आघाडी सरकार येऊनही काँग्रेसचा बाहेरूनच पाठिंबा

Story: राज्यरंग |
17th October, 10:22 pm
आघाडी सरकार येऊनही काँग्रेसचा बाहेरूनच पाठिंबा

तब्बल दहा वर्षांनंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. शांततेत झालेल्या या निवडणुकांत मतदारांनीही उत्स्फूर्तपणे भाग घेतला. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बहुमत प्राप्त केले. बुधवारी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळात काँग्रेसचा सदस्य नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसचा आहे की, नॅशनल कॉन्फरन्सने अपक्षांच्या मदतीने बहुमताचा आकडा पार केल्याने त्याला आता काँग्रेसची आवश्यकता राहिली नाही, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, सपाचे अखिलेश यादव, आपचे संजय सिंह यांच्यासह सहा पक्षांचे नेते उपस्थित होते. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेपर्यंत सत्तेत सहभागी होणार नसल्याचे काँग्रेसचे नेते सांगत असले तरी कारण वेगळेच असावे, असे बोलले जात आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले, आमची कामगिरी कुचकामी ठरल्यामुळे मंत्रिमंडळात बसणे आम्हाला योग्य वाटत नाही. मंत्रिमंडळात काँग्रेसला एक जागा मिळणार आहे; पण त्यासाठी कुणाचे नाव पुढे करायचे ठरलेले नाही. सहापैकी चार आमदार पूर्वी कॅबिनेट मंत्री होते; त्यामुळे कुणाला मंत्रि‍पद द्यायचे, प्रश्न आहे. काँग्रेसला मंत्रि‍पदासाठी हिंदू चेहरा पुढे करायचा होता; मात्र सहापैकी एकही आमदार हिंदू नाही.

दुसरीकडे सरकार स्थापनेसाठी आवश्यक ४६ चा आकडा नॅशनल कॉन्फरन्सने आप आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यानेच गाठला आहे. ७ पैकी ४ अपक्ष आमदारांनी १० ऑक्टोबरला, तर दुसऱ्या दिवशी ‘आप’चे एकमेव आमदार आणि आणखी एका अपक्षानेही सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे ओमर यांना नॅशनल कॉन्फरन्सच्या ४२ आमदारांसह एकूण ४८ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी काँग्रेसची गरज राहिलेली नाही. ओमर अब्दुल्ला हे काँग्रेसला एक जागा देऊ इच्छित होते. मंत्रिमंडळात विविध वांशिक घटक आणि प्रांतांना त्यांना सामावून घ्यावे लागणार आहे. सध्या तरी त्यांनी पाच मंत्र्यांसह शपथ घेतली आहे. इतर मंत्र्यांचा निर्णय पुढे ढकलला आहे. काँग्रेसचे तारीक हमीद कर्रा म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारवर नाराज आहोत, त्यामुळे सध्यातरी सत्तेत सहभागी होणार नाही. केंद्रावरील नाराजीचा राज्यातील सत्तेत सहभागी होण्याशी काय संबंध? अन्य राज्यांतही अशीच भूमिका घेणार का, या जनतेच्या मनातील प्रश्नांना काँग्रेस उत्तर देईल का?

प्रदीप जोशी