भारत-कॅनडा संबंधात ‘मिठाचा खडा’

Story: विश्वरंग |
15th October, 11:42 pm
भारत-कॅनडा संबंधात ‘मिठाचा खडा’

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणामुळे भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये गेल्या वर्षभरापासून तणाव निर्माण झाला आहे. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने वर्षभरापूर्वी केला होता. तेव्हा भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते. मात्र कॅनडाने पुन्हा एकदा या प्रकरणाचा उल्लेख करत भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांचा या प्रकरणाच्या तपासात सहभाग असल्याचा आरोप केला आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारताने हरदीप सिंगच्या हत्येच्या तपासात सहकार्य केले नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे असे म्हटले आहे, तर कॅनडातील ट्रुडो सरकारच्या भूमिकेमुळे भारतीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परिणामी भारताने याची गंभीर दखल घेत कॅनडामधील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि दूतावासातील इतर अधिकाऱ्यांना मायदेशी बोलवण्याचा निर्णय घेतला असून दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनाही १९ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही देशांमधील संबंध बिघाडाचे कारण ठरलेला हरदीप सिंग निज्जर नेमका कोण होता, हे आधी जाणून घ्यायला हवे.

कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरातील गुरुनानक शीख गुरुद्वारा साहिबच्या पार्किंगमध्ये जून २०२३ मध्ये हरदीप सिंग निज्जरची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. निज्जर हा सरे येथील गुरू नानक शीख गुरुद्वारा साहिबचे अध्यक्ष होता आणि भारत सरकारच्या ‘वॉन्टेड’ यादीत त्याचा समावेश होता. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, निज्जर खलिस्तान टायगर फोर्सचे सदस्य होता. खलिस्तान टायगर फोर्सला भारत विरोधी कारवाया, नेटवर्किंग, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य पुरवण्यात त्याचा सक्रिय सहभाग होता. २०२० मध्ये वेगळ्या खलिस्तान राष्ट्रासाठी ‘शीख जनमत’ या ऑनलाईन मोहिमेत निज्जरचा यांचा सहभाग होता. ही मोहीम ‘सिख फॉर जस्टिस’ या भारतात बंदी घातलेल्या संस्थेने चालवली होती.

खलिस्तान समर्थक खलिस्तान नावाच्या वेगळ्या देशाची मागणी करत आहेत. कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेले शीख स्थलांतरित ही मोहीम परदेशी मदतीने चालवत आहेत. पंजाब राज्य आणि आजूबाजूच्या हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे विलिनीकरण करून खलिस्तान देश तयार करायचा आहे. यात पाकिस्तानमधील पंजाबचा देखील समावेश आहे. 

सध्या कॅनडा, ब्रिटन तसेच अमेरिकेत राहणाऱ्या शिखांकडून या खलिस्तान चळवळीला रसद आणि वैचारिक पाठिंबा दिला जात आहे. पाकिस्तानच्या काही संघटना देखील खलिस्तान चळवळीला पुनरुज्जीवित करण्यासाठी पैसा आणि शक्ती पुरवत आहेत. कॅनडातील काही शहरांमध्ये ही चळवळ जोर धरू लागली आहे.

- गणेशप्रसाद गोगटे