सावी मावशी… जगण्यातील एक आनंद

‘चान्नं बाई चान्नं गं टिपूर चान्नं’ ही फुगडी तिच्या वाणीतून ऐकताना मन भारावून जायचं. पुन्हा पुन्हा तो गोड आवाज ऐकावसा वाटायचा. आकाशातील चंद्र आणि त्याच्या प्रकाशात तो गोड आवाज म्हणजे जणू एक चांदणीच गाते असं वाटायचे.

Story: सय अंगणाची |
05th October, 04:25 am
सावी मावशी… जगण्यातील एक आनंद

वीस-बावीस वर्षं मागे वळून पाहिलं, तरी हल्लीच माझं बालपण गेल्यासारखं वाटतं कारण असंख्य व्यक्तींनी बालपणीच्या आठवणी मनात रुजवल्या, त्या जगण्यातील आनंदासाठी‌. नकळत्या वयात अनेक दु:खांनी आयुष्याला घेरले खरे, परंतु काही चेहरे नुसते बघ्याची भूमिका निभावणारे लाभले, तर काहींनी अलगद आपल्या उराशी घेऊन आपुलकी, माया ममतेचे हात डोक्यावरून फिरवले.

डिचोली तालुक्यातील कुडचिरे हे नुसतं आईच्या पोटात नऊ महिने वाढीसाठी म्हणून माझं जन्मगाव ठरलं. जिथे आठवणींच बीज मात्र कधी रूजलंच नाही. मला माझे आपलेसे वाटणारे, असंख्य कडू गोड प्रसंगांना लहान वयात सामोरे जाण्याची जिद्द निर्माण करणारे ते सत्तरी तालुक्यातील माळोली गाव. माझ्या एकटीसाठी ते माझं जन्मगावच ठरलं. मुखातून आई-बाबा या शब्दांच्या उच्चारानंतर मुखातून आलेला शब्द म्हणजे मावशीच असावा कदाचित कारण आई आणि मावशी हे शब्द जीवलग बनलेले. आसऱ्यासाठी तिच्या दिराच्या घरी काही दिवसांसाठी वास्तवास असलेले माझं कुटुंब. आपलं कौलारू घर जागा-जमीन सोडून वादळी प्रवासातून खऱ्या अर्थाने आपली सुटका करून घेतलेली. 

 आईच्या दु:खात धीराचा आधार देणारी सावी मावशी. वाड्यावर जास्त कुटुंबसंख्या असलेली हुमाणे घराणी. आठ मुलांचं आईपण लाभलेली सावी मावशी आणि तेवढाच तिचा जीवनसाथी भागा मावसा. तिच्या रागातील आवाजही गोड वाटायचा. एवढी साधी राहणीमान असलेली सावी मावशीचा चेहरा जणू लहान मुलासारखाच मला वाटायचा. सतत धनगरी चिरकूट नीटनेटपाणाने नेसणारी. आमच्या धनगर वाड्यावरची शान म्हणावी, तशी सावी मावशी. एवढी मनमिळाऊ, निरागस स्वभाव असलेली सावी मावशी माझ्या आयुष्यातील पहिले लाडके व्यक्तिमत्त्व. “पिंक्या पिंक्या” म्हणत मला ती सतत हाका मारणारी. मंगळवारच्या बाजारातून आणलेलं खाऊ माझ्या हातात दिले नाही असं कधी घडलंच नाही. आपल्या मुलांएवढं मला जपणारी ती. शाळेतून घरी आल्यावर आई-बाबा नसायचे. मी जेवले की नाही याची विचारपूस करण्यासाठी मावशीच्या हाका सुरू व्हायच्या. घरात नवीन पदार्थ बनवला की एका वाटीत घालून माझ्यापर्यंत पोहोचवायची ती. आई-वडील जसे असतील तशीच मुलं घडतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सावी मावशी आणि तिचे कुटुंब. कधी कुणाशी द्वेष नाही की वैर. आवाज चढवून बोलणे हे सावी मावशीला कधी जमलंच नाही. मावशीचा स्वभाव तिच्या मुलांमध्येही दिसत होता. जणू आईच्या पावलावर पाऊल ठेवून शामू दादा, नाना भाई, बाबी भाई, महादेव, धाकटी बाय, संगीता बाय, गंगी बाय यांनीही तेवढीच आपुलकी आमच्यामध्ये निर्माण केली.

सगळ्यांना आवडणारी सावी मावशी कधी कुणी तिच्याविषयी काही वाईट बोलले असं कानी पडलंच नाही. तिच्या आवाजातील गोडवा मला सुखद आनंद देणारा असायचा. मधल्या आजोबांच्या घरासमोर मातीचा रस्ता होता. जणू शेणाने सारवल्या सारखा वाटणारा. तिथे कितेक वेळा रात्रीच्या धनगरी फुगड्या रंगायच्या. चंद्राच्या प्रकाशात तो परिसर उजळून उठायचा. फुगडीचा फेर धरला की एकदम सुरू व्हायच्या दिवसभर थकल्या-भागल्या जींवाच्या फुगड्या. सावी मावशी मला बाजूला बसवायची. कधी चंद्राला पाहत, तर कधी मनात आलं तर नुसतं गुणगुणत बसायचे मी. फुगड्यामध्ये कधी रस वाटलाच नाही मला. परंतु सावी मावशीचा आवाज कानी पडला की माझं लक्ष तिच्याचकडे. ‘चान्नं बाई चान्नं गं टिपूर चान्नं’ ही फुगडी तिच्या वाणीतून ऐकताना मन भारावून जायचं. पुन्हा पुन्हा तो गोड आवाज ऐकावसा वाटायचा. आकाशातील चंद्र आणि त्याच्या प्रकाशत तो गोड आवाज म्हणजे जणू एक चांदणीच गाते असं वाटायचे. 

धनगरी चिरकूट, डाव्या खांद्याला काळ्या रंगाचे बॅग, पायात जुन्या पध्दतीचे अंगुठ्याचे चप्पल हे घरातून बाहेर निघताना ठरलेलंच असायचं तिचं. दारी आलेल्या व्यक्तींशी तोंडभरून बोलणारी मावशी. कधी तिच्या बोलण्यात हा स्वार्थीपणा जाणवलाच नाही. ती नकळत इतरांची दु:ख जाणून घ्यायची. भागा मावसा कुणावर रागावला तर ती त्यांची समजूत काढायची. तिच्या या सोज्वळ स्वभावामुळे माझ्या लहानपणी तिच्या घरात आलेली तिची मोठी सून शशी बाय ही त्याच स्वभावाची. जशी सासू, तशी सून. सावी मावशीने नाती जोडली ती नावापुरती नाहीत, तर तिच्या आठवणी तिच्या नावासहित आमच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेल्या. 

“पिंक्या तुज्या लग्नाला येईन मी.” असं सतत सांगणारी, सावी मावशी चालता-बोलता आयुष्यातून शरीराने नाहीशी झाली हे कळून सुद्धा मनाला पटलचं नाही. अशी समुद्रासारख्या अथांग आठवणी पसरवणाऱ्या मावशीला काळाने का बरं आपल्या कवेत खेचून घेतलं असेल? हसत आनंदात मुलं-सूना नातवंडांसोबत लहान मुलासारखी वावरणारी सावी मावशीने प्रामाणिकपणाचे बाळकडू मात्र आम्हाला पाजले. तिच्या जाण्याने बालपणीच्या गावात जायला आता हात पाय मात्र नुसते कापतील. गाव आठवताच आठवेल सावी मावशी आणि तिने मला आणि माझ्या कुटुंबाला दिलेल्या गोड आठवणी. गाडीतून उतरल्यावर “पिंक्या” म्हणून ऐकू येणाऱ्या हाकेचा आता नुसता भास होत राहील गं. क्रूर काळाने जणू घातच केला कायमस्वरूपी.

मज दिसणारा तुझा चेहरा

जणू तो चंद्रासारखा...

अवतीभोवती चमकणाऱ्या चांदण्यातली

एक चांदणी तू गं...

एखाद वेळी न दिसताही 

सर्वांच्या आयुष्यात चमकणारी 

तू माझी लाडकी मावशी गं...


ओनिता वरक, पाल-ठाणे, सत्तरी