पणजी : शिरगाव येथील देवी लईराईच्या होमकुंडाबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी बार्देश तालुक्यातील एका १८ वर्षीय युवतीविरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याबाबतचा आदेश न्या. मकरंद एस. कर्णिक आणि न्या. वाल्मिकी मिनेझिस या द्विसदस्यीय न्यायपीठाने जारी केला आहे.
शिरगाव येथील श्री लईराई देवी जत्रोत्सवनिमित्त होमकुंड पेटवून हे अग्निदिव्य धोंड भक्तगणांकडून पार केले जाते. या होमकुंडामुळे पर्यावरणाला हानी पोहचते, असा आक्षेपार्ह पोस्ट १३ मे रोजी संबंधित युवतीने इंस्टाग्राम या सोशल मीडियावर टाकली होती. या पोस्टला हरकत घेत धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करीत देवीच्या भक्तगणांनी म्हापसा व कोलवाळ पोलिसांत एकत्रित होऊन तक्रार दाखल केली होती. या संदर्भात शिरगाव येथील अमित अनंत गावकर आणि इतरांनी तक्रार दाखल करून सदर युवतीवर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.
याची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी संशयित युवतीवर भादंसंच्या २९५ (अ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याची माहिती मिळल्यानंतर संबंधित युवतीने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून माफी मागितली. दरम्यान, युवतीवर कारवाई होत नसल्यामुळे भक्तगणांच्या शिष्टमंडळाने २१ आणि २४ मे रोजी पोलिसांना निवेदन देऊन तिच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. तसेच तिला अटक न केल्यास पोलीस स्थानकावर मोर्चा आणण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान संशयित युवतीने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर ३१ मे रोजी न्या. शेरीन पॉल यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. त्यात संशयित युवतीने न्यायालयात आरोपपत्र दाखल होईपर्यंत न्यायालय किंवा चौकशी अधिकाऱ्याच्या परवानगीविना गोव्याबाहेर जाऊ नये, आवश्यकता असेल तेव्हा चौकशी अधिकारी आणि न्यायालयात हजर राहणे, समान गुन्हा पुन्हा करू नये, अशा अटी टाकण्यात आल्या होत्या.
संशयिताकडून गुन्हा रद्द करण्याची मागणी
संशयित युवतीने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. सदर युवती वेळोवेळी इंस्टाग्रामवर प्रदूषण संदर्भात पोस्ट करत आहे. तसेच तिने पर्यावरण व प्रदूषण संदर्भात विविध स्पर्धेत भाग घेतल्याची माहिती दिली. वरील पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावण्याचा तिचा हेतू नव्हता. त्यामुळे तिने लगेच वरील पोस्ट संदर्भात माफी मागल्याचा दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एेकून घेतल्यानंतर तिच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याचा आदेश जारी केला.