बार्देश : मुखवटाधारी घरफोडी टोळीचा पर्वरी पोलिसांकडून पर्दाफाश

सराईत गुन्हेगारासह महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा समावेेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th October, 12:43 am
बार्देश : मुखवटाधारी घरफोडी टोळीचा पर्वरी पोलिसांकडून पर्दाफाश

पर्वरी येथे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्यालयात छडा लावलेल्या चोरीची माहिती देताना पोलीस अधीक्षक अक्षक कौशल. बाजूस निरीक्षक राहूल परब व सहकारी पथक.    (उमेश झर्मेकर)

म्हापसा : पर्वरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत मुखवटाधारी संघटित (ऑर्गनाईज्ड) टोळीचा पर्दाफाश केला आहे. मारिया उर्फ मारिओ सांताना बाप्तिस्ता उर्फ सांतान (४४, रा. ग्रॅण्ड पेडे, बाणावली) व मोहम्मद सुफियान शेखमिया (२०, रा.  कालकोंडा-मडगाव) अशी संशयितांची नावे आहेत. 

ऐशारामात जीवन जगण्यासाठी संशयित या चोऱ्या करत होते. या टोळीचा मुख्य सूत्रधार हा संशयित मारियो बाप्तिस्ता आहे. तर संशयित मोहम्मद हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून तो वाणिज्य शाखेत पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषदेत या कामगिरीविषयी माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक राहूल परब व सहकारी पथक उपस्थित होते.    

दरम्यान, मारीयो बाप्तिस्ताला चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या संशयित समर पाल (रा. दवर्ली- मडगाव व मूळ पश्चिम बंगाल) या सराफी कारागीर व्यावसायिकासह फिलिप राटो (रा. बाणावली) या दोघांना काल रात्री पर्वरी पोलिसांनी अटक केली.               

गेल्या काही महिन्यांपासून उत्तर गोव्यात विशेषत: तिसवाडी व बार्देश तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरू झाले होते. लोक गाढ झोपेत असताना उत्तररात्रीच्या वेळी घराच्या खिडक्या दरवाजा फोडून हे चोरटे आत शिरत व पैसा आणि मौल्यवान ऐवज लंपास करीत होते. 

पाडेली बनला अट्टल चोर                  

संशयित मारियो बाप्तिस्त हा व्यवसायाने पाडेली आहे. नारळ पाडण्याचा व्यवसाय करताना त्याला चोऱ्या करण्याचा छंद लागला. त्याच्याविरुद्ध २०१५-१६ या दोन वर्षांत कोलवा, मायणा कुडतरी व मडगाव पोलिसांत एकूण १४ चोरीचे गुन्हे नोंद आहेत. यातील १२ चोऱ्या त्याने एकाच वर्षी २०१५ मध्ये कोलवा मध्ये केलेल्या आहेत.      

मारियोचा शहाळे विकण्याचा व्यवसाय                  

 २०१६ मध्ये जामिनावर सुटल्यानंतर  संशयित मारियो बाप्तिस्त याने चोरी करण्याच्या आपल्या कारवायांमध्ये खंड पाडला व तो सासष्टीमध्ये शहाळे विकण्याचा व्यवसाय करू लागला. ७-८ वर्षे चोऱ्यांपासून अलिप्त राहिल्यानंतर संशयित यंदा २०२४ मध्ये पुन्हा सक्रिय झाला व त्याला घरफोडीमध्ये संशयित मोहम्मद शेखमिया या विद्यार्थ्याची साथ मिळाली.




हेही वाचा