सासष्टी : ‘सेंट अँथनी’च्या शिक्षिका, मुख्याध्यापकांवर कारवाई करा!

पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा : विद्यार्थिनीला वेळेत आरोग्य सुविधा देण्यात निष्काळजीपणा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd October, 12:20 am
सासष्टी : ‘सेंट अँथनी’च्या शिक्षिका, मुख्याध्यापकांवर कारवाई करा!

मडगाव : वेरोडा-कुंकळ्ळी  येथील सेंट अँथनी शाळेतील तिसरीच्या मुलीला वेळेत वैद्यकीय सुविधा न पुरवल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या प्रकरणी कुंकळ्ळी, फातर्पा परिसरातील नागरिकांनी बुधवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला व शिक्षिकेच्या अटकेची मागणी केली. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांकडून शिक्षिका व शाळा व्यवस्थापनाविरोधात बुधवारीच गुन्हा नोंद केलेला आहे. रात्री उशिरापर्यंत ठाण्यावर जमाव कायम होता.

वेरोडा-कुंकळ्ळी येथील सेंट अँथनी शाळेतील तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलीला शाळेतच दुखापत झाली, पण वेळेत उपचारासाठी नेले नाही, असा दावा पालकांनी करत शिक्षिका लझिमा फर्नांडिस व शाळा व्यवस्थापनाविरोधात २६ सप्टेंबर रोजी तक्रार केली होती. या प्रकरणाची स्वेच्छा दखल शिक्षण खात्याकडून घेण्यात आली असून शाळा व्यवस्थापनाकडून घटनेचा अहवाल मागवण्यात आला आहे.

सदर मुलीवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्या तब्येतीत सध्या सुधारणा होत आहे. मात्र तक्रार केल्यानंतरही आठ दिवसांनीही शाळा व्यवस्थापन किंवा शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंद न झाल्याने फातर्पासह कुंकळ्ळीतील नागरिकांनी बुधवारी सायं. ४ वा. कुंकळ्ळी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी सुमारे तीनशेपेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती होती.

शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका किंवा वर्गशिक्षिकांनी वेेळेत उपचार न दिल्याने किंवा रुग्णवाहिका न बोलावल्याने उपचाराला विलंब झाला व सदर मुलीवर शस्त्रक्रिया करावी लागली, असा दावा उपस्थित नागरिकांनी करत वर्गशिक्षिका, शाळा व्यवस्थापनावर कारवाई होण्याची गरज आहे, त्यांना अटक करा, त्याशिवाय माघारी जाणार नसल्याचे जमावाने सांगितले.

मुलीच्या तक्रारीकडे शाळेचे दुर्लक्ष

मुलीला दुखापत झाल्यानंतर तिच्या मेंदूत रक्तस्राव सुरू झाला. वर्गातील मुलांनी वर्गशिक्षिकेला ज्यावेळी सांगितले, त्यावेळी पहिल्यांदा तिने दुर्लक्ष केले. मुलांनी पुन्हा ती रडत असल्याचे सांगताच मुख्याध्यापिकेला बोलावण्यास सांगितले. मुख्याध्यापिकेकडूनही मुलीला आईच्या घरी आली आहेस का, अशी विचारणा करत तिच्या दुखापतीकडे दुर्लक्ष केले. तसेच मुलीच्या आईने वैयक्तिक स्तरावर हालचाली करत मुलीला वैद्यकीय उपचारासाठी नेल्याचे सांगण्यात आले.

शिक्षण खात्याकडून गुरुवारी शाळा व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात येणार आहे. शिक्षण खात्याने प्रसारमाध्यमांतील बातम्यांवरून याप्रकरणी स्वेच्छा दखल घेतली व झाल्या प्रकाराचा तपास करत अहवाल मागून घेतला आहे. 

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

शिक्षिकेला आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिक्षिका व मुख्याध्यापिका घरी नसल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगताच जमावाने जाणूनबुजून विलंब केल्याचा व राजकारण असल्याचा दावा केला. यानंतर पोलीस अधीक्षक सुनीता सावंत घटनास्थळी आल्या. पोलिसांना जमत नसल्यास गुरुवारी सकाळी जमाव शाळेत जाईल व कारवाई करेल, असा इशारा लोकांनी दिला.

जमावाकडून काही काळ रास्तारोको

कुंकळ्ळीतील नागरिकांनी पोलीस तपासात विलंब केला जात असून राजकीय दबावामुळे कारवाई करण्याचे टाळले जात असल्याचा दावा केला. त्यानंतर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. उशिराने मिळालेल्या न्यायाला किंमत नसते, असे सांगत निष्काळजीपणा करणाऱ्या शिक्षिका व मुख्याध्यापकांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी कुंकळ्ळी पोलीस ठाण्यासमोरील महामार्गावर जमावाने थांबत काही काळ रास्तारोको केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत जमावाला रस्ता मोकळा करण्यात सांगितले. 

मोर्चा येणार असल्याचे समजताच गुन्हा नोंद

मुलीच्या पालकांनी ज्या दिवशी घटना घडली, त्याच दिवशी कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करत शाळा व्यवस्थापन व शिक्षिकेकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केलेला होता. पोलिसांकडून या प्रकरणी तपास करण्यात आला, पण गुन्हा नोंद करण्यात येत नव्हता. त्यामुळे बुधवारी सायंकाळी मोर्चा काढण्याचे नागरिकांनी ठरवले होते. याची जाणीव होताच दुपारी २च्या सुमारास पोलिसांनी शिक्षिका व शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा नोंद केला.


हेही वाचा