भारताच्या बदनामीचा डाव

भारतात वाँटेड असलेल्या दहशतवाद्याची हत्या होते तर त्यासाठी कॅनडाने एवढे मनाला लावून घेण्याचे कारण नव्हते. अशा व्यक्तीसाठी भारतावर आरोप करून भारताला जगासमोर बदनाम करण्याचा प्रयत्न कॅनडाने करायला नको.

Story: संपादकीय |
17th October, 10:37 pm
भारताच्या बदनामीचा डाव

भारत - कॅनडा यांच्यातील संबंध सध्या फिस्कटण्याच्या अंतिम टप्प्यावर आहेत. लाखो भारतीय आणि हजारो गोमंतकीय कॅनडात आहेत. तिथे त्यांचा राजकीय लाभ उठवण्यासाठी तिथल्या राजकीय पक्षांकडून नेहमीच प्रयत्न होतात. भारतातील लाखो विद्यार्थी कॅनडात शिक्षणासाठी जातात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांचे संबंध आहेत. आता अचानक हे संबंध ताणले गेल्यामुळे त्याचा फटका दोन्ही देशांना बसू शकतो. कॅनडा भारतातील कुठल्या गोष्टींवर थेट अवलंबून नसला तरी तिथे असलेल्या भारतीयांची नाराजी मात्र तिथल्या सरकारला पहावी लागू शकते. कॅनडा भारतावर आरोप करत असल्यामुळे कॅनडातील भारतीय आणि कॅनडातील इतर नागरिकही त्यांच्या सरकारच्या धोरणांवर आश्चर्य व्यक्त करत आहेत. या दोन्ही देशांचे ताणले गेलेले संबंध लवकर सुधारले नाहीत तर नोकरी, शिक्षणानिमित्त तिथे जाणाऱ्या भारतीयांना अडथळे येतील. कॅनडाने भारतविरोधी दहशतवाद्यांना नेहमीच आश्रय दिला असे मानले जाते. भारतात तणाव निर्माण करणारे खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची हत्या झाल्यानंतर कॅनडाने भारतावर नेहमी संशय घेतला. कॅनडाला एका दहशतवाद्याच्या हत्येच्या फार वेदना झाल्याने त्यांच्या कृतींमधून दिसते. त्यांनी वारंवार भारताकडे बोट दाखवत निज्जरच्या हत्येत भारतीयांचा सहभाग असल्याचे सांगण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे भारताची नाराजी पत्करणेही साहजिक होते. त्यातूनच दोन्ही देशांचे संबंध सध्या कमालीचे ताणले गेलेले आहेत. इतक्यात ते सुधारण्याची शक्यता दिसत नाही.

कॅनडात खलिस्तानी हदशतवाद्यांना आश्रय मिळत असल्यामुळे त्यांनी तिथे नेहमीच आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न चालवलेला असतो. अनेक दशकांपासून खलिस्तानी दहशतवाद्यांच्या कॅनडातूनच कारवाया सुरू आहेत. अशातच गेल्या वर्षी निज्जरची हत्या झाली. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी यात भारताचा सहभाग असल्याचा दावा केला. जेव्हा कॅनडाचे पंतप्रधानच अशी भूमिका घेतात आणि भारतासाठी घातक ठरलेल्या एका दहशतवाद्याच्या हत्येसाठी भारतावर आरोप करतात, त्यावेळी तिथल्या सरकारवर भारताने अविश्वास दाखवणे योग्य ठरते. कारण भारतातील अधिकाऱ्यांच्या जिवालाही धोका उद्भवू शकतो. कॅनडा सरकारने निज्जरच्या हत्येत भारतीय उच्चायुक्तांचा सहभाग असल्याचेही म्हटले होते. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा वापर करून निज्जरसह अनेकांची हत्या केल्याचे दावे केले जात असले तरी त्यासाठी कॅनडाने पुरावे दिलेले नाहीत, असे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे. आता तर दोन्ही देशांनी आपापल्या उच्चायुक्तांमधील आपल्या अधिकाऱ्यांना मायदेशी परत बोलावले आहे. अशी स्थिती ही युद्धाच्या प्रसंगीच येते म्हणजे एका खलिस्तानवाद्याच्या हत्येचा संशय घेऊन कॅनडाने भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा केलेला प्रयत्न हा उच्चायुक्तांना परत बोलवण्यापर्यंत ताणला जाऊ शकतो, हे क्वचितच घडते. भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधात सध्या हेच चित्र दिसत आहे. 

कॅनडाचा इतिहास आहे की भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांना ते आश्रय देत आले आहेत. १९८१ मध्ये तलविंदरसिंग परमार या खलिस्तानी दहशतवाद्याने पंजाबात पोलिसांची हत्या करून कॅनडात आश्रय घेतला होता. १९८२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तलविंदरसिंग परमारला भारताच्या हवाली करण्याची मागणी तत्कालीन पंतप्रधान पियर ड्रुटो यांना केली होती. त्यावेळीही कॅनडाने परमारला भारताकडे दिले नव्हते. नियतीचा फेरा असा की आज त्याच पियर ट्रुडोचे सुपुत्र कॅनडाचे पंतप्रधान आहेत. दोघांचीही भारताबद्दलची भूमिका काही वेगळी नाही. कॅनडात आपली राजकीय कारकीर्द टिकवण्यासाठी भारताविषयी नेहमीच दोघांनीही भारतविरोधी भूमिका घेतली. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पाठिंबा देत, आश्रय देत त्यांची पाठराखण करण्याचेच धोरण ट्रुडोंनी अवलंबले. भारताने अशा देशासमोर लहान होण्याची गरज नाही. सध्याच्या स्थितीत कॅनडातील भारतीयांबाबत प्रश्न निर्माण होत असले तरी कॅनडातील विद्यमान सरकारला तिथे राहत असलेल्या भारतीयांची नितांत गरज आहे. वर्षभरात तिथे निवडणुका होत असल्यामुळे ट्रुडो यांना तिथे पोषक स्थिती नाही. त्यामुळेच कदाचित खलिस्तानवाद्यांच्या बाजूने आपण असल्याचे भासवून पंजाबमधील स्थलांतरितांचा पाठिंबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. पण त्यासाठी भारतावर आरोप करून इतक्या टोकाची भूमिका कॅनडाने घेण्याची आवश्यकता होती का, असा प्रश्न राहतो. भारतात वाँटेड असलेल्या दहशतवाद्याची हत्या होते तर त्यासाठी कॅनडाने एवढे मनाला लावून घेण्याचे कारण नव्हते. अशा व्यक्तीसाठी भारतावर आरोप करून भारताला जगासमोर बदनाम करण्याचा प्रयत्न कॅनडाने करायला नको. भारतही कॅनडाच्या आरोपांना योग्य उत्तर देईल अशी अपेक्षा आहे.