नियम पाळा ! अपघातात व्यक्ती नव्हे, कुटुंब संपते!

Story: अंतरंग |
17th October, 12:09 am
नियम पाळा ! अपघातात व्यक्ती नव्हे, कुटुंब संपते!

राज्यात सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रम सुरू आहेत. दक्षिण गोव्याचा विचार करता जानेवारीपासून ६९ जणांनी अपघातात जीव गमावला आहे. अपघातात कुटुंबाचा कर्ता गेल्यास पूर्ण कुटुंब देशोधडीला लागते, याचा विचार प्रत्येकाने करावा. नियम पाळल्यास रस्त्यावरील बळींची संख्या नक्कीच कमी होईल. 

सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सोबत घेत जनजागृती केली जात आहे. हेल्मेट नसल्यास इंधन दिले जाऊ नये, असा फतवाच जिल्हा प्रशासनाने जारी केलेला आहे. दंडाच्या रकमेतही मोठी वाढ केलेली आहे. असे असतानाही दक्षिण गोवा जिल्ह्यात यावर्षी जानेवारीपासून ४० छोटे अपघात झालेले आहेत. हात पाय मोडणे, डोक्याला दुखापत होणे अशाप्रकारे गंभीर अपघातांची ६४ प्रकरणे विविध पोलीस ठाण्यांत नोंद आहेत, तर ६९ अपघातांत चालकांचा किंवा गाडीतील प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे. दक्षिण गोव्यात जानेवारीपासून १७३ रस्ते अपघातांची प्रकरणे पोलीस ठाण्यांत नोंद आहेत. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे, खुनाची प्रकरणे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी, पण रस्ते अपघातांत मृत्यू होणार्‍यांची संख्या ६९ असून हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही. रस्ते अपघातांत मृत्यू झालेल्यांचा काहीही दोष नसताना त्यांचा बळी जात असतो. त्यामुळे वाहन चालवताना नियमांचे पालन करणे व जागृती करण्याचे कर्तव्य सर्वांनी बजावण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, त्यांनी सांगितलेली एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी व लोकांना भानावर आणणारी आहे. ती म्हणजे, दक्षिण गोव्यात पोलीस ठाण्यांमध्ये जानेवारीपासून १७३ प्रकरणे नोंद असली तरीही नोंद न झालेली प्रकरणे, रस्त्यांवरच दोन्ही पक्षकारांमध्ये सामंजस्याने मिटवलेल्या प्रकरणांची संख्या दुप्पट असू शकते. याचा विचार केल्यास अनेक अपघात नोंद न झाल्याने त्याचा लेखाजोगा मिळत नाही. त्यामुळे या प्रकरणांचाही विचार होण्याची गरज आहे. 

रस्ते अपघात कमी होण्यासाठी नियमांचे पालन करणे सर्वांच्या हाती आहे. पोलीस खात्याने जनजागृती शिबिरे घेणे, वाहन परवाना रद्द केलेल्यांसाठी पुन्हा प्रशिक्षण देणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना दंडात्मक कारवाई करत धाक दाखवत रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्यास लावण्याचे काम केले जाते. मात्र, आता चालकांमध्ये जनजागृतीसह संवादातही वाढ होण्याची गरज आहे. नागरिकांनी जबाबदारीने वाहन चालवून नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

अजय लाड