऱ्या सुमारे एक हजार दुचाकीचालकांना वाहतूक खात्यातर्फे हेल्मेट मोफत देण्यात येणार आहेत, असे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले. येणाऱ्या काळात महत्त्वाच्या चौकाचौकांत सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची सोय करण्यात येईल, जेणेकरून वाहतुकीमध्ये शिस्त येईलच शिवाय गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्तींचा शोध घेण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त चिखली चौकात आयोजित केलेल्या जागरुकता कार्यक्रमात मंत्री गुदिन्हो यांनी २५ दुचाकीचालकांना हेल्मेट मोफत दिली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत मुरगावचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर, उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, नगरसेवक प्रजय मयेकर, दामू कासकर, यतीन कामुर्लेकर, विनोद किनळेकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, दाबोळी मतदारसंघातील इतर चौकातही प्रत्येकी २५ हेल्मेट मोफत देण्यात येतील. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांपैकी काहीजणांकडे आपण बोललो, तेव्हा त्यांनी हेल्मेट खरेदी करण्याची ऐपत नसल्याचे सांगितले. तर काहीजणांनी हेल्मेट खराब झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना हेल्मेट मोफत देण्यात आली. रस्ता अपघातात बरेचजण मृत्युमुखी पडतात. अपघात होऊ नयेत चालक सुरक्षित राहावे यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षा ही फक्त एका सप्ताहासाठी नसावी. प्रत्येक दिवस हा रस्ता सुरक्षेचा असला पाहिजे. प्रत्येकाने वाहतूक सुरक्षिततेसंबंधी जागरुकता दाखविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
मंत्री गुदिन्हो यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मुरगाव पालिका मंडळाला विकासकामांसाठी ३ कोटी ७५ लाख रुपयाचा धनादेश पालिका संचालनालयाकडून मिळाला. याप्रकरणी उपस्थित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी गुदिन्हो यांचे आभार मानले. गुदिन्हो यांनी सदर कामी नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे आभार मानले. या निधीमुळे मुरगाव पालिकेच्या विविध प्रभागांतील विकासकामांना चालना मिळणार आहे.
सीसीटिव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे
सध्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची नितांत गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अत्याधुनिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची ठिकठिकाणी उभारणी करण्यात येईल. या कॅमेऱ्यांमुळे वाहनचालकांमध्ये शिस्त आणता येईलच शिवाय गुन्हेगारी कमी करण्यासही मदत होईल. कॅमेऱ्यात चित्रित होणाऱ्या गोष्टींमुळे गुन्हेगारांचा शोध घेणेही सोपे होईल, असेही गुदिन्हो म्हणाले.