सांज ये अंबरी

प्रत्येकाच्या जीवनचक्रात असे वेगवेगळे ऋतु आणि बदल येतच असतात. दिवसामागून रात्र अशा घटिका येतातच. म्हणजे सुख दु:खाची ऊनसावली स्वीकारतच आपण आपलं जीवन व्यतीत करत असतो आणि आयुष्याच्या संध्यासमयी एक रितेपण मनाला ग्रासून टाकतं.

Story: मनातलं |
05th October, 04:11 am
सांज ये अंबरी

दिवसामागून रात्र, रात्रीमागून दिवस हे निसर्गचक्र सतत फिरतच असतं. त्यातच मधेमधे अनुभवायला येणारे उमलते पहाट क्षण, रखरखीत दुपार, टळटळीत मध्यान्ह, शांत संध्याकाळ, रुखरुख लावणारी कातरवेळ, चांदण रात्र, भयाण मध्यरात्र अशा क्षणांनी आपले दिवस आणि रात्र व्याप्त असतात. प्रत्येक वेळेची अशी एक खासियत असते. पहाट प्रसन्नता घेऊन येते, दुपार थोडी त्रासदायक वाटते, झोपेविना मध्यरात्र तळमळत जाते तर तिन्हीसांज कातर क्षण घेऊन येते. ही खरं तर दिवेलागणीची वेळ. थोड्याच वेळात सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरू लागते पण त्यावर दीप ज्योती लावून आपण मात करू पाहतो. 

पण त्या काळात अगदी जाता जाता चित्रकार सूर्यदेवाने आपल्या रंगांची जादू अंबरी पसरवलेली असते. पिवळ्या तांबूस भगव्या सोनेरी छटांसह आकाशात रंगाचे हवे तसे फटकारे मारून एक नवीनच कलाकारी निर्माण केलेली असते. प्रत्येक वेळेची ती नक्षीकारी वेगळेच रंग रूप घेऊन येत असते. त्या रंगांच्या छटा पाहून आपल्या मनातही रंग बावरे क्षण जागे होतात. अंबरात सोनेरी रंगाची उधळण करत सूर्य त्याच्या घरी अस्ताला चाललेला असतो, गाई गुरे आपल्या गोठ्याकडे परतू लागतात, पक्षी आपल्या कोकराकडे धाव घेतात, कामाला गेलेली माणसे घराच्या ओढीने परतत असतात. अशा वेळी मन प्रफुल्लित असतं कारण घरी परतण्याची ती वेळ शुभ असते. 

मनात स्वप्नाचे दीप प्रज्वलित होतात. मनात आशेचे किरण डोकावू लागतात. मनात एक भीतीचे सावट आलेले असते. सूर्यप्रकाश मंदावू लागतो त्यामुळे मनावर झाकोळ येतो, उगाचच उदासीनता भरून राहते. मन व्याकूळ होतं. आपल्या जवळच्या कुणाची तरी प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मनाच्या तळाशी गच्च दाबून ठेवलेल्या आठवणी डोकं वर काढू लागतात. ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’ असं मन अट्टाहास करू लागतं. घरापासून दूर गेलेल्यांच्या आठवणीने मन व्याकूळ होतं. 

दिवसाचा अंत आणि रात्रीची सुरुवात म्हणजे सांज बेला. अशा या तिन्ही सांजेला कुठे आई आपल्या घरी परतणाऱ्या पिल्लाची काळजी करत असते, कुठे नवरा कामावरून घरी आला नाही म्हणून  बायको चिंतेत असते, कुठे एखादा गरीब आज काम नाही मिळालं घरी गेल्यावर बायकोमुलांना काय देऊ? या विचारात असतो, कुणाला उद्याच्या दिवसाची चिंता पडलेली असते, कुणाचे स्वप्न भंग करून कुणी दूर गेला म्हणून ती दुखी असेल, कुणी प्रेयसी अजून कसा आला नाही हा मला भेटायला? म्हणून वाट पहात असेल, कुठे छोटं गुणी बाळ आपल्या बाबांची वाट पहात खिडकीशी बसलेलं असेल. त्यात आणि आकाशी ढग भरून आले तर ही काळजी अजूनच दाट होत जाते. पावसाच्या आत घरचा माणूस घरी आला पाहिजे ह्या अपेक्षेने मन कावरं बावरं होत असतं. अशा अनेक वेगवेगळ्या चिंता या वेळी मनाला ग्रासून टाकतात. 

रात्र आपले काळे हात पसरवत चराचर कवेत घेऊ पहात असते. आता दिवे लागणीची वेळ झाल्याने पुनः चराचरात एक चैतन्य येतं कारण प्रकाश किंवा उजेड म्हणजे मनाचा उल्लासितपणा. हा उजेड जरी कृत्रिम असला, तरी आपल्या मनाला तरतरी द्यायला पुरेसा असतो. विचारांची काळी जाळीजळमटे नाहीशी होतात. उद्याचा उष:काल खुणवू लागतो. रात्र थोडा काळ राहणारी पाहुणी आहे. पुनः उद्या दिवस येणारच आहे ही आशा मन पल्लवित करते. संध्या छायेची भीती देवा समोर तेवत असणाऱ्या समईच्या ज्योतीच्या तेजात विरघळून जाते. तुळशीजवळ तेवणारी ज्योत बाहेरची वाईट किल्मिषे बाहेरच्या बाहेर परतवून लावते त्यांना घरात येऊ देत नाही. रक्षण करणारी ठरते.    

प्रत्येकाच्या जीवनचक्रात हे असे वेगवेगळे ऋतु आणि बदल येतच असतात. दिवसामागून रात्र अशा घटिका येतातच. म्हणजे सुख दु:खाची ऊनसावली स्वीकारतच आपण आपलं जीवन व्यतीत करत असतो आणि आयुष्याच्या संध्यासमयी एक रितेपण मनाला ग्रासून टाकतं. मुलेबाळे मोठी होऊन मार्गी लागलेली असतात, कामातून निवृत्ती मिळालेली असते, आता आपली कुणाला गरज नाही असे विचार मन कुरतडून टाकत असतात. 

म्हणूनच आपल्या या मार्गात ज्ञानरूपी दिव्याची ज्योत तेवत ठेवण्याची गरज असते. मनाचे नैराश्य त्यात जळून जाईल. पूर्वी आयुष्यात येऊन गेलेले रंगीबेरंगी सुखाचे क्षण मनोमनी आठवत ती संध्या आयुष्यातले चांगले ते क्षण आकाशीच्या पसरलेल्या रंगांसारखे आठवत राहायचे. एखादा जुना अल्बम उघडून बघत राहावा तसं. आपणच आपल्याशी हसायचं, खूश राहायचं, उंच चढण चढून वर गेल्यावर दमल्यामुळे विसावा घेत क्षणभर थांबून मागे वळून पाहिल्यावर खूप सुंदर निसर्गचित्रे दिसू लागतात त्याचे अवलोकन करून अरे आपण जीवनातही इतक्या वरती सहजपणे पोचलो असं वाटू लागतं. मनातले सुंदर विचार थकवा दूर करतात. आता उतार उतरून जाणं ही तर सोप्पी गोष्ट आहे हे मनाला पटतं. अशा वेळी कुणाचा सावरणारा हात बरोबर असेल तर मग ‘संध्याछाया भिववीती हृदया’ असं वाटेनासं होतं. ती  सांज बेला सुखकर होते.


प्रतिभा कारंजकर, फोंडा