‘कॉलरा’ पासून सावधान...

कॉलरा रोग विष्ठेमध्ये आढळणाऱ्या व्हिब्रिओ कॉलरा या बॅक्टेरियाने दूषित अन्न किंवा पाण्याच्या सेवनामुळे होतो. शहरी झोपडपट्ट्या, निर्वासित छावण्या आणि स्वच्छतेच्या योग्य सुविधा नसलेल्या गरीब वसाहतींमध्ये तसेच अस्वच्छता आणि विषारी पाणी असलेल्या ठिकाणी हे बऱ्याचदा दिसून येते.

Story: आरोग्य |
05th October, 07:27 am
‘कॉलरा’ पासून सावधान...

गोव्यात मागील काही दिवसांपासून कॉलरा रोगाचा संसर्ग उगवताना दिसून येत आहे. मत्स्यव्यवसाय चालू असलेल्या गोव्याच्या किनारी भागांवर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे तिथे काम करत असलेल्या कितीतरी कामगारांवर परिणाम झालेला असून काही जणांचा मृत्यूही झालेला आहे. माश्यांच्या कचर्‍यामुळे परिसर दूषित झाल्याने, तसेच तिथल्या कामगारांमध्ये स्वच्छतेचा अभाव कॉलरास कारणीभूत ठरला आहे. कॉलरा या संसर्गाचे नाव आपल्याला ओळखीचे वाटले तरी याबाबत जागरुकता वाढवून घेणे गरजेचे आहे.

कॉलरा म्हणजे काय?

कॉलरा हा रोग आतड्यांसंबंधी संसर्गाचा असून दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो. कॉलराचा जीवाणू व्यक्तीच्या आतड्यांमध्ये हल्ला करतो आणि अतिसार, उलट्या होऊन, शरीरातील द्रव पदार्थ निघून जातो. उपचार न केल्यास गंभीर प्रकरणांमध्ये डिहायड्रेशन वाढून मृत्यूदेखील होऊ शकतो.

कॉलरा जिवाणू बहुतेक वेळा कॉलराच्या जंतूंनी संक्रमित लोकांच्या विष्ठेमुळे दूषित झालेल्या पाण्यात किंवा अन्नपदार्थांमध्ये आढळतो. खराब पाणी प्रक्रिया आणि स्वच्छता नसलेल्या भागात कॉलरा होण्याची आणि पसरण्याची सर्वाधिक शक्यता असते. कॉलराचे जीवाणू खाऱ्या नद्या आणि किनारी जलमार्गांमध्ये देखील आढळू शकतात. शेलफिश हे संसर्गाचे स्रोत असू शकते.


कॉलराची लक्षणे

कॉलराचा अधिशयन कालावधी काही तास ते ५ दिवस इतका आहे. कॉलराच्या बहुतेक रुग्णांमध्ये मध्यम ते गंभीर लक्षणे असतात. पाण्‍यासारखे किंवा तांदळाच्‍या पेजेसारखे वारंवार जुलाब, उलट्या, हृदयाचे ठोके वाढणे, तोंडाला कोरड पडणे, तहान लागणे, स्‍नायूंमध्‍ये गोळे येणे, अस्‍वस्‍थ वाटणे अशा प्रकारची लक्षणे रुग्णांमध्ये आढळतात.


कॉलरा कसा पसरतो?

कॉलरा रोग विष्ठेमध्ये आढळणाऱ्या व्हिब्रिओ कॉलरा या बॅक्टेरियाने दूषित अन्न किंवा पाण्याच्या सेवनामुळे होतो. शहरी झोपडपट्ट्या, निर्वासित छावण्या आणि स्वच्छतेच्या योग्य सुविधा नसलेल्या गरीब वसाहतींमध्ये तसेच अस्वच्छता आणि विषारी पाणी असलेल्या ठिकाणी हे बऱ्याचदा दिसून येते. कॉलरा खालील प्रकारे पसरतो.

संक्रमित व्यक्तीच्या विष्ठा/मल (पूप) च्या संपर्कात आल्यास

विष्ठेने (जीवाणू-विब्रिओ कॉलरा) दूषित झालेले अन्न, कच्ची फळे आणि भाजीपाला खाल्ला किंवा पाणी पिल्यास.

कच्चे किंवा कमी शिजवलेले सीफूड, विशेषत: खेकडे आणि ऑयस्टरचे सेवन केल्यास.

कॉलरा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला फक्त संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेच्या संपर्कातून पसरू शकतो.

पोटातील आम्लाची पातळी कमी असल्यास, O रक्तगटांच्या असलेल्या लोकांमध्ये कॉलरा होण्याची शक्यता जास्त असते.

कॉलरावर उपचार

अतिसार-उलट्या चालू असताना डिहायड्रेशनची लक्षणे असल्‍यास ओ.आर.एस.चा वापर करावा. तसेच पेज, सरबत इत्‍यादी घरगुती पेयांचा वापर करावा. तीव्र डिहायड्रेशन असल्‍यास रुग्‍णास नजीकच्‍या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्‍टेट देण्‍यात यावे. झिंक टॅब्लेटमुळे अतिसाराचा कालावधी २५ टक्क्याने कमी होतो. तसेच उलटीचे प्रमाण‍ही घटते. डिहायड्रेशन कमी करण्‍याबरोबर योग्‍य प्रतिजैविकांची योग्‍य मात्रा देण्‍यात यावी.

कॉलरावर प्रतिबंधात्‍मक उपाय

कॉलरावर नियंत्रणासाठी शुद्ध, निर्जंतुकीकरण केलेले पाणी पिणे व वैयक्तिक स्‍वच्‍छता राखणे महत्त्वाचे आहे. खाण्‍यापूर्वी व स्वयंपाकापूर्वी, बाळाला दूध व अन्न भरविण्‍यापूर्वी, शौचानंतर, बाळाची शी धुतल्‍यानंतर, जुलाब असलेल्‍या रुग्‍णांची सेवा केल्‍यानंतर हात नेहमी साबणाने व स्‍वच्‍छ पाण्‍याने धुवावेत. कमीतकमी ६०% अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरावे. मानवी विष्‍ठेची योग्‍यप्रकारे विल्हेवाट लावावी. रुग्‍णांवर त्‍वरित उपचार करुन घ्यावे. फळे आणि भाज्या निर्जंतुक करण्यासाठी प्रत्येक लिटर पाण्यात, आयोडीनची अर्धी गोळी किंवा घरगुती ब्लीचचे दोन थेंब घालून वापरावे व  धुण्याच्या पाण्यात क्लोरीन गोळ्यांचा वापर करावा.

कॉलरा लसीकरण हा या आजारापासून बचाव करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. पण ही लस निरोगी व्यक्तींमध्ये नियमित वापरासाठी शिफारस केली जात नाही, फक्त साथ पसरलेल्या भागात राहणाऱ्या व्यक्तींनाच दिली जाते. कॉलरा झाल्यास बरे होण्यासाठी, स्वतःची काळजी घ्यावी आणि योग्य वैद्यकीय सेवा मिळवताना आपली रोगप्रतिकारक शक्ती राखावी.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर