अभिमानास्पद ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : मराठीसह पाच भाषांनाही मिळाला अभिजात भाषेचा दर्जा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th October, 12:47 am
अभिमानास्पद ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

नवी दिल्ली : नवरात्रीचा अाजचा पहिला दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे. कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा आता सातासमुद्रापार आणखी वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने दिलेला हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यिकांना प्रोत्साहन देणारा आहे. केंद्राने मराठी भाषेसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी भाषा भारताचा अभिमान : माेदी

मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

माय मराठीच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी पंतप्रधान मोदीजी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील व कटिबद्ध आहोत. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री 


अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान मोदीजी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांचे आभार. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

भाषा ‘अभिजात’ कशी ठरते?
- भाषेचा नोंदवलेला इतिहास हा १५००-२००० वर्षं जुना हवा.
- प्राचीन साहित्य हवे, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटते.
- दुसर्‍या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
- ‘अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

या भाषांना मिळाला अभिजात दर्जा
भारतात यापूर्वी तामिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे.

आता तरी गोव्याची​ राजभाषा करा!
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आम्हा मराठीप्रेमींना अत्यानंद झाला आहे. अभिजात भाषेसाठी आवश्यक असलेल्या अटी मराठी भाषेने यापूर्वीच पूर्ण केलेल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा ही समृद्ध प्राचीन भाषा आहे, हे सिद्ध झाले. मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही झगडत आहोत. मराठी भाषा ही या राज्याचीही भाषा आहे, हे इथल्या जुन्या पुरातन दस्तऐवज, शिलालेखांवरून स्पष्ट झाले आहे. आता तरी राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय घेऊन मराठीला सन्मानाने वागवले पाहिजे. दुसरीकडे, ही भाषा अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी गोव्यातील साहित्यिक, लेखक, कलावंत यांनीही विविध व्यासपीठांवर मराठीचा जागर चालू ठेवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी अमोणकर यांनी दिली आहे.                   

हेही वाचा