स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मत्स्योद्योग खात्याची धडक कारवाई
पणजी : मत्स्योद्योग खात्याने गोव्याच्या सागरी हद्दीत अवैधपणे घुसून बुल ट्रॉलिंग करणाऱ्या मालपे कर्नाटक येथील दोन बोटी जप्त केल्या. ही घटना शनिवारी पहाटे पाचच्या दरम्यान घडली. या कारवाईत किनारी पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांनी देखील सहभाग घेतला होता. पकडलेल्या बोटींवरील माशांचा लिलाव करून बोट मालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी स्पष्ट केले आहे.
गेले काही दिवस मालपे येथील बोटी गोव्याच्या सागरी हद्दीत घुसून बेकायदेशीरपणे मासेमारी करत असल्याची तक्रार स्थानिक मच्छीमारांनी केली होती. त्या बोटीवरील मच्छीमारांनी स्थानिकांना दमदाटी केल्याचा आरोपही झाला होता. याबाबत काही दिवसांपूर्वी पोलीसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. यानंतर मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी कर्नाटक मत्स्योद्योग खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली होती.
मात्र तरीही मालपे येथील बोटी गोव्याच्या हद्दीत येण्याचे प्रकार सुरूच होते. यानंतर मत्स्योद्योग खात्याने असे प्रकार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची नियुक्ती केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही अशा बोटींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यानंतर शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान अन्य दोन बोटींना पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. जप्त केलेल्या बोटी पणजी जेटीवर आणण्यात आल्या आहेत. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे आश्वासन मंत्री हळर्णकर यांनी दिले आहे.
दरम्यान राज्यातील विविध मच्छीमार संघटनांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. जॉन लोबो यांनी सांगितले की गेले काही महिन्यात पर राज्यातील बोटी गोव्यात येऊन अवैधपणे मासेमारी करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या पोटावर पाय येत आहे. आज केलेली कारवाई यापुढेही सुरू राहील अशी आमची अपेक्षा आहे. जप्त केलेल्या बोटींवर दहा लाख रुपयांपेक्षा जास्त दंड आणि गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करावी.
खात्याचे अधीक्षक चंदेश चंद्रेश हळदणकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार काल खात्यातील अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. यानुसार आम्ही आज ही कारवाई केली आहे. जप्त केलेल्या बोटींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम दहा लाख रुपये करावी यासाठी खात्याने प्रक्रिया सुरू केली आहे. कायद्यात बदल झाल्यास ही रक्कम वाढवली जाईल.