कमावले ते गमावण्याचा धोका !

‘इंडी’ आघाडीला आता असे काही तरी करून दाखवावे लागेल की, विरोधकांमधील ऐक्य कायम असल्याचा विश्वास लोकांना वाटावा. अन्यथा त्यांचा मार्ग खडतर असेल.

Story: विचारचक्र |
15th October, 12:05 am
कमावले ते गमावण्याचा धोका !

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी काँग्रेस पक्षाची सत्तेकडील वाटचाल बरीच सुकर होत चालल्याचा त्या पक्षाच्या नेतेमंडळींचाच नव्हे, तर अन्य विरोधी पक्षांचाही जो भ्रम झाला होता तो दूर करण्याचे काम हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने केले आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेस पक्षाने खूप काही गमावले असून नजीकच्या काळात महाराष्ट्र, झारखंड आदी राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकातही काँग्रेसच्या मार्गात बरीच विघ्ने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष अलीकडे फ्रंटफूटवर जाऊन भाजप व अन्य पक्षाना टोलवू लागला होता, पण हरियाणात त्यांना अतिआत्मविश्वास नडला आणि त्याचे परिणाम म्हणजे महाराष्ट्रात त्यांच्यावर आता बॅकफूटवर जाऊन लंगडत खेळण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीने  हरियाणात काँग्रेसची केलेली धुलाई विरोधी ‘इंडी’ आघाडीसाठी जबरदस्त धक्का देणारी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने गलितगात्र झालेल्या भाजपने हरियाणातील निवडणुकीत अशी जादू केली आहे. एकूण राजकीय हवाच यामुळे बदलली आहे, अशीच काहीशी स्थिती निर्माण झालेली स्पष्ट जाणवू लागली आहे. हरियाणात काँग्रेस पक्षाने आपल्या सहयोगी पक्षांशी किंचितही तडजोड केली असती, तर आजचे राजकीय चित्र वेगळेच दिसले असते. कदाचित महाराष्ट्रातही विरोधक बरेच शिरजोर ठरू शकले असते. पण एकूण राजकीय हवा पुनश्च भाजपला अनुकूल अशीच वाहताना स्पष्ट जाणवत आहे.

काँग्रेस नेतृत्वाने हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्येही आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेण्याचा जो उपद्व्याप केला, त्यावरून ‘इंडी’ आघाडीतील बरेच पक्ष त्यांच्यावर नाराज असून या पक्षावर भरवसा कसा ठेवावा, हेच त्यांना कळेनासे झाले आहे. आम आदमी पार्टीने तर काँग्रेसपासून दूर राहण्यातच आपले भले आहे, हे मान्य करून दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार केला आहे. यात अर्थातच भाजपचेच फावणार असल्याने त्यांना त्याचा आनंद होणे स्वाभाविकच आहे. आम्ही हरियाणात केवळ चार ते पाच जागा मागितल्या असतानाही काँग्रेसने अतिआत्मविश्वासाच्या आहारी जाऊन त्याला जो नकार दिला, त्याचे कोणीही समर्थन करत नाही. काँग्रेस नेतृत्वास आता आपली घोडचूक कळून आली असली, तरी त्याला आता खूप उशीर झाला असून त्यातून सावरणे त्यांना कठीण झाले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, झारखंडमध्ये नजीकच्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत भाजप अधिकच आत्मविश्वासाने उतरणार असल्याने आत्मविश्वासच गमावून बसलेल्या काँग्रेसची अधिकच फजिती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हरियाणातील एकूण राजकीय परिस्थिती भाजपसाठी एवढी प्रतिकूल बनून राहिली होती की, खुद्द भाजपलाच सलग तिसऱ्यांदा सत्ता टिकवणे कठीण असल्याची जाणीव झाली होती. पण कसचे काय? काँग्रेसच भाजपला पावली आणि राज्य स्थापनेनंतर प्रथमच सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात त्यांना यश आले. काँग्रेस पक्षातील गटबाजी, मतभेद, असंतोष याचा फायदा भाजपने उठवला नसता, तरच ते नवल ठरले असते.

हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील निवडणुका या देशातील एकूण राजकीय हवा बदलणाऱ्या निवडणुका ठरतील, असे राजकीय निरीक्षकांना वाटते आणि त्यात वावगे असे काही नाही. दोन्हीकडील निकाल वेगवेगळे संकेत आणि तेही अगदी स्पष्टपणे देत आहेत. हरियाणातील निवडणुकीचा धडा घेऊन भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र आणि अन्य राज्यांत विरोधी आघाडीला मात देण्यासाठी तशीच रणनिती आखेल, यात संशय नाही. दिल्लीत आम आदमी पक्षाचा भारदास्त किल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपकडे तसा बराच दारूगोळाही तयार आहे. माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा ८०-८५ कोटींचा ‘शीशमहल’ आणि अन्य बऱ्याच गोष्टी भाजपच्या भात्यात आहेत. ‘शीशमहाला’चे गुपित बाहेर फुटू नये या करिताच शिष्टाचार प्रक्रियेस बगल देत हा बंगला थेट नव्या मुख्यमंत्री आतिशींकडे सोपवण्याचेही कारस्थान करण्यात आले. पण तेही अंगलट आले. दिल्लीत भाजपचे काम बरेच सोपे होईल, असेही अंदाज आज बांधले जातात, तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चास सुरुंग लावण्यातही भाजपने आघाडी घेतलेली दिसते. अर्थातच भाजपसाठी महाराष्ट्र जिंकणे हेच महत्त्वाचे असल्याने त्याकरिता कोणतीही कसर बाकी ठेवण्यात भाजप मागे रहाणार नाही, हे तेथील महायुती सरकारने जनहितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांतून दिसून येते. हरियाणातील निकालाने भाजपला नवी उर्जा मिळाली असून तेथील महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करून आपले इप्सित साध्य करण्यातही भाजप मागेपुढे करेल असे वाटत नाही. 

हरियाणात काँग्रेस पक्षाने केलेली चूक होणार नाही आणि अतिआत्मविश्वासापोटी सहयोगी पक्षांना दुय्यम लेखले जाणार नाही, याकडेही अर्थात भाजपला लक्ष द्यावे लागेल. हरियाणातील निकालाने सर्व राजकीय पक्षांना निश्चितच हा संदेश दिला आहे की, प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि त्यासाठी करावी लागणारी तयारीही एकूण राजकीय परिस्थितीनुरूपच असायला हवी. काँग्रेसने या निकालातून काय धडा घेतला हे महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतील त्यांची रणनिती काय असेल, यावर कळून येईलच. पण काँग्रेसने हरियाणात खूप काही गमावले आहे, हे मान्य करूनच त्यांना पुढे जावे लागेल. हरियाणा आणि काश्मीर विधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम अप्रत्यक्ष का होईना, महाराष्ट्र निवडणुकीवर होईलच. त्यामुळे काँग्रेसला तर सबुरीने पावले टाकावी लागतीलच. उत्तर प्रदेश विधानसभेच्या दहा मतदारसंघांत होणाऱ्या पोटनिवडणुकांचे मोठे आव्हान भाजपसाठी असले, तरी या राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे ‘इंडी’  आघाडीचे काम सोपे नसेल. समाजवादी पक्षाने काँग्रेसला विश्वासात न घेता आधीच सहा जागांवर आपले उमेदवार जाहीर केल्याने पुढे नेमके काय होईल, या विषयी अनेक तर्कवितर्क लढवले जातात. बदलत्या राजकीय हवेचा विचार करता ‘इंडी’ आघाडीला आता असे काही तरी करून दाखवावे लागेल की, विरोधकांमधील ऐक्य कायम असल्याचा विश्वास लोकांना वाटावा. नपेक्षा लोकसभा निवडणुकीत जे काही कमावले ते सगळेच गमावून बसण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकेल. घोडामैदान तर आता जवळच आहे.


वामन प्रभू, (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत)
मो. ९८२३१९६३५९