बनीला उमगली त्याची चूक

Story: छान छान गोष्ट |
06th October, 05:00 am
बनीला उमगली त्याची चूक

एक होता ससा. त्याचं नाव होतं चिकू आणि त्याच्या बायकोचं नाव होतं चिंगी. त्यांना दोन मुलं होती. एक होत्या रड्या बनी आणि दुसरी होती हुशार टिनी. बनी आणि टिनी खूप खेळायचे आणि नंतर संध्याकाळी देवासमोर शुभंकरोती झाल्यावर चिमी आज्जीला पाढे म्हणून दाखवायचे. टिनी पटापट पाढे म्हणायची तर बनी पाढे म्हणताना खुपदा अडखळायचा. टिनी घरात वेळ मिळाला की चित्रं काढत बसायची, त्यामुळे टिनीला छान छान चित्रं काढायला यायची, तर बनी मोबाईलवर गेम खेळायचाय म्हणून आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा आणि आईचा ओरडा खायचा. चिकू बाबा घरी आले की टिनी त्यांना पाणी आणून द्यायची, ते हात पाय धुवायला बाथरूममध्ये गेल्यावर टिनी बाहेर टॉवेल घेऊन उभी असायची, तर बनी त्यांच्या हातातला मोबाईल घ्यायला धावायचा. टिनीला छान छान कविता, स्तोत्रे म्हणता येत असत. त्यांच्या वर्गात टिनी गणिते एका चुटकीसरशी सोडवून टाके. तर बनी काही लिहायचं म्हटलं की रडत बसे, पाठ करायचं म्हटलं की कंटाळत बसे. गणितं सोडवताना लक्ष नीट नसल्यामुळे त्याच्या गणितात छोट्या छोट्या चुका होऊन पूर्ण गणित चुके. या मोबाईलच्या वेडामुळे बनीचे डोळे सतत चुरचुरत असायचे आणि डोकं सुद्धा नेहमी दुखत असायचे. “बनी बाळ, तुला आता चष्मा लागतो वाटतं” चिंगी आई नेहमी म्हणायची.

एक दिवस चिंगी आईच्या मोबाईलवर बनी-टिनीच्या शाळेच्या पालक-शिक्षकांच्या ग्रुपमध्ये टीना हरीण या त्यांच्या क्लास टीचरनी एक मेसेज पाठवला होता. ‘अबकड जंगल’ तर्फे इंग्रजीची स्पेलिंग बी स्पर्धा घेण्यात येणार होती आणि त्यासाठी दुसऱ्या दिवशी बाईंंना त्यात सहभागी होण्यासाठी नावं द्यायची होती. पहिल्या क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्याला अमेरिकेच्या एमेझोन जंगलात सात दिवस, सहा रात्रींची आई बाबांसोबत सफर बक्षीस म्हणून मिळणार होती आणि तिथल्या एमेझोन स्कूलमध्ये विजेत्यांचा सत्कारही होणार होता. आईने बनी आणि टिनी दोघांनाही स्पर्धेबद्दल विचारले. टिनीने नेहमीप्रमाणे या स्पर्धेत भाग घेतला आणि बनीने मात्र कंटाळा म्हणून यात भाग न घेता घरी बसून मोबाईलवर खेळण्यात वेळ घालवण्याचा पर्याय निवडला.

टिनी शाळेतून येताच लगेच पुन्हा शाळेत टीना हरीण बाईंकडे स्पेलिंग बी’च्या सरावासाठी जायची, नवनवीन शब्द, त्यांचे अर्थ शिकून घ्यायची आणि घरी येऊन पुन्हा सराव करत बसायची. तिची नवीन शब्दांची वही नवीन शब्दांनी जवळजवळ अर्धी भरत चालली होती. तर बनी हल्ली घरी आला की रडत रडत घरचा अभ्यास करून मोबाईल घेऊन बसायचा. त्यात रील्स बघत बसायचा किंवा खेळत बसायचा. 

एक दिवस बनीला डोळे चुरचुरत असल्यामुळे आणि डोकं खूप दुखत असल्यामुळे डॉ. गजेंद्र हत्ती या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांनी त्याचे डोळे तपासले तर त्याला काही अक्षरं नीट दिसतच नव्हती. डॉ. गजेंद्रनी त्याला मोबाईल किंवा कोणतीही स्क्रीन जास्तवेळ अज्जिबात पहायची नाही अशी सक्त ताकीद दिली आणि त्याला चांगल्या जाडजूड भिंगाचा चष्मा घालायला दिला. स्पर्धेचा दिवस आला आणि टिनीच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले. टिनीला स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले. ती नाचत नाचत घरी आली आणि हात पाय धुवून तिने ट्रॉफी आणि एमेझोनच्या जंगलात जायची तिकीट देवापुढे ठेवली. घरातल्या सगळ्यांच्या पाया पडली. सगळे जण तिचे कौतुक करत होते. बनीने त्यांच्या शाळेत पण तिचे कौतुक होताना पहिले होते. आई बाबांनी टिनीसोबत जायला बॅग भरून ठेवलीच होती. 

बनीला रडूच कोसळले. त्याने सगळ्यांसमोर जाऊन हात जोडून माफी मागितली. “माझं चुकलं. टिनी खूप शहाणी मुलगी आहे. मी वाईट वागलो. सारखा मोबाईल घेऊन बसायचो, अभ्यासाला कंटाळा करायचो. तुम्हा कुणाचेच मी ऐकले नाही. याचे फळ मला मिळाले, डोळ्यांवर हा जाड जाड भिंगांचा चष्मा आला. टिनी मात्र आई बाबांसोबत अमेरिकेला जाणार. तिने भरपूर मेहनत केली आळस न करता म्हणून तिचे मला खूप कौतुक वाटते. यापुढे मी असे कधीच करणार नाही. माझे चुकले...” रडत रडत बनी म्हटला. चिकू बाबांनी हळूच त्याच्या हातावर त्याचे अमेरिकेचे तिकीट ठेवले. चिंगी आईने त्याला जवळ घेऊन त्याचे खूप लाड केले. त्याला त्याची चूक कळावी हेच तर तिला हवे होते! 


 स्नेहा सुतार