इस्रायलचा बेरूतवर हल्ला; ६ जणांचा मृत्यू

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th October, 12:52 am
इस्रायलचा बेरूतवर हल्ला; ६ जणांचा मृत्यू

बेरूत : इस्त्रायलने पुन्हा एकदा लेबनॉनची राजधानी बेरूतवर गुरुवारी पहाटे हल्ला केला. इस्त्रायलने मध्य बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात किमान ६ लोक ठार झाले. २००६ नंतर इस्त्रायलने प्रथमच बेरूतच्या मध्य भागावर हवाई हल्ला केला. इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये १ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हिजबुल्लासोबत युद्ध झाल्यापासून सुमारे १० लाख लोक विस्थापित झाले आहेत.      

सूत्रांच्या माहितीनुसार, हिजबुल्ला सोबत सीमेजवळ सुरू असलेल्या संघर्षात इस्रायलचे ८ सैनिक मारले गेले. सीमेपलीकडून हल्ले सुरू केल्यानंतरची इस्रायलची ही पहिली जीवितहानी आहे. त्यानंतर इस्रायलने गुरुवारी बेरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. ज्यात किमान ६ लोक ठार झाले.      

बेरूतवर रात्रभर १७ हवाई हल्ले

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने या जीवितहानीची पुष्टी केली आहे. मध्य बेरूतमधील अपार्टमेंटवर झालेल्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यात किमान ६ जण ठार झाले. तर ११ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र मुख्यालय, पंतप्रधान कार्यालय आणि संसदेपासून जास्त दूर नसलेल्या बाशौरा जिल्ह्यातील एका निवासी बहुमजली इमारतीतील एका अपार्टमेंटला आग लागली. या हल्ल्यानंतर रहिवाशांना पांढऱ्या सल्फरसारखा वास आला. लेबनॉन सरकारच्या नॅशनल न्यूज एजन्सीने इस्रायलवर आंतरराष्ट्रीय बंदी असलेल्या फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत बेरूतवर रात्रभर एकूण १७ हवाई हल्ले झाले.      


हेही वाचा