गोवा : राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू

साखळी-विठ्ठलापूर, डिचोली पुलाची पाहणी : तीन महिन्यांत अहवाल सादर करणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th October, 12:28 am
गोवा : राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू

डिचाली येथील पुलाच्या पाहणीवेळी स्ट्रक्टवेल डिझायन अॅन्ड कन्सल्टंसीच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना आमदार डाॅ. चंद्रकांत शेटये.               

पणजी : राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (सर्वेक्षण) मुंबईस्थित स्ट्रक्टवेल डिझाईन अॅण्ड कन्सल्टन्सीने सुरू केले आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी साखळी आणि डिचोली येथील पुलांची पाहणी केली आहे. सदर कंपनी राज्यभरातील हजारो पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून सरकारला अहवाल सादर करणार आहे.                  

राज्यात पोर्तुगीज कालीन पूल तसेच साकवांची संख्या जास्त आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यापूर्वी कधीही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले नव्हते. आता ते सुरू होत आहे. उत्तर गोव्यात पूल आणि साकव मिळून ६००, तर दक्षिण गोव्यात ४०० पूल आहेत. सध्या उत्तर गोव्यातील पुलांची पाहणी केली जात आहे, अशी माहिती स्ट्रक्टवेल डिझाइन अॅण्ड कन्सल्टन्सीचे प्रकल्प व्यवस्थापक चंद्रशेखर यांनी दिली.       

नुकतेच आम्ही निरीक्षण सुरू केले आहे. येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर अहवाल सरकारला सादर करणार आहोत. या अहवालात पूल किंवा साकव किती टक्के सुरक्षित आहेत आणि सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती मिळणार आहे.       

दरम्यान, गुरुवारी त्यांनी साखळी येथील विठ्ठलापूर पुलाची पाहणी केली. या पुलाच्या तपासणीला सात ते आठ तास लागले. त्यानंतर त्यांनी डिचोली पुलाची पाहणी केली. अभियंते आणि तंत्रज्ञांशी याबाबत हातमिळवणी झाली असून विविध गट प्रत्येक पुलाची पाहणी करत आहेत. या पाहणीवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच डिचोली पुलाच्या पाहणीवेळी सहाय्यक अभियंता रश्मी मयेकर उपस्थित होत्या.       

डिचोलीतील एक पूल १९६२ मध्ये बांधण्यात आला. या पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. सदर पुलाच्या पाहणीनंतर तो सुरक्षित असल्याचे अभियंता मयेकर यांनी सांगितले. पुलांची पाहणी केल्यानंतर त्याचे फोटो काढून काँक्रिट आणि स्टील तसेच अन्य साहित्याचा तज्ज्ञ अभ्यास करतील त्यानंतरच यावर भाष्य करता येईल, असे चंद्रशेखर म्हणाले.                  

डिचोली येथील पुलाची पाहणी करताना स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्येही उपस्थित होते. ते म्हणाले, डिचोली येथील मुख्य नदीवर दोन पूल आहेत. त्यातील अस्नोडा नदीवरील पूल खूप जुना असून त्याच्या सुरक्षेसाठी पुलाची तपासणीही आवश्यक होती. अशा प्रकारच्या जुन्या पुलांची पाहणी केली जात आहे, ही चांगली बाब आहे. साळ, अडवलपाल येथे जुने साकव आहेत. या रस्त्यावर मोठी रहदारी असते. या पुलांची तपासणी येत्या दोन दिवसांत केली जाईल, असेही आमदार डॉ. शेट्ये यांनी सांगितले. 

सद्यस्थितीत एक हजार पुलांचे ऑडिट

राज्यातील पूल २ ते ६ मीटर लांबीचे आहेत. काही पूल ६ ते ३० मीटरपर्यंत आहेत. ३० मीटरपेक्षा जास्त लांबीचे ५७ पूल आहेत. ३० मीटरपेक्षा जास्त लांबीच्या सर्व पुलांचे ऑडिट केले जाईल. जास्त रहदारी असलेल्या पुलांची तपासणी केली जाईल. राज्यातील एकूण पुलांची संख्या दोन हजारांवर असली तरी सद्यस्थितीत एक हजार पुलांचे सर्व्हेक्षण होणार आहे. खांडेपार आणि उसगाव येथे नवीन पूल बांधण्यात आले असले तरी जुने पूल अद्याप वापरात आहेत. याही पुलांची तपासणी केली जाणार आहे.

राज्यात डिचोली, अस्नोडा यांसारखे अनेक जुने पूल आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे.
- डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार, डिचोली


उत्तर आणि दक्षिण गोव्यातील हजारो पुलांची पाहणी आणि ऑडिट करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन महिन्यांनी सदर अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल.
- चंद्रशेखर, प्रकल्प व्यवस्थापक, स्ट्रक्टवेल कन्सल्टन्सी   
                        
हेही वाचा