मडगावातील आंदोलकांकडून आंदोलन स्थगित; भाविक अटकेवर ठाम
आंदोलन स्थगित केल्याची घोषणा करताना मडगावातील आंदोलक. (संतोष मिरजकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव/पणजी : जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्याची हमी पोलिसांनी दिल्यानंतर आणि चर्च संस्थेने शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी रविवारी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, वेलिंगकर यांनी पणजी सत्र न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डीएनए’ चाचणी करण्याची मागणी वेलिंगकर यांनी केल्यानंतर भाविकांमध्ये संताप पसरला. मडगाव परिसरातील भाविकांनी शनिवारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन स्थानिकांना मोठा फटका बसला. वेलिंगकर यांच्यावर कारवाईचे आश्वासन पोलिसांनी देऊनही आंदोलकांनी दिवसभर आंदोलन सुरू ठेवले. रविवारपर्यंत वेलिंगकर यांना अटक न झाल्यास रविवारी पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत त्यांनी आंदोलन स्थगित केले. तरीही रात्री काही आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीमार करावा लागला.
दरम्यान, फादर बोल्मॅक्स परेरा यांच्यासारखीच कारवाई वेलिंगकरांवर होईल, असे आश्वासन देत रस्त्यावर उतरून कायदा हातात न घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी केले होते. त्यानंतर फादर बोल्मेक्स परेरा, डॉ. ऑस्कर रिबेलो आदींनी आंदोलकांना शांतता बाळगण्याचा सल्ला दिला होता. तरीही रविवारी सकाळी मडगावात आंदोलक एकत्र जमले होते. परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.
पोलीस महाराष्ट्रात
सुभाष वेलिंगकर यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांनी रविवारीही मोहीम कायम ठेवली. दोन पथकांना महाराष्ट्रातही पाठवले होते. या पथकांनी तेथे वेलिंगकरांचा शोध घेतला; पण ते न सापडल्याने ही पथके गोव्यात परत आली. पोलिसांनी रविवारी दिवसभर राज्यातही त्यांचा शोध घेतला; परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
पाचशे जणांविरोधात गुन्हा नोंद
सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी शनिवारी आंदोलन छेडून मडगावात रास्ता रोको करत नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी प्रतिमा कुतिन्हो, साविओ कुतिन्हो यांच्यासह सुमारे पाचशे जणांवर फातोर्डा पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अटकेच्या मागणीला जोर
वेलिंगकर यांना तत्काळ अटक करण्याची मागणी राज्यातील विविध भागांतील भाविकांकडून जोर धरत आहे. रविवारी जुने गोवे पोलीस स्थानकावर जुने गोवे, दिवाडी, माशेल परिसरातील भाविकांनी गर्दी केली आणि आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी पोलिसांना दिले.
समर्थनार्थ हिंदू संघटना एकवटल्या !
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डीएनए’ चाचणी व्हावी, अशी मागणी वेलिंगकरांपूर्वी अनेकांनी केली आहे. आमचीही तीच मागणी आहे. त्यांना अटक झाल्यास परिणाम वाईट होतील, असा इशारा देत काही हिंदू संघटना रविवारी म्हापशात एकवटल्या. ‘डीएनए’ चाचणीच्या मागणीमुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचे कारण नाही. हे शव त्यांचेच आहे की अन्य कुणाचे, हे सत्य बाहेर यायलाच हवे, अशी भूमिका या संघटनांनी घेतली.
सुभाष वेलिंगकर यांच्यावर पोलीस तसेच न्यायालयाकडून योग्य ती कारवाई होणारच आहे; परंतु यावरून आंदोलन छेडत, रास्ता रोको करत सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
राष्ट्रीय स्वयंंसेवक संंघाचे माजी नेते सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून गोव्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीती आहे. ख्रिश्चन आणि हिंदू संघटनांमध्ये वाद निर्माण करण्याचा भाजपचा हेतू आहे. भाजपच्या राज्यात निसर्गाने भरभरून दान दिलेल्या गोव्यासारख्या शांत राज्यात धार्मिक ऐक्य धोक्यात आले आहे. संघ परिवाराकडून अन्य राज्यांतही धार्मिक कलह माजवणारे प्रकार सुरू आहेत. पर्यावरणीदृष्ट्या संंवेदनशील भागाचा विध्वंंस करून समाजात फूट पाडण्याचे भाजपचे धोरण आहे. भाजपच्या या धोरणाला गोव्यासह अन्य भागांतही विरोध होत आहे. धार्मिक ऐक्य राखण्याचे आज आव्हान आहे.
_ राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा तथा खासदार, काँग्रेस