वेश्या व्यवसाय प्रकरणातून दलालाची​ निर्दोष सुटका

ग्राहकाची सुनावणी सुरू ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th October 2024, 12:25 am
वेश्या व्यवसाय प्रकरणातून दलालाची​ निर्दोष सुटका

पणजी : वेश्या व्यवसायप्रकरणी छाप्यादरम्यान पोलिसांच्या तपासातील त्रुटींमुळे न्यायालयाने संशयित दलाल मंजुनाथ बालगानूर याची आरोपातून निर्दोष सुटका केली, तर ग्राहकाच्या विरोधात सुनावणी पुढे सुरू ठेवण्याचा आदेश जारी केला. याबाबतचा आदेश पणजी येथील अतिरिक्त सत्र न्या. अपूर्वा नागवेकर यांनी दिला आहे.

या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी १ जून २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी तक्रार दाखल केली होती. वेश्या व्यवसायासाठी दोन महिलांना आणले असून ३१ मे २०१८ रोजी मध्यरात्री टॅक्सीतून त्यांना बागा परिसरात ग्राहकांना पुरवण्यात येणार असल्याची माहिती गुप्तहेरांकडून कळंगुट पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक जिवबा दळवी याच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ३१ मे २०१८ रोजी मध्यरात्री बागा परिसरात छापा टाकला. त्यावेळी पथकाला एक टॅक्सीमधून महिलांची तस्करी होत असल्याचे आढळून आले. पथकाने टॅक्सीचालक तथा संशयित दलाल मंजुनाथ बालगानूर याला ताब्यात घेतले. त्यानंतर पथकाने ग्राहक केवीन कुमार पटेल यालाही ताब्यात घेतले. तसेच दोन महिलांची सुटका करून त्यांची मेरशी येथील महिला सुधारगृहात रवानगी केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित दलाल मंजुनाथ बालगानूर आणि ग्राहक केवीन कुमार पटेल यांच्याविरोधात मानवी तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित दलाल बालगानूर याच्यातर्फे अॅड. नारायण आमोणकर यांनी बाजू मांडली. पीडित महिलांच्या जबाबाचा उल्लेख करून त्या दोघी महिला ‘कमर्शिअल सेक्स वर्कर’ असून त्यांची यापूर्वी २०१७ मध्ये सुटका करण्यात आल्याचा युक्तिवाद केला. त्यांना बालगानूरने गोव्यात आणून जबरदस्तीने वेश्या व्यवसायसाठी वापरण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच ती दोघी राहत असलेल्या हॉटेलची माहिती दिलेली नाही. शिवाय पोलिसांनी बनावट ग्राहकांची व्यवस्था करून छापा टाकल्याचे कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नसल्याचा युक्तिवाद केला.

न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तिवादाची दखल घेऊन यात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवले. या प्रकरणात आरोप सिद्ध करण्यासाठी संशयित आणि पीडित महिलेचे कॉल रेकॉर्डिंग किंवा संदेशांसारखे इलेक्ट्रॉनिक तसेच आर्थिक व्यवहाराचे पुरावे पोलिसांनी गोळा केले नाहीत. पोलिसांनी चॅपेलजवळ छापा टाकल्याचे नमूद केले, परंतु संबंधित चॅपेलची माहिती तसेच इतर पुरावे सादर केलेले नाहीत. पोलिसांनी केलेल्या तपासात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे नमूद करून न्यायालयाने संशयित दलाल मंजुनाथ बालगानूर याची आरोपातून निर्दोष सुटका केली.