अश्विनला न्यूझीलंडविरुद्ध इतिहास रचण्याची संधी

Story: क्रीडारंग |
15th October, 12:07 am
अश्विनला न्यूझीलंडविरुद्ध इतिहास रचण्याची संधी

बांगलादेशला कसोटी आणि टी-२० मालिकेत धूळ चारल्यानंतर टीम इंडियाला आता कसोटी मालिकेत न्यूझीलंडशी भिडणार आहे. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा आर. अश्विनवर असणार आहेत, कारण या मालिकेत तो ५ मोठे विक्रम मोडू शकतो.      

या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून (१६ ते २० ऑक्टोबर) बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू होणार आहे. या मालिकेतील पुढील दोन कसोटी सामने पुणे (२४-२८ ऑक्टोबर) आणि मुंबई (१-५ नोव्हेंबर) येथे होणार आहेत.       

आर. अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ३७ सामन्यांमध्ये १८५ बळी घेतले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने आणखी तीन बळी घेतल्यास तो नॅथन लायनचा विक्रम मोडेल आणि डब्ल्यूटीसीच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फिरकीपटूने ४३ डब्ल्यूटीसी सामन्यात आतापर्यंत १८७ बळी घेतले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने आणखी १५ बळी घेतल्यास तो इतिहास रचेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २०० बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरणार आहे.अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५२७ बळी घेतले आहेत. अशा स्थितीत त्याने आणखी ४ बळी घेतल्यास तो नॅथन लायनला मागे टाकेल आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा सातवा गोलंदाज ठरेल. लिऑनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५३० बळी घेतले आहेत. अश्विनने भारतात खेळल्या गेलेल्या १२८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ४६६ बळी​ घेतले आहेत. न्यूझीलंड मालिकेत त्याने ११ बळी घेतल्यास तो भारतीय भूमीवर सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. तो अनिल कुंबळेचा ४७६ आंतरराष्ट्रीय बळींचा विक्रम मोडेल.जर अश्विनने या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार जिंकला तर तो सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणारा खेळाडू बनेल. सध्या मुथय्या मुरलीधरन आणि अश्विन हे मालिकावीर पुरस्कार जिंकण्याच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. अशा परिस्थितीत जर त्याने आणखी एकदा हा पुरस्कार जिंकला तर तो मुथय्या मुरलीधरनच्याही पुढे जाईल. सध्याचा आर. अश्विनचा फॉर्म पाहता तो पाचही विक्रम या मालिकेत मोडू शकतो, यात शंका नाही.

प्रवीण साठे