गोवा : राज्यातील खाजगी कंपन्यांतील रोजगाराची माहिती गोळा करणार;आपचा उपक्रम

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
05th October, 04:24 pm
गोवा : राज्यातील खाजगी कंपन्यांतील रोजगाराची माहिती गोळा करणार;आपचा उपक्रम

पणजी : आम आदमी पक्षातर्फे राज्यातील खाजगी कंपन्यांतील रोजगाराची माहिती गोळा करून त्याचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. ही माहिती राज्यातील बेरोजगार स्थानिकांना पुरवण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगितले. शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रामराव वाघ, सलमान खान ,रोहन नाईक आदी उपस्थित होते.

पालेकर म्हणाले की, केंद्रीय अहवालानुसार राज्यात बेरोजगारी दर जास्त आहे. असे असले तरी राज्य सरकार केंद्राचा अहवाल चुकीचा असल्याचे सांगत आहे. त्यामुळे बेरोजगारी बाबत सरकार काही करेल अशी आशा नाही. यासाठी आपच्या युवा शाखेने रोजगाराचा डेटाबेस तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यानुसार आम्ही काही खाजगी कंपन्यांकडे बोलणी सुरू केली आहे. त्यांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ते म्हणाले, गोवा मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे ९४४ जागांवर भरती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत घोटाळा झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. हे महामंडळ एमटीएस व अन्य कर्मचाऱ्यांच्या वेतनावर जीएसटी लावते ही शरमेची बाब आहे. या जागांवर आरक्षण ठेवण्यात आलेले नाही. दरवर्षी हजारो पदवीधर तयार होत आहेत. मात्र सरकार रोजगार उपलब्ध करू शकत नाही. आयटी , उद्योग अशा सर्व सर्वच क्षेत्रात सरकार अपयशी ठरले आहे. 

रामराव वाघ म्हणाले की, गोवा मनुष्यबळ विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने काम करत नाही. आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी गेल्या अडीच वर्षात एकही बैठक घेतली नाही. महामंडळ असतानाही सरकारची अन्य खाती विविध सेवांसाठी खाजगी कंपन्यांकडून सेवा घेत आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार केवळ मागच्या वर्षी अशा सेवा घेण्यासाठी सरकारने ६० कोटीहून अधिक रक्कम खर्च केली आहे. आम्ही याचा तपशीलवार अभ्यास करत आहोत. लवकरच हा घोटाळा आहे आम्ही बाहेर काढणार आहोत.

हेही वाचा